Goa ZP Election: गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ! कोलवाळ, हळदोणे, शिरसईत नारीशक्तीचे वर्चस्‍व; सत्तरीतील मतदारसंघांत मोर्चेबांधणी

Goa Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच बार्देश तालुक्यातील अनेक मतदारसंघांतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत.
Zilla Panchayat Election
Goa Zilla Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच बार्देश तालुक्यातील अनेक मतदारसंघांतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. विद्यमान सदस्यांसह अनेक इच्छुकांना आरक्षणामुळे माघार घ्यावी लागली, तर काहींना पक्षाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. आरक्षणामुळे काही नवे चेहरेही पुढे येण्‍याची शक्‍यता आहे.

हळदोणा आणि थिवी मतदारसंघांत येणाऱ्या हळदोणा, शिरसई आणि कोलवाळ या तिन्‍ही जिल्हा पंचायत नेतृत्‍व सध्या महिला सदस्यांकडे आहे. हळदोण्यातून मनीषा नाईक, शिरसईतून दीक्षा कांदोळकर आणि कोलवाळमधून कविता कांदोळकर कार्यरत आहेत. कोलवाळ मतदारसंघ महिलांसाठी राखीव असून हळदोणा आणि शिरसई हे मतदारसंघ खुले आहेत.

मागील निवडणुकीत खुल्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या कविता कांदोळकर यांना यावेळी आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे. मात्र त्या पुन्हा रिंगणात उतरणार का, याबाबत अजून निर्णय झालेला नाही. ‘आरजी’ पक्षानेही उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केलेली आहे. काँग्रेसकडून देखील उमेदवारीची चाचपणी सुरू आहे.

‘आरजी’ने विधानसभा निवडणुकीवेळी हळदोणा मतदारसंघातून उमेदवार उतरवला नव्हता. त्याच धर्तीवर जिल्‍हा पंचायत निवडणुकीतही हळदोणा आणि शिरसईतून उमेदवार उतरवण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जातेय.

उत्तर गोव्यात काँग्रेसकडे असलेला हळदोणा हा एकमेव मतदारसंघ असल्याने जिल्‍हा पंचायत निवडणूक काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवाय माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्यासाठीही ही निवडणूक विशेष असेल. हळदोण्यातून पुन्हा राजकीय पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेले टिकलो यांच्या भवितव्याचा निर्णय या निकालावर अवलंबून असणार आहे.

थिवीतील शिरसई आणि थिवी पंचायत प्रभागांनी तयार झालेला शिरसई मतदारसंघ खुला ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन निवडणुकांत भाजप उमेदवार म्हणून विजयी झालेल्या दीक्षा कांदोळकर या हॅट्‌ट्रिकच्या तयारीत आहेत.

मात्र पक्षाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. हळदोणा भाजप मंडळाचे सचिव सागर मावळणकर यांनीही उमेदवारीचा दावा केल्यामुळे स्थिती अधिक रंगतदार बनली आहे. त्यांच्यासोबत सोहन रायकर, गोविंद गोवेकर ही नावे देखील चर्चेत आहेत. शिरसई पंचायतीचे पंच नीलेश कांबळी काँग्रेस उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

हळदोणा मतदारसंघ गेल्या वेळी महिलांसाठी राखीव होता; यावेळी मात्र तो खुला करण्यात आला आहे. विद्यमान भाजप सदस्या मनीषा नाईक पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्या तरी दावेदारांची संख्या जास्त असल्याने त्‍यांची कसोटी लागणार आहे.

बस्तोडा पंचायतीचे विद्यमान पंच सदस्य सुभाष मोरजकर, माजी सरपंच सावियो मार्टिन्‍स हे भाजप उमेदवारीसाठी दावेदार आहेत. काँग्रेसकडून सागर साळगावकर व गोकुळदास हळर्णकर यांची नावे पुढे येत आहेत. एकूणच विविध पक्ष उमेदवारांची अधिकृत घोषणा करेपर्यंत, मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील नवा चेहरा कोण असेल याची उत्सुकतेने वाट पाहावी लागणार आहे.

महिलांचे नेतृत्व; तीन मतदारसंघ

हळदोणा - मनीषा नाईक (खुला)

शिरसई : दीक्षा कांदोळकर (खुला)

कोलवाळ : कविता कांदोळकर (महिला राखीव)

दावेदारांची प्रमुख नावे

भाजप : शिरसई - दीक्षा कांदोळकर, सागर मावळणकर, सोहन रायकर, गोविंद गोवेकर. हळदोणा : मनीषा नाईक, सुभाष मोरजकर, सावियो मार्टिन्‍स.

काँग्रेस : शिरसई - नीलेश कांबळी, सागर साळगावकर, गोकुळदास हळर्णकर.

अपक्ष/अन्य : कविता कांदोळकर (कोलवाळ-निर्णय प्रलंबित).

अन्‍यही काही नावे चर्चेत आहेत. त्‍यात बहुतांश उमेदवार नवीन आहेत. पुढील काही दिवसांत चित्र स्‍पष्‍ट होईल.

सत्तरीतील तिन्‍ही मतदारसंघांत मोर्चेबांधणी

पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सत्तरी तालुक्यातील नगरगाव, होंडा आणि केरी या तीन मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणीला वेग आला आहे. होंडा हा ओबीसी राखीव, केरी हा एससी राखीव तर नगरगाव मतदारसंघ सामान्य श्रेणीत जाहीर करण्यात आला आहे.

सत्तरीत दोन ठिकाणी राखीव आणि एक ठिकाणी सामान्य विभाग दिल्यामुळे नगरगाव येथून सर्वमान्‍य उमेदवारालाच पक्षांनी उभे करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

सत्तरी तालुक्यात २००७ पासून ‘जिथे राणे, तिथे मतदार’ हे समीकरण तयार झाले आहे. आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे ज्यांना उमेदवारी देतात, तेच विजयी होतात, असे चित्र गेल्या निवडणुकांमध्ये दिसले आहे. मात्र यावेळी नगरगाव मतदारसंघ सर्वसाधारण विभागात असल्‍याने सामान्य समाजातीलच उमेदवार उभा करावा असा आग्रह मतदारांचा आहे.

नगरगाव मतदारसंघातून २०१५ साली सामान्य विभागातून गुळेलीचे प्रेमनाथ हजारे यांना राणेंनी उमेदवारी देत विजयी केले होते. त्यांनी पाच वर्षांत गावोगावी जाऊन जनसंपर्क राखत जिल्हा पंचायत निधीतून विविध विकासकामे केली. २०२० सालीही नागरिकांनी हजारे यांचे नाव पुढे केले होते; मात्र ऐनवेळी नगरगाव मतदारसंघ राखीव करण्यात आल्यानंतर त्यांची संधी हुकली होती. यावेळी मतदारसंघ पुन्हा सामान्य झाल्याने हजारे यांचे नाव अंतर्गतपणे जोरदार उचलून धरले जात आहे.

मतदारसंघांचे स्वरूप

होंडा : ओबीसी राखीव

केरी : एससी राखीव

नगरगाव : खुला

अनेकांची नावे चर्चेत

नगरगाव मतदारसंघ खुला असल्याने अनेक इच्छुक पुढे येत आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेस, अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू होणार आहे. साडेसोळा हजार मतदार असलेला हा मतदारसंघ नगरगाव, सावर्डे, भिरोंडा, खोतोडा, गुळेली या प्रभागांतून बनलेला आहे.

धावेचे धुळू शेळके, नितेश गावडे, अर्जुन गुरव, कृष्णा नेने आणि प्रेमनाथ हजारे अशा अनेक नावांची चर्चा राजकीय वर्तुळांत आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. होंडा ओबीसी राखीव मतदारसंघातून माजी सरपंच आत्माराम शेट्ये तर केरी एससी राखीवेतून डोंगुर्ली ठाण्याचे माजी सरपंच व विद्यमान पंच नीलेश परवार या नावांची चर्चा आहे.

नीलेश परवार सलग दोनवेळा बिनविरोध

डोंगुर्ली-ठाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच नीलेश परवार हे २०१७ आणि २०२२ या दोन निवडणुकांमध्ये सलग बिनविरोध पंच म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी सरपंचपदही भूषविले असून, पत्रकार म्हणूनही काम केलेले आहे. जर केरी मतदारसंघातून इतर कुणी उमेदवार समोर आला नाही तर परवार हे जिल्हा पंचायत सदस्यपदीही बिनविरोध निवडून येऊ शकतात. ते मंत्री विश्‍‍वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

Zilla Panchayat Election
Goa ZP Election: जि.पं. आरक्षणावर मंगळवारी सुनावणी, राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस

गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ

गोवा फॉरवर्डने मये मतदारसंघात आज प्रचाराचा नारळ फोडला. तेथील पक्षाच्‍या संभाव्य उमेदवार प्रा. राधिका राजेश कळंगुटकर यांनी शिरगावमधून प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी त्यांच्यासमवेत संतोषकुमार सावंत, मंदार सरदेसाई, मये गट समितीचे अध्यक्ष वीरेंद्र पत्रे, आनंद पार्सेकर, प्रा. राजेश कळंगुटकर आदी पन्नासहून अधिक कार्यकर्ते उपस्‍थित होते.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या चरणी नारळ अर्पण करून आणि देवीचा आशीर्वाद घेऊन आज रविवारी सायंकाळी कळंगुटकर यांनी प्रचाराला सुरुवात केली.

Zilla Panchayat Election
Goa ZP Election: ‘मये’त जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे जोरात! फॉरवर्ड, काँग्रेसचे उमेदवार निश्चित; दक्षिण गोव्यात भाजपची चाचपणी

महिलांसाठी राखीव असलेल्या मये मतदारसंघातून उमेदवार म्हणून आठ दिवसांपूर्वीच गोवा फॉरवर्डतर्फे प्रा. राधिका कळंगुटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्‍यानुसार त्‍यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. ‘आप’च्या कार्याध्यक्षपदाचा त्याग करून प्रा. राजेश कळंगुटकर यांनी पत्नी प्रा. राधिका कळंगुटकर यांच्यासह आठ दिवसांपूर्वीच गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला होता.

प्रा. राधिका कळंगुटकर या उच्चशिक्षित असून, त्यांना लोकांच्या समस्यांची जाण आहे. त्‍यामुळे मतदार निश्चितच त्यांना विजयी करतील, असा विश्‍‍वास गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com