

पणजी: साळगाव पोलिसांनी वाहन चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून एका सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेली एक स्कूटर आणि इतर सहा नादुरुस्त वाहने हस्तगत केली. या प्रकरणाची सुरुवात 2 फेब्रुवारी 2026 रोजी झाली, जेव्हा फातोर्डा येथील रहिवासी अय्यान खान यांनी साळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, पर्वरी येथील आरजी रुग्णालयाजवळ उभी केलेली त्यांची 'होन्डा एव्हिएटर' (क्रमांक GA-08-AM-8647) ही स्कूटर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली होती.
तक्रार प्राप्त होताच साळगाव पोलिसांनी वेगाने तपास चक्रं फिरवली. साळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सर्वेश भंडारी आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरु केला. या पथकात हेड कॉन्स्टेबल वासुदेव महाले, विशांत मायेकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तांत्रिक पुराव्यांच्या आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अखेर 48 वर्षीय सुनील दीनानाथ हळदणकर याला ताब्यात घेतले. सुनील हा मूळचा म्हापसा येथील रहिवासी असून, त्यानेच ही स्कूटर चोरल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संशयित सुनीलला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून केवळ अय्यान खान यांची स्कूटरच नाही, तर इतर सहा वाहने देखील जप्त केली. अधिक तपासात असे स्पष्ट झाले की, जप्त केलेली काही वाहने इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्याची नोंद आहे. यावरुन हा आरोपी संघटितपणे वाहन चोरी करत असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे.
उत्तर गोव्याचे (North Goa) पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर आणि पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या देखरेखीखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. न्यायालयाने संशयित सुनील हळदणकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस त्याच्याकडून आणखी किती वाहने चोरली आहेत आणि त्याचे कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणार आहेत. साळगाव पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे वाहन चोरांच्या टोळीवर मोठा वचक बसला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.