Goa Politics: खरी कुजबुज; आय लव्ह साखळी!

Khari Kujbuj Political Satire: चर्चील आलेमाव आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी राजकारण हा जरी त्‍यांचा मुख्‍य व्‍यवसाय असला तरी फुटबॉल प्रेम हे या घराण्‍यासाठी त्‍यापेक्षाही मोठे असल्‍याचे सांगितले जाते.
Goa Latest Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

आय लव्ह साखळी!

सखळीचे नेतृत्व जेव्हापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आले, तेव्हापासून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. साखळीचे बसस्थानक हे राज्यातील सुंदर बसस्थानकांपैकी एक ठरत आहे. सरकारी महाविद्यालय तसेच इतर अनेक ठिकाणी चांगले काम सुरू आहे. परंतु सध्या मोठ्या शहरांमध्ये आय लव्ह .... असे लिहिलेले फलक असतात, तसेच आता साखळीत दोन ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर असलेला मुख्यमंत्र्याचा फोटो अनेकांचे लक्ष वेधत असून या फलकाची चर्चा असून साखळीच्या विकासाची घौडदौड या फलकाच्या माध्यमातून दिसत असल्याची चर्चा साखळीत सुरू आहे... ∙∙∙

चर्चिल पुन्‍हा जोमात

चर्चील आलेमाव आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी राजकारण हा जरी त्‍यांचा मुख्‍य व्‍यवसाय असला तरी फुटबॉल प्रेम हे या घराण्‍यासाठी त्‍यापेक्षाही मोठे असल्‍याचे सांगितले जाते. फुटबॉल क्‍लब चालू ठेवण्‍यासाठी मी माझ्‍या जमिनी विकल्‍या असे चर्चील आलेमाव नेहमीच सांगतात. अशा या चर्चील आलेमावच्‍या क्‍लबने नुकतीच आयलीग फुटबॉल स्‍पर्धा जिंकली. त्‍यामुळे आता चर्चील ब्रदर्स आयएसएल स्‍पर्धेसाठी पात्र झाले आहेत. यामुळे चर्चील पुन्‍हा एकदा फॉर्मात आले असून राजकीयदृष्‍ट्याही ते आता अधिक सक्रिय झाले आहेत. चर्चील कन्‍या वालंका हिच्‍या शब्दात सांगायचे झाल्‍यास चर्चील ब्रदर्स आयलीग जिंकल्‍यामुळे स्‍वत: चर्चील वीस वर्षांनी तरुण झाले आहेत. ∙∙∙

टॅक्‍सीवाल्‍यांचा पुळका?

बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांच्‍यावर चर्चील आलेमाव जेवढी टीका करत नाहीत, त्‍याहीपेक्षा अधिक टीका चर्चील यांचे पुतणे वॉरन आलेमाव हे करतात. वेंझी व्‍हिएगस हे फक्‍त समाज माध्‍यमावर दिसणारे नेते अशी टीका वॉरन नेहमीच करत आले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी बाणावलीच्‍या टॅक्‍सी चालकांच्‍या प्रश्‍नावरून वेंझी आणि वॉरन या दोघांनी एकत्रितरीत्या पोलिस स्‍थानकावर भेट देऊन टॅक्‍सीवाल्‍यांचे प्रश्‍न मांडले. आता हे दोन्‍ही नेते टॅक्‍सीवाल्‍यांच्‍या पुळक्‍यातून एकत्र आले, की हा फक्‍त एक देखावा, हे आगामी काही दिवसात हे स्‍पष्‍ट होणारच म्‍हणा. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांची बॅटिंग

मये येथे रेल्वे स्थानक नको, असा सूर उमटत आहे. नार्वे येथे कोळसा वाहतुकीसाठी जेटी नको, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. याआधी मये येथे खासगी विद्यापीठाला जागा देण्यास विरोध झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठाम भूमिका घेतली. मये येथे रेल्वे स्थानक झाले, तर स्थानिक परिसराच्या विकासाला ते कसे साह्यकारी ठरेल, हे त्यांनी स्पष्ट केले. मयेत खासगी विद्यापीठ आल्यानंतर होणाऱ्या गावाच्या विकासाकडे त्यांनी लक्ष वेधले. विकासाचा ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना गावकऱ्यांचे मन वळवण्यासाठी अशा सातत्यपूर्ण भूमिकेची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा ही भूमिका जाहीरपणे मांडत सरकार यावर ठाम असल्याचा संदेश ग्रामस्थांना जरूर दिला आहे.∙∙∙

बाऊन्सर्स पुरवणाऱ्यांना अच्छे दिन!

गोव्यात सध्या बाऊन्सर्सना अच्छे दिन आल्याचे दिसते. फक्त पोलिस तक्रार झाल्यानंतर होणारी कारवाई लक्षात ठेवून हे काम करायचे हे मात्र त्यांना ध्यानात घ्यावे लागेल. काही आठवड्यांपूर्वी एका विदेशी महिलेच्या फ्लॅटप्रकरण असो की, साळगाव येथील घर पाडण्याचा प्रकार असो त्यावेळी बाऊन्सर्सचा उपयोग संबंधितांनी करून घेतला होता. धष्टपुष्ट बांधा असणारे युवक बाऊन्सर्स म्हणून आणल्यानंतर त्यांच्या धाकामुळे विरोध करण्यास फारसे कोणी पुढे येत नाहीत. आता मांद्रेतील एका प्रकरणात बाऊन्सर्सचा वापर करण्यात आले. एका स्थानिक मुंडकार (भाडेकरू) कुटुंबांवर दबाव आणून तो भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका रिसॉर्ट प्रकल्पासाठी हा भूखंड हवा आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही, शुक्रवारी सुमारे ४० बाउन्सर्स त्याठिकाणी नेमले होते. या सर्व प्रकरणावरून बाऊन्सर्स पुरवणाऱ्या कंपन्यांना अच्छे दिन आलेत असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

तानावडेंची परीक्षा

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग शुल्कात भरमसाठ वाढ केल्याचा विषय आता खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यापर्यंत पोचला आहे. टॅक्सी व्यावसायिकांनी आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासमोर हा विषय मांडला होता. त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही दिले. त्यानंतर आता तानावडे यांनी हा प्रश्न सोडवावा यासाठी टॅक्सी व्यावसायिकांनी त्यांची भेट घेतली आहे. आता कोणामुळे हा प्रश्न सुटतो याकडे टॅक्सी व्यावसायिकांचेच नव्हे, तर इतरांचेही लक्ष लागले आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, मांडवीत 112 मीटर कॅसिनो जहाज?

विरोधासाठी व्हॉट्स ॲपवीर सक्रिय

मराठी भाषा निर्धार समितीवर टीकेची जोरदार ‘बॅटिंग’ सध्या चालू आहे. जे लोक रोज मराठी वर्तमानपत्र वाचतात, तेच म्हणे समितीच्या विरोधात बोलत आहेत, म्हणजे काय राव हे? ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ असं काही तरी आहे. आता हे विरोधी मंडळ एकदम ‘सक्रिय’ झाले असून व्हॉट्सॲप ग्रुपवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘महा-सक्रिय’ कार्यक्रम व्हॉट्सअँप वीरांनी चालू केला आहे. त्यामुळे कुणीतरी ‘फूस’ लावली की लगेच ‘फटाके’ फुटायला लागतात. या सगळ्याच्या मागे कुणीतरी ‘मास्टरमाइंड’ आहे आणि लोकांना भडकवायचे असा एका राजकीय नेत्याचा प्लान असल्याची चर्चा सुरू आहे. आता हे ‘मास्टरमाइंड’ कोण? याची चर्चा अजून ‘गुपित’ आहे! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, स्मार्ट कामे; वाहनचालकांना दणके!

सहनशीलता संपते तेव्हा...

बेतालभाटी हे दक्षिण गोव्यातील किनारी भागात असलेले महत्त्वाचे गाव. आता या गावाची धारण क्षमता संपल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आणखीन प्रकल्प नको असा फलकच त्यांनी गावात लावला आहे. तो सध्या चर्चेचा ठरला आहे. बांधकाम व्यावसायिक, प्रवर्तक, विकासक यांनी गावातील जमीन आपल्या जबाबदारीवर विकत घ्यावी असा ठळक इशारा त्यांनी फलकावर दिला आहे. सध्या त्‍या फलकाचे कौतुक समाज माध्यमांवर होताना दिसत आहे. अनेक गावांत आणखीन प्रकल्प नको, अशी चर्चा स्थानिक पातळीवर असते. ग्रामसभांतूनही मोठ्या प्रकल्पांना विरोध केला जातो. या मुद्यावर यापुढे पंचायत निवडणुका लढवल्या जातील असे दिसते. फोंडा तालुक्यातील कुंकळ्ये गावात असाच फलक याआधी लावण्यात आला होता. आता असे फलक सगळीकडे दिसले तरी आश्चर्य नको. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com