

पणजी: माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाच्या मार्गदर्शनाखाली गोवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (जीआयटीडीसी) आणि गरुडा एरोस्पेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने १२ महिलांनी पाच दिवसांचे पहिले ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योजकतेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी ‘नमो ड्रोन दीदी’ उपक्रमाच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उत्पन्न वाढविणे, महिलांना स्वावलंबी बनविणे आणि स्थानिक समुदायांना सक्षम करणे, हा राज्य सरकारचा उद्देश आहे. पाच दिवसांच्या प्रशिक्षणात महिलांना ड्रोन तंत्रज्ञान, फ्लाइट सिम्युलेशन, ड्रोन असेंबलिंग, देखभाल, सुरक्षितपणे ड्रोन हाताळणे तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री तसेच जीआयटीडीसीचे अध्यक्ष रोहन खंवटे उपस्थित होते. यावेळी ‘डीआयटीई अँड सी’चे संचालक कबीर शिरगावकर, आयटीजीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वळवटकर, सुकूरचे जिल्हा पंचायत सदस्य अमित अस्नोडकर, संदीप साळगावकर, सुकूरच्या सरपंच सोनिया संजय पेडणेकर, पेन्हा द फ्रान्कचे सरपंच स्वप्नील चोडणकर आणि कारे येथील हनुमान देवस्थानचे अध्यक्ष लिलाधर हरमलकर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी ड्रोन उडविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते महिलांना प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या उपक्रमाबाबत खंवटे म्हणाले, महिलांना केवळ ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण देणे हा आमचा उद्देश नाही. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि नव्या अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे, हा आमचा उद्देश आहे.
दरम्यान, गोवा ड्रोन धोरणाअंतर्गत राज्य सरकार ‘गोवा ड्रोन दीदी प्रशिक्षण योजना’ संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी मंजुरी मिळविण्याच्या प्रक्रियेत आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी १०० महिलांच्या ड्रोन प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारकडून उचलला जाणार आहे.
अनुभव कथन...
अनु मोरजकर यांनी सांगितले, माझ्यासाठी ड्रोन आतापर्यंत केवळ फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे साधन होते. ही संधी मिळताच मी ती स्वीकारली. सुरुवातीला आम्ही ड्रोन आणि विमानांच्या एरोडायनॅमिक्सबाबत शिकलो. त्यानंतर आमची समज तपासण्यासाठी चाचणी घेण्यात आली. पुढे व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि सिम्युलेटरवर ड्रोन चालविण्याचा सराव केला. भविष्यात या कौशल्यांचा उपयोग करण्यासाठी मी उत्सुक आहे.
सुभी सातर्डेकर म्हणाल्या, “आज आमचे पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे जाण्याचे बळ मिळाले आहे. महिलांनी केवळ पारंपरिक भूमिका निभावाव्यात, असे अनेकदा म्हटले जाते; मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही हे अडथळे दूर करत आहोत. हा उपक्रम आमच्यासाठी योग्य वेळी आला आहे.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.