Yuri Alemao: केटीसी ड्रायव्हर्स अँड अलाईड एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यासाठी निवेदन सादर केले.
केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता हे देखील यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभेत त्यांच्या समस्या व मागण्या सरकार समोर मांडण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात नेसेमेंतो लोबो, उल्हास नाईक, मनीष तांडेल, सुचिता ढाकणकर, आत्माराम गावस आणि संजय आमोणकर यांचा समावेश होता.
विरोधी पक्षनेत्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात मागील थकबाकी देणे, एकूण पगारावर 12 टक्के भविष्य निर्वाह निधी देणे, कदंब परिवहन महामंडळाकडून 250 नवीन बसेसची तात्काळ खरेदी, आंतरराज्यीय मार्गावरील बससेवेचे आउटसोर्सिंग थांबवणे यासारख्या प्रमुख मागण्या आहेत.
इलेक्ट्रिक बसेसचा आढावा घ्यावी व 'म्हाजी बस योजना' बंद करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या गेल्या असल्या तरी, कदंबा व्यवस्थापनाने केटीसी ड्रायव्हर्स अँड अलाईड एम्प्लॉईज असोसिएशन सोबत वेतन समझोत्यावर स्वाक्षरी केलेली नाही आणि 34 महिन्यांच्या 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी दिलेली नाही असे निवेदनात म्हटले आहे.
बुधवारी सादर केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की 400 बसेसपैकी 184 बसेस भंगार करण्यात येणार असल्याने केटीसीला फक्त 216 बसेस चालवाव्या लागतील.
अर्थसंकल्पीय तरतुदी करून 250 नवीन बस खरेदी करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. गोवा-शिर्डी आणि गोवा-मुंबई यांसारखे आंतरराज्य मार्ग कंत्राटदाराला आउट-सोर्स केले गेले आहेत.
हे दोन्ही मार्ग नफा कमावणारे मार्ग आहेत. या मार्गांवर नवीन लक्झरी बसेस खरेदी करून हे दोन्ही मार्ग केटीसीएल द्वारे चालवावेत अशी आमची मागणी आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
केटीसीएलमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या इलेक्ट्रिक बसेस अव्यवहार्य होत आहेत. ते 'पांढरे हत्ती' बनू नयेत यासाठी कदंबा व्यवस्थापनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे.
इलेक्ट्रिक बसेस कदंबा व्यवस्थापनाने चालवल्या पाहिजेत आणि त्यांची देखभाल व दुरुस्ती कंदब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली पाहिजे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
आम्ही “माझी बस योजने” ला तीव्र विरोध करतो आणि सरकारला ही योजना स्थगित ठेवण्याचे आवाहन करतो कारण ही योजना कंदब महामंडळ आणि तिच्या कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही असेही निवेदनात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.