
पणजी: गोवा विद्यापीठ परिसरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम भाडेतत्त्वावर देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. सरकारने स्टेडियम भाड्याने द्यायचा जो निर्णय घेतला आहे, तो मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियम भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय घेतल्याचे आणि त्यापोटी महिन्याकाठी २५ लाख २५ हजार भाडे सरकारला मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर जाहीर केले होते.
सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सायंकाळी स्टेडियमच्या परिसरात आंदोलन करीत भाजप सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला. याप्रसंगी अमरनाथ पणजीकर, माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, काँग्रेसचे सांताक्रूझचे गटाध्यक्ष जॉन नाझारेथ, एनएसयूआयचे नौशाद चौधरी यांची उपस्थिती होती.
पाटकर म्हणाले, खेळासाठी उभारलेल्या स्टेडियमचा वापर खेळासाठी होत नाही. यापूर्वी पेडे येथील स्टेडियम बंदोबस्तासाठी आलेल्या सीआरपीएफ पोलिसांना राहण्यासाठी दिले होते. आता हे स्टेडियम अगोदरच भाड्याने दिले जात आहे. क्रीडा प्रकारासाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत, त्या या स्टेडियममध्ये उभारण्यात आल्या नाहीत. केवळ ते भाड्याने देण्याचे काम हे सरकार करीत आहे.
अमरनाथ पणजीकर म्हणाले, भाजपचे डबल इंजिन सरकार आपणाकडे भरपूर पैसा आहे असे सांगते, मग क्रीडापटूंसाठी बनविलेले स्टेडिमय भाड्याने देण्याचा निर्णय का घेतला आहे. एकही मंत्री या निर्णयाला विरोध करीत नाही. कारण सर्व मंत्र्यांना आपली खुर्ची जाण्याची भीती वाटू लागली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोव्याच्या हिताचे निर्णय होत नसतील, तर त्यांनी आवाज उठवणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.