Goa Politics: खरी कुजबुज; कोकणीच्या नावाने इंग्रजी शाळा

Khari Kujbuj Political Satire: गोव्यात सध्या मास्टरमाइंड विषय गाजत आहे. माजोर्डा येथील धीरयो प्रकरणीही एक मास्टरमाइंड आहे. सोमवारी या धीरयोत एकाचा बळी गेला.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
Published on
Updated on

कोकणीच्या नावाने इंग्रजी शाळा!

‘डेबोनियर’ नावाचा एक इंग्रजी मॅगझिन प्रकाशित होते.केवळ प्रौढांसाठी असलेले हे मॅगझिन काही किशोरवयीन विद्यार्थी आपल्या पालकांना न कळावे म्हणून पाठ्यपुस्तकाच्या आत घालून वाचतात. बिचाऱ्या पालकांना वाटते, आपला पोरगा अभ्यास करतो. असाच प्रकार आता काही शाळा चालक करायला लागलेत. सरकारने नवीन इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान देणे बंद केले आहे. काहीं शाळा चालकांनी सरकारी अनुदान मिळविण्यासाठी नावाला कोकणी शाळा उघडल्या.मात्र, सरकारला व शिक्षण खात्याला फसवून या शाळा कोकणीच्या नावाने इंग्रजी शिकवितात, हे सिद्ध झाले आहे. यंदा गोव्यात एससीईआरटी तिसरी ते आठवीपर्यंत समान परीक्षा व समान प्रश्‍नपत्रिका काढणार आहे. काही सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळांनी कोकणी माध्यमातील शाळांनी इंग्रजी प्रश्‍नपत्रिका मागितल्या आहेत. महत्वाचे म्हणजे शिक्षण खात्याने व ‘एससीईआरटी’ने त्यांची मागणी मान्य केली आहे. तुम्ही फसवा आम्ही फसतो, अशातला हा प्रकार. ∙∙∙

धीरयोचा मास्टर माईंड कोण?

गोव्यात सध्या मास्टरमाइंड विषय गाजत आहे. माजोर्डा येथील धीरयो प्रकरणीही एक मास्टरमाइंड आहे. सोमवारी या धीरयोत एकाचा बळी गेला व कोलवा पोलिसही खडबडून जागे झाले. संशयितांवर गुन्हा नोंदवून मोकळेही झाले. यातील काही जणांवर गुन्हा नोंद करू नये, म्हणून एक राजकारणी पोलिसांवर दबाव आणत होता. सध्या हा राजकारणी भाजपच्या निशाण्यावर आहे. ठाण्यातील काही पोलिसांनी ही बाब ही हळूच आपल्या भाजप नेत्यांच्या कानी घातली. लगेच वरून एका भाजप नेत्याने बड्या सायबाला फोन करून, कुणालाही सोडू नका, असे बजावले व पोलिसांनीही सर्व संशयितांवर गुन्हा नोंद करून आपले कर्तव्य इमानइतबारे पार पाडले. ∙∙∙

‘कदंब’ची अशीही साडेसाती

ऐशींच्या दशकांत सुरु झालेले सरकारी मालकीचे कदंब परिवहन महामंडळ जरी अजून स्वतःच्या पायावर उभे राहू शकलेले नसले तरी खेडेगावांतील लोकांचा सार्वजनिक वाहतुकीसाठींचा तो मोठा आधार निश्चितच ठरलेला आहे. या कदंबमुळे राज्यांतील खासगी बसवाल्याची मिरासदारी मात्र मोडली आहे, हे मान्य करावेच लागेल. तर अशा या कदंबच्या इलेक्ट्रीक बसेसच्या चालकांचे वेतन वाढविण्याची मागणी करून संघटनेने येत्या १ आॅक्टोबर पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. कदंबचा वर्धापनदिन दस-याला म्हणजे २ आॅक्टोबरला आहे. मग त्याच्या आदल्या दिवसापासून संपावर जाऊन ही मंडळी काय दर्शवणार आहे, अशी विचारणा सर्वसामान्य करताना दिसत आहेत. ‘कदंब’ने इलेक्ट्रीक बसेस आणल्या त्यामुळे इंधनात बचत होत असली तरी त्या बसेसना विशेषतः पणजीत झालेले अपघात पाहता या बसेस महामंडळासाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत आहे. ∙∙∙

कोकणी भाषा मंडळाला रवींची ‘ॲलर्जी’?

कोकणी भाषा मंडळाचा ३० सप्टेंबर रोजी वर्धापन दिन फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरात साजरा होणार आहे. हा वर्धापनदिन फोंडा येथे प्रथमच साजरा होत आहे. पण मुद्दा तो नाही. मुद्दा आहे, तो कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे नाव नसणे हा. राजभाषा संचालनालय म्हणजे गोवा सरकारच्या सहाय्याने साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमाला स्थानिक आमदाराला डावलणे म्हणजे ‘प्रोटोकॉल’ ला अक्षता लावण्यासारखेच. विशेष म्हणजे निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांचे नाव ठळकपणे झळकताना दिसत आहे. आता राजीव गांधी कला मंदिराचे प्रणेतेच रवी आहेत, हे कदाचित कोकणी भाषा मंडळाला माहीत नसावे, पण ते फोंड्याचे आमदार आहेत, हेही माहीत नाही का? का मंडळाला रवींची ‘ॲलर्जी’तर नाही ना? हे आम्ही नाही, रवींच्या कार्यकर्त्यांसह फोंड्यातील कोकणी ‘मोगी’ही विचारू लागलेत, आता बोला!.. ∙∙∙

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या अफवा!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्या परिस्थितीत अमित पाटकर यांनी स्वीकारले, ती स्थिती पक्षाच्या कार्यकर्त्यांना नक्कीच माहीत असणार आहे. फारसा राजकीय अनुभव पाठीशी नसतानाही पाटकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्याविषयी पक्षातून अनेक अफवा पसरवल्या गेल्या आणि जातातही. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रभारी सचिव अंजली निंबाळकर या पाटकरांच्या पाठीशी खंबीर आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलासाठी कारणही सध्या काही नाही, तरीही शुक्रवारी गिरीश चोडणकर पुन्हा प्रदेशाध्यक्ष बनणार, अशी बातमी पसरवली गेली, ही बातमी अनेक समाजमाध्यमांतून फिरली. चोडणकरांनी हे वृत्त फेटाळले, आपल्याकडे तामिळनाडू व पुदुचेरीची जबाबदारी आहे तेथे आगामी विधानसभेची तयारी म्हणून काम सुरू आहे, असे असताना असे वृत्त देऊन नक्की कोणाला काय साध्य करायचे आहे? असा त्यांचा सवाल. पक्षाच्या नेतृत्वाने पाटकर यांच्याकडे विधानसभेपर्यंत प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे त्यामुळे बदलाची शक्यता त्यांनी नाकारलीही. पण सध्या राज्यात जे चालले आहे, त्यापासून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा तरी हा प्रयत्न नाही ना, अशी शंका चुकचुकते. ∙∙∙

रामा का बोलत नाही?

रामा काणकोणवरील जीवघेण्या हल्ल्याला नाही म्हटले तरी आता आठवडा उलटणार आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित हालचाल करून आठ संशयितांना अटक केलेली असली व त्यांची पोलिस कोठडी संपून न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली असली तरी या घटनेचे गूढ अजून उकलले गेलेले नाही. रामा अजूनही गोमेकॉत आहे व त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे, पण लोकांत चर्चा वेगळीच सुरू आहे. ते म्हणतात की, रामा भेटायला आलेल्यांशी घरच्या मंडळीशी बोलतो एवढेच नव्हे तर त्याचे फोटो माध्यमावर झळकतात. मग पोलिसांना तो जबानी का देत नाही, याचे कोडे लोकांना पडलेले आहे. हे प्रकरण असेच रखडत राहिले तर त्यातील हवा निघून जाईल व हल्ल्यामागील कारणही शितपेटींत पडल्यासारखे होणार तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

या शिक्षकांना झालय काय?

एक काळ होता जेव्हा ‘छडी लागे, छम छम विद्या येई घम घम’, असे म्हणायचे. आताच्या काळात हातात छडी घेणारा शिक्षक ‘व्हीलन’ ठरतो.विद्यार्थ्यांना हात लावल्यास शिक्षकांवर नोकरी गमावण्याची पाळी येते. काही शिक्षकच आपल्या सहकारी शिक्षकांना अद्दल घडविण्यासाठी काही विद्यार्थ्यांना व पालकांना हाताशी धरून घाणेरडा खेळ खेळतात. मुलानी शिक्षकांना शिव्या दिल्या व शिक्षकांवर विद्यार्थी धावून आले किंवा शिक्षकाच्या गाडीवर सडे टाकले तरी मुलांना दोषी ठरविता येत नाही.परवा सांगेतील एका मुख्याध्यापिकेने एका मुलावर हात उगारला म्हणून तीच्यावर एफआयआर दाखल झाला. विद्यार्थी शिको अथवा न शिको, चुकूनही त्यांना हात लावाल तर घात होणार म्हणून शिक्षकही आता जे होते ते भल्यासाठी म्हणून गप्प राहणार. यात नुकसान कोणाचे होणार ? ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

युतीसाठी काँग्रेस तयार होईल?

आम आदमी पक्षाने कॉंग्रेसशी युती करण्याची दर्शवली आहे, तसे विधान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी नुकतेच केले आहे. याचाच अर्थ असा लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांमध्ये दरी पडली होती, असे स्पष्ट होतेय. ‘आप’ने युतीसाठी हात पुढे केला आहे खरा, पण काँग्रेस त्यासाठी तयार होईल का? सासष्टी ही काँग्रेसचा गड. बाणावली व वार्का सोडले तर गोव्यातील इतर कुठल्याही भागात ‘आप’चे अस्तित्व दिसत नाही. या दोन्ही मतदारसंघात केवळ मते विभागून या पक्षाचे आमदार निवडून आले, असे काँग्रेसवालेच बोलतात. पण आता झेडपी निवडणुका जवळ येत असल्याने आप आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी अशी विधाने तर करीत नाहीत ना? तसेच सासष्टीतील मतदारसंघ ‘आप’ला देण्यास काँग्रेस राजी होईल का? हे प्रश्न काँग्रेस व ‘आप’ कार्यकर्त्यांना पडू लागलेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com