मोरपिर्ला शाळेचे यश इतरांसाठी प्रेरणादायी

सातव्यांदा दहावीचा 100 टक्के निकाल : ग्रामस्थांतर्फे विद्यार्थी, शिक्षकांचे कौतुक
Students
Students Dainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

केपे : मोरपिर्ला हे तसे खेडे, गावातील बहुतेक लोक शेती करणारे, पावसात शेतात राबून पिकवायचे आणि वर्षभर त्यावर गुजराण करणे, ही त्यांची नेहमीची वहिवाट. या गावात जायला अजूनही एकच कदंब बस आहे. त्यामुळे जवळच्या केपे गावात येणे हेही त्यांच्यासाठी तसे मुश्किलच. मात्र गोव्यातील शैक्षणिक क्षेत्रात या गावाने इतिहास रचला आहे. दहावीची निकाल सतत सात वर्षे 100 टक्के लागत आहे.

Students
गोव्यातील रस्ते खोदलेल्या अवस्थेत; वाहन चालकांची गैरसोय

या गावातील जे सरकारी विद्यालय आहे. त्यातील एकही विद्यार्थी शिकवणी घेण्यासाठी जात नाही. कारण गावात तशी सोयच उपलब्ध नाही. गावातील जुनी पिढीही फारशी शिकलेली नाही. त्यामुळे घरातून त्यांना मार्गदर्शन मिळणे कठीणच, असे असतानाही या विद्यालयातील सर्व विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पास झाले आहेत. हे फक्त यावेळीच घडत आहे, असे नसून मागची सतत सात वर्षे हे विद्यालय शंभर टक्के निकाल देण्याची परंपरा चालू ठेवून आहे. ग्रामस्थांतर्फे विद्यार्थी, शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.

या विद्यालयातून 40 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 9 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 23 प्रथम श्रेणीत तर 8 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. सलोनी गावकर ही विद्यार्थिनी 84.5 टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिली आली. प्रज्योत गावकर (83.16 टक्के), रोलीशा वेळीप (82.16 टक्के), स्वयम वेळीप (81.33 टक्के), सानिया वेळीप (79.33 टक्के), श्रेया वेळीप (79 टक्के), स्वप्नेश वेळीप (79 टक्के) या विद्यार्थ्यांनी उंच भरारी मारली.

हे यश सहजासहजी त्यांना प्राप्त झालेले नाही, असे या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोरेना मिरांडा सांगतात. या विद्यार्थ्यांना घरी एव्हढे काम असते, की त्यांना अभ्यासावर लक्ष देणेही शक्य होत नाही. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांना शाळेतच बसवून त्यांच्याकडून आम्ही अभ्यास व अभ्यासाची उजळणी करून घेत होतो, असे त्यांनी सांगितले.

या विद्यालयात शिकायला येणारे बहुतेक विद्यार्थी आदिवासी समाजातील असून त्यांना अभ्यासासाठी शाळेवरच अवलंबून राहावे लागते. मात्र या विद्यालयातील शिक्षकही एक मिशन हाती घेतल्याप्रमाणे त्यांना शिकवितात. मागची सात वर्षे शंभर टक्के निकाल आम्ही त्यामुळेच देऊ शकलो असे मिरांडा यांनी सांगितले.

Students
मडगावातही ऑनलाईन सेक्स रॅकेट्सचा सुळसुळाट

हे विद्यार्थी फक्त शिक्षणातच चमकले आहेत, असे नसून त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात भाग घेऊन तिथेही आपली चमक दाखवली आहे. ही बहुतेक मुले ''फस्ट लर्नर'' या व्याख्येत बसणारी असल्याने त्यांचे हे यश स्पृहणीय असेच म्हणावे लागेल.

मोरपिर्ला गावातील रितेश इंडवाल आणि रॉकी इंडवाल या दोन विशेष क्षमतेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा पराक्रम केला. त्याची ही कौतुकास्पद कामगिरी असल्याचे शिक्षकांनी सांगितले. घरची गरिबी आणि शारीरिक व्यंग यावर मात करून त्यांनी हे यश मिळविले. या दोन विद्यार्थ्यांनाही मोरेन मिरांडा आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनीच साहाय्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com