
पणजी: राज्य सरकारने जाहीर केलेल्या गोवा वाहतूक संयोजक (ट्रान्सपोर्ट अॅग्रिगेटर) मार्गदर्शक तत्त्वे २०२५ यांचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने स्वागत करताना त्याला वेळेची गरज आणि राज्याच्या गतिशीलता प्रणालीसाठी एक प्रगतशील टप्पा ठरवले आहे.
"डिजिटल सुविधा, विश्वसनीयता आणि वाहतुकीतील सुलभता या आधुनिक व्यवसायासाठी केवळ गरजा नाहीत, तर त्या उत्पादनक्षमतेचे मुख्य आधार आहेत असे वा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज म्हणणे आहे.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने पत्रकात म्हटले आहे की, नियमनबद्ध अॅप-आधारित टॅक्सी सेवा ही आता लक्झरी नसून अपरिहार्यता बनली आहे.
चेंबरच्या मते या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये डिजिटल नवप्रवर्तनाला प्रोत्साहन देतानाच स्थानिक चालकांच्या हिताचीही योग्य तजवीज करण्यात आली आहे. चालकांना शासकीय दराने भाडे दिले जाणे, वेळेवर पैसे मिळणे, आरोग्य विमा आणि वाहनांसाठी अनुदान अशा तरतुदी आर्थिक आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवतात.
पर्यटन, उत्पादन, रिअल इस्टेट, किरकोळ व्यवसाय, लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्र अशा सर्व क्षेत्रांतील व्यावसायिकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित व विश्वसनीय प्रवासाची गरज भासते.
अॅप-आधारित टॅक्सी सेवा केवळ प्रवाससुलभता वाढवते असे नाही, तर कामकाजात कार्यक्षमतेला चालना देत, गुंतवणुकीस पोषक असे वातावरण तयार करते.
शेअर मोबिलिटीला चालना देऊन खासगी वाहनांवरील अवलंबन कमी करणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे या शाश्वत शहरी विकासाच्या दृष्टीनेही या धोरणाचे स्वागत करण्यात आले आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन चेंबरने केले असून अॅग्रिगेटर कंपन्या, चालक आणि नागरिक यांनी या प्रणालीच्या यशासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यातील भविष्यातील आर्थिक प्रगती आणि जीवनमान उंचावण्यासाठी एक पारदर्शक, न्याय्य आणि तंत्रज्ञानाधिष्ठित वाहतूक प्रणाली उभारणे ही आता वेळेची गरज बनली आहे, असे चेंबरचे स्पष्ट मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.