
पणजी: राज्य सरकार संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात व्यस्त असतानाच, गोव्यातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी वाहतूक विभागाला कोणत्याही क्षणी घेराव घालण्याची रणनीती आखली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता जुन्ता हाऊस येथील वाहतूक विभागाजवळ मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाणार आहे.
यामध्ये २ हजारांहून अधिक चालक सामील होण्याची शक्यता आहे. १८ जून रोजी हजारो चालकांनी एकत्र येण्याची घोषणा केली होती. सरकारनेही कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवून तयारी केली होती. मात्र, नियोजित आंदोलन झालेच नाही.
या खेळीमागे सरकारची प्रतिक्रिया तपासण्याचा हेतू होता, अशी कबुली टॅक्सी व्यावसायिक संघटनांनी दिली आहे. सरकार घाबरते का, याची परीक्षा पाहिली गेली आणि सरकार गोंधळलेले दिसले, असे एका टॅक्सीचालकाने सांगितले.
सरकारने हे धोरण पर्यटकांना सुरक्षित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी असल्याचे सांगितले. डिजिटल माध्यमातून ट्रॅकिंग, दर पद्धतीतील पारदर्शकता आणि पर्यटकांचा विश्वास हे त्यांचे प्रमुख मुद्दे आहेत. मात्र, हे कारण देताना स्थानिक टॅक्सीचालकांच्या पोटावर लाथ मारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे टॅक्सी संघटनांचे म्हणणे आहे.
या आंदोलनामागे २० मे रोजी सरकारने प्रसिद्ध केलेली अॅप आधारित टॅक्सी अॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. स्थानिक टॅक्सीचालकांच्या मते, या धोरणामुळे बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना व चालकांना गोव्यात शिरकाव करता येईल आणि स्थानिकांचा रोजगार धोक्यात येईल, असे टॅक्सीचालकांचे मत आहे.
टॅक्सी व्यावसायिकांचा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आम्ही यावेळी मागे हटणार नाही. अचानक येऊ पण सांगून जाऊ. सरकारने जर स्थानिकांचे हित डावलले, तर आम्ही माघार घेणारच नाही.
चेतन कामत, टॅक्सी व्यावसायिक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.