

वास्को: येथील गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘अजित’ या अत्याधुनिक वेगवान गस्ती जहाजाचे आज भारतीय तटरक्षक दलाचे मुख्य एकात्मिक वित्त सल्लागार डॉ. शिरिष चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. चौधरी यांनी हा दिवस सागरी संरक्षण इतिहासातील आणखी एक सुवर्ण क्षण असल्याचे सांगितले.
गोवा शिपयार्डच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, ऑपरेशनल संचालक रिअर अडमिरल (निवृत) नेल्सन डिसौझा, वित्त संचालक जहांगीर आलम अन्सारी, भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाचे उपमहानिरीक्षक मनोज भाटिया यांच्यासह भारतीय तटरक्षक दलाचे व गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. चौधरी यांनी गोवा शिपयार्डच्या कामगिरीचे कौतुक केले. हे जहाज म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’ यांचा विजय असल्याचे ते म्हणाले. ‘अजित’ हे केवळ एक जहाज नसून ते देशाची स्वदेशी तंत्रज्ञान व इंजिनिअरिंग कौशल्याचे एक उत्कृष्ट प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. या जहाजाचा ६५ टक्क्यांहून अधिक हिस्सा स्वदेशी मालापासून तयार करण्यात आला आहे. ज्यामुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत व्हिजनला मजबूती मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तस्करी, चाचेगिरीला बसणार आळा
आजच्या युगात सागरी सुरक्षा व सामरिक महत्त्व आहे. सध्याच्या जागतिक व प्रादेशिक परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या विशाल सागरी सीमांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. हे ५१.४३ मीटर लांबीचे व अत्याधुनिक वेगवान गस्ती जहाज आधुनिक शस्त्रास्त्रे व प्रगत नेव्हिगेशन, नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज आहे. हे जहाज किनारी देखभालीसाठी तसेच तस्करी, चाचेगिरी व अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी साहाय्य करेल.
शोध, बचाव कार्यही होणार जलद
मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी, शोध व बचाव कार्य जलदगतीने पूर्ण करण्यासाठी हे जहाज अत्यंत प्रभावी ठरणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले. कमांडंट मनीष तालन यांच्यासह सहा अधिकारी व ३५ नाविक या जहाजावर तैनात असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.