Goa Tourism Economy
पणजी : गोवा भारतातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. गोवा राज्यात पर्यटनात वाढ होत असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्र महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांच्या मते, गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्र दरवर्षी अंदाजे २५०० कोटी रुपयांचे योगदान देत आहे.
रोजगाराबाबत माहिती द्यायची झाल्यास पर्यटन क्षेत्रात सुमारे २.५ लाखांहून अधिक लोकं काम करत आहेत. पर्यटनस्थळ म्हणून गोव्याच्या वाढत्या लोकप्रियतेचे श्रेय गोव्यात मिळत असलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांना देता येईल.
यामध्ये गोव्यातील समुद्र, मंदिरे, चर्च यांसोबतच हेरिटेज वॉक, साहसी मार्ग, हिंटरलॅण्डचा अनुभव आणि धबधबा ट्रेक अशा उपक्रमांचाही समावेश होतो. या शाश्वत पर्यटन उपक्रमांनी अनोखे अनुभव शोधणाऱ्यांच्या विस्तृत श्रेणीला आकर्षित केले आहे, असे मत सुखिजा यांनी व्यक्त केले.
सुखिजा यांनी संगितले की, गोव्यातील नोंदणीकृत खोल्यांची संख्या अंदाजे ६५,००० ते ७०,००० च्या आसपास आहे. पर्यटकांच्या वाढत्या ओघाला सामावून घेण्यासाठी राज्याची पर्यटन पायाभूत सुविधाही सुसज्ज आहे.
तथापि, पर्यटन उद्योगाच्या वेगवान वाढीमुळे अनेक आव्हानेदेखील अधोरेखित झाली असून त्या समस्यांचे निराकरण करणेदेखील आवश्यक आहे. यामध्ये रस्त्यांची देखभाल, समुद्रकिनारा स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक आणि ॲप-आधारित टॅक्सी सेवांची उपलब्धता यासारख्या समस्या पर्यटक आणि रहिवाशांसाठी चिंताजनक बनल्या आहेत.
समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्राचा शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी, जागतिक पर्यटन दिनानिमित्त नंदनवन-खांडेपार येथे भागधारकांची बैठक होणार असून पर्यटन क्षेत्रातील ६०० हून अधिक भागधारक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
भागधारकांच्या बैठकीमुळे आवश्यक चर्चा होईल आणि गोव्यातील पर्यटन उद्योगासमोरील आव्हानांवर ठोस उपाय निघतील, अशी अपेक्षा सुखिजा यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.