

पणजी: वाडेनगर-वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडने मागील खाडीतील गाळ उपसण्यास होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नौदल आणि तटरक्षक दलाच्या नौकाबांधणीचा व्यवसाय वाढल्याने महाराष्ट्राचा पर्याय स्वीकारल्याची माहिती महाराष्ट्र मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, जयगड खाडी परिसरातील सुमारे ६६० एकर भरती-ओहोटी क्षेत्र या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या भागीदारीत हा प्रकल्प विकसित करण्याचा विचार असून, प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत.
मात्र, या प्रकल्पासाठी किती गुंतवणूक केली जाणार आहे, याबाबत गोवा शिपयार्डने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. वाढत्या मागणीमुळे वास्को येथील विद्यमान सुविधा अपुऱ्या पडण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वतंत्र आणि अधिक क्षमतेच्या नव्या शिपयार्डची उभारणी आवश्यक ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच शिपयार्डच्या मागील खाडीत गाळ उपसण्याच्या प्रस्तावाला स्थानिक स्तरावर विरोध होत असल्याने विस्ताराच्या योजना अडचणीत आल्या आहेत.
अत्याधुनिक सुविधांवर भर
जयगडमधील प्रस्तावित प्रकल्पात मोठ्या जहाजांच्या बांधणीसाठी जलकिनारी सुविधा, अत्याधुनिक साहित्य हाताळणी व्यवस्था, मॉड्युलर बांधकाम पद्धती, आधुनिक सागरी पायाभूत सुविधा आणि डिजिटल जहाजबांधणी प्रणाली विकसित केली जाणार आहे. पर्यावरणपूरक विकासांतर्गत हरित इमारती, सौरऊर्जा आणि पावसाचे पाणी साठवण व्यवस्थेचाही समावेश असेल.
मास्टर प्लॅन, आराखडा
प्रकल्पाचा तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अहवाल, मास्टर प्लॅन, सविस्तर प्रकल्प अहवाल, अंमलबजावणी आराखडा आणि खर्चाचा अंदाज तयार करण्यासाठी जर्मनीतील ‘इन्रोस लॅकनर एसई’ या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीची निवड करण्यात येत आहे. गोवा शिपयार्डच्या निविदेत कंपनीने सुमारे ६५ कोटी रुपयांची सर्वांत कमी बोली लावली असून, तिची निवड होण्याची शक्यता आहे. निधी उभारणीचे पर्याय सुचविण्याची जबाबदारीही या कंपनीकडे असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.