

गोव्यात देवस्थानांमध्ये होत असलेल्या चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावकडे जाणाऱ्या अनमोड घाट परिसरात असलेल्या प्रसिद्ध दूधसागर देवालयात अज्ञात चोरट्यांनी फंड पेटी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दूधसागर देवालय हे घाट परिसरात असल्याने रात्रीच्या वेळी येथे वर्दळ कमी असते. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील फंड पेटी फोडली. फंड पेटीत किती रक्कम होती, याचा नेमकी माहिती अजून समोर आलेली नाही. सकाळी फंड पेटी फोडलेली दिसून आली, त्यानंतर ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
या प्रकरणाचा तपास कुळे पोलिसांकडून सुरू असून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, डोंगराळ आणि जंगल भाग असल्याने तपासात अडचणी येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कुडचडे येथील कामराळ भागातील ‘बाबा मंदिरा’त मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच आता दूधसागर देवालयातील चोरी उघडकीस आल्याने देवस्थानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, मंदिर परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.