Sesa Goa Mine: मये, शिरगाव आणि डिचोलीतील खाण कामास स्थानिकांनी विरोध करू नये यासाठी सेझा गोवा कंपनीकडून सामाजिक कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी ‘गोमन्तक’ला दिली आहे.
मयेतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत खाणमाती शिरल्याप्रकरणी त्यांना २०१६ पासून देय असलेली भरपाई देण्याची तयारी दर्शविण्यात येत आहे. ही पूर्ण रक्कम मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असून तसे निवेदन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालय व स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांना सादर केले आहे.
मुळगाव येथे खाणकामास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर कंपनीला जाग आली आहे. त्यामुळे मये गावात संगणक वर्ग सुरू करण्यात आले असून आरोग्य तपासणीसाठी व्हॅनही फिरवली जात आहे. खाणकाम सुरू असताना व बंद झाल्यानंतर कंपनीने गावातील विकासकामांकडे पाठ फिरवली होती.
आता ११ रोजी होणाऱ्या जनसुनावणीत ग्रामस्थांनी विरोधी भूमिका घेऊ नये यासाठी हे प्रयत्न चालल्याचे दिसून येते. मयेतील शेतकऱ्यांची जमीन खाणमातीने व्यापली आहे. त्यांना ती माती हटवेपर्यंत दरवर्षी भरपाई द्यावी, यासाठी डिचोलीच्या मामलेदारांनी चारवेळा आदेश दिला होता.
मात्र, त्याचे पालन कंपनीने केले आहे. आता या शेतकऱ्यांना कंपनीकडून ५ लाख ७९ हजार रुपये येणे आहेत. ती रक्कम मिळावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.
अनेक गावांतून विरोध
खाण कामाला मुळगाव येथे विरोध झाल्यानंतर आता मये, लामगाव, पिळगाव, शिरगाव आणि अडवलपाल येथूनही विरोध होऊ लागला आहे. तो होऊ नये यासाठी मये गावात कंपनीकडून काही कामे केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रसंगी उच्च न्यायालयात
मुळगाव खाजन शेतकरी संघटना, गावकरवाडा-मये शेतकरी समूह आणि इतर संघटनांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खाणकाम नको यावर मयेतील शेतकरी ठाम आहेत. त्यांनी प्रसंगी उच्च न्यायालयातही दाद मागण्याची तयारी ठेवल्याची माहिती देण्यात आली.
2016 पासून प्रतीक्षेत : गावकरवाडा-मये येथील विनायक शेट व इतरांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २२ शेतकऱ्यांना सेझा गोवा मायनिंग कंपनीने २०१६ पासून आजवर नुकसान भरपाई दिलेली नाही. मामलेदारांनी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी तसा आदेशही दिला आहे. त्यांनी याआधी ६ डिसेंबर २०२२ रोजीही निवेदन सादर केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.