

पणजी: महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासह त्यांना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोवा सरकारतर्फे दोना पावला येथील लोकभवनात ‘स्वयंपूर्ण कौशल मेळावा’ आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना विविध सरकारी योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, आर्थिक सहाय्य आणि रोजगाराच्या संधींची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली.
या मेळाव्यात सरकारच्या १६ विविध खात्यांनी सहभाग घेतला, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या ६० योजनांची माहिती आणि लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना आर्थिक मदत मिळवून देणे, नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांना रोजगाराशी जोडणे, तसेच सध्या व्यवसाय करीत असलेल्या महिला उद्योजकांना आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
महिला बचत गटांच्या माध्यमातूनही रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक दीपाली नाईक, पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. शिरीष गावकर, सल्लागार राजेश कुलकर्णी, आदिवासी कल्याण खात्याचे अभिजित जांभळे आदी उपस्थित होते.
महिलांसाठी प्रशिक्षण
या मेळाव्यात महिलांसाठी तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीचे कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत. एकूण २४ प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून आरोग्य सेवा, किरकोळ विक्री, अन्नप्रक्रिया, पर्यटन आणि आरोग्यवर्धक सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिलांना प्रवास खर्च आणि गणवेशासाठीही सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना रोजगारक्षम बनविण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.