

पणजी: आगामी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांवरील शॅकसाठी परवाने व आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया यंदा वेळेत पूर्ण होत असून ऑक्टोबरपूर्वीच शॅक व्यावसायिकांना परवाने मिळणार असल्याचे संकेत आहेत. पर्यटन विभागाने नोंदणीची प्रक्रिया लवकर पूर्ण केल्याने शॅक उभारणीसह आवश्यक तयारीसाठी व्यावसायिकांना पुरेसा अवधी मिळणार आहे.
शॅक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने पर्यटन संचालक केदार नाईक यांची भेट घेऊन समुद्रकिनाऱ्यांवरील शॅकच्या जागांचे सीमांकन तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. सीमांकनाची प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास शॅक उभारणीला सुरुवात करता येईल आणि हंगामापूर्वी किनारे आवश्यक सुविधांसह सज्ज करता येतील, असे व्यावसायिकांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच शॅकच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे शॅक उभारणी, आवश्यक सुविधा, कर्मचारी व्यवस्था आणि इतर पूर्वतयारीसाठी व्यावसायिकांना अधिक वेळ मिळत असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
परंपरागत शॅक व्यावसायिकांना सातत्याने सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचेही खंवटे यांनी स्पष्ट केले. अनेक व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायाशी जोडलेले असून, त्यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शॅक परवान्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सरकारकडून प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूण ३०४ अर्जदार पात्र
यंदा शॅकसाठी एकूण ३०४ अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ ३३ जणांनी शुल्क भरून शॅक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित वाटपधारकांकडूनही लवकरच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शॅक व्यावसायिकांना सहकार्य आवश्यक
“परंपरागत शॅक व्यावसायिकांना सातत्याने सहकार्य मिळणे आवश्यक आहे. अनेक व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायाशी जोडलेले असून, त्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शॅक परवान्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे.”
— रोहन खंवटे, पर्यटनमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.