पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्थानिक टॅक्सी व्यावसायिक गेले काही दिवस आंदोलन करत आहेत. पेडणे तालुका नागरिक समितीने त्यांना अगदी सुरवातीच्या टप्प्यात दिलेला प्रस्ताव स्वीकारला असता तर आज आंदोलनाची वेळ आली नसती, अशी माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विमानतळाच्या उद्घाटनाच्या कालावधीवेळी तेथे राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिक येणार याची कल्पना समितीला आली होती. त्यामुळे त्यांनी ॲप तयार करून प्रवाशांना सेवा देण्यासाठी पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांना एकत्र आणण्याचे ठरवले होते. त्यासाठी ॲपचा खर्चही समितीने करण्याचे ठरवले होते.
टॅक्सी व्यावसायिकांनी या ॲपवर आपल्या टॅक्सीची नोंदणी करायची आणि प्रत्येक प्रवासी फेरीमागे केवळ एक रुपया समितीला सेवा शुल्क म्हणून द्यायचा, असेही समितीने काही टॅक्सी व्यावसायिकांना सांगितले होते.
ही संकल्पना काही टॅक्सी व्यावसायिकांना आवडली होती. पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिक म्हणून संघटितपणे व्यवसाय केल्यास कोणत्याही स्पर्धेला तोंड देणे शक्य होणार आहे, हे त्यांना समजले होते. मात्र, नंतर पुढे काय झाले कोणालाच समजले नाही आणि समितीकडे ॲप तयार करण्यासाठी कोणी संपर्कच साधला नाही.
ॲप घेऊन राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिक मोपा विमानतळावर पोचले आणि त्यांनी पेडण्यातील व्यावसायिकांचा व्यवसाय पळवणे सुरू केले आहे. पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिक आता ब्लू कॅब व अन्य अशा दोन गटात विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांना मोपावरील तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. पेडण्यातील सर्व टॅक्सी व्यावसायिकांनी एकत्र येत समितीचे ॲप स्वीकारले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती असेही बोलले जात आहे.
पेडणे तालुका नागरिक समिती टॅक्सी ॲप तयार करणार होती हे खरे आहे. आता तो विषयच राहिलेला नाही.
ॲड. सदानंद वायंगणकर, समितीचे तत्कालीन अध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.