डिचोली: सरकारकडून साखळी पालिकेत "सूडा" चे राजकारण खेळण्यात येत आहे. या पालिकेत विरोधी गटाची सत्ता असल्याने पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्यास टाळाटाळ आदी विविध मार्गाने अडवणूक करून विरोधी गटाला निष्क्रिय करण्याचा डाव सरकारकडून खेळण्यात येत आहे. अशी टीका साखळी पालिकेच्या (Sanquelim Municipalities) सत्ताधारी गटाचे नगरसेवक धर्मेश सगलानी (Dharmesh Sagalani) यांनी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने प्रत्येकवेळी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात. असेही श्री. सगलानी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष राया पार्सेकर, उपनगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक कुंदा माडकर, ज्योती ब्लॅगन आणि राजेंद्र आमेशकर (Rajendra Ameshkar) उपस्थित होते.
*मुख्याधिकारी प्रश्नी न्यायालयात
विरोधकांकडे पालिकेच्या सत्ता आल्यापासून या पालिकेत मुख्याधिकाऱ्यांचा घोळ चालू आहे. पालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची अत्यंत गरज असताना त्याकडे सरकारचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. सध्या डिचोली पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे साखळी पालिकेचा अतिरिक्त ताबा आहे. आठवड्यातील दोन दिवस ठरलेले असताना, मुख्याधिकारी आपल्या मर्जीनुसार हवे तेव्हा पालिकेत येतात आणि आपल्या मर्जीप्रमाणे वागतात. त्यामुळे प्रशासकीय कामे अडून पडतात. विकासकामांसंबंधीचे ठरावही पुढे नेता येत नाहीत.
असे धर्मेश सगलानी यांनी सांगितले. या प्रकरणी पालिका प्रशासन संचालनालयाकडे तक्रार केली आहे. त्यावरील सुनावणी सुरु असली, तरी न्याय मिळण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला अनुसरून न्यायालयाने सरकारला तसेच सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. येत्या 14 रोजी न्यायालयात यावरील सुनावणी होणार आहे. अशी माहिती धर्मेश सगलानी यांनी दिली.
विरोधकांकडून नाहक आरोप
विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप नाहक असल्याचे नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी म्हटले आहे. पालिकेचा कारभार स्वच्छ आणि सुरळीतपणे चालविण्यास आमचा गट समर्थ असल्याचा दावाही त्यांनी केला. विरोधकांकडे सत्ता असताना सध्याच्या परिस्थितीत गरज नसताना बेकायदेशीररित्या कामगारांची भरती करण्यात आली आहे. असा दावा श्री. पार्सेकर यांनी केला. अनावश्यक कंत्राटी कामगारांना पगार देण्याचा प्रश्नच येत नाही. असेही श्री. पार्सेकर यांनी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनीही विरोधकांकडून होत असलेले आरोप फेटाळून लावले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.