Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

Khari Kujbuj Political Satire: आज गणेश गावकर यांच्यात साधेपणा दिसला, ते ‘इनशर्ट’मध्ये दिसले. इतरवेळी ते ‘इनशर्ट’मध्ये नसतात, पण पांढऱ्या सदऱ्याला ते अधिक महत्त्व देताना दिसून आले आहे.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्र्यांचे भोजन

भाजपचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधत मुख्यमंत्री गुरुवारी दुपारी बेती येथील भोसले कुटुंबाच्या घरी पोचले. कार्यकर्त्यांच्या घरी भोजन असा या जन्मशताब्दी वर्षातील एक कार्यक्रम आहे. भोसले कुटुंबीय मुळापासून कट्टर भाजप प्रेमी. आपल्या घरी मुख्यमंत्री येणार यामुळे सारे हरखून गेले होते. त्यांच्या कुटुंबातील सर्वात युवा पिढी तर मुख्यमंत्र्यांसोबत जेवणाला बसण्यासाठी आग्रही होती आणि तो हट्टही पुरवण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवर छायाचित्रे अपलोड केली आणि मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्याच्या घरी जेवण घेतल्याची खबर सार्वत्रिक झाली. ∙∙∙

कदंबसमोरील डोकेदुखी

कदंब वाहतूक महामंडळ कर्मचाऱ्यांच्‍या मागण्या पूर्ण करताना मेटाकुटीस येत आहे. सध्या दिवसाकाठी अडीच लाख रुपये उत्पन्न वाढल्याचे जाहीर होताच आता माजी कर्मचारीही आपल्या थकबाकीसाठी आक्रमक झाले आहेत. दसऱ्याच्या दिवशी महामंडळाचा वर्धापनदिन असतो. त्यावेळी मुख्यमंत्री व वाहतूकमंत्री उपस्थित असतात. कदंब फायद्यात आणण्यासाठी घोषणा केल्या जातात. आता माजी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास यंदाही त्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. तसे होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ∙∙∙

कला अकादमीची कोकणी नाट्य स्पर्धा

यंदाची कला अकादमीची कोकणी नाट्य स्पर्धा २७ ऑक्टोबर पासून फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरात सुरू होत आहेत. यावेळची ही सुवर्ण महोत्सवी स्पर्धा. पण असे असूनही प्रवेशिका आहेत फक्त १८. त्यापैकी प्रत्यक्षात नाटके किती होणार हा भाग वेगळा. याबद्दल सध्या फोंड्याच्या रंगकर्मींमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या स्पर्धेची ४९ वी आवृत्ती मार्चमध्ये झाली होती. आता एकाच वर्षी दोन वेळा स्पर्धा झाल्यामुळे स्पर्धक कमी असल्याचे काहीजण बोलतात तर काहीजण याचे खापर योग्य प्रसिद्धी केली नसल्यामुळे कला अकादमीवर फोडताना दिसतात. आता यामागची कारणे शोधण्यापेक्षा स्पर्धा रंगतदार होवो, अशी अपेक्षा करणे, हेच योग्य नाही का? ∙∙∙

‘सुपारी’ घेता का ‘सुपारी’!

कला अकादमीच्या वादावर आवाज उठवणाऱ्या ‘कला राखण मांड’ या मंचाने ‘सुपारी’ आंदोलन छेडले होते. कारण तत्कालीन मंत्री गोविंद गावडे यांनी अभिनेता शरद पोंक्षे यांनी आपली बदनामी करण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप केला होता. त्याला कारणही तसेच होते, पोंक्षे यांच्या नाटकात जे रंगमंचावरील समस्यांमुळे अडथळे आले, त्याविषयी पोंक्षे यांना जाहीररित्या प्रेक्षकांची माफी मागावी लागली होती. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर सभागृहात असलेल्या समस्यांवर ‘सडेतोड’ बोल ऐकवले होते. यावरून गावडे यांनी त्यांच्यावर टीका केली होती, आता त्यांना कोणी काही बोलले तरी ‘सुपारी’ आठवते, असे दिसते. कारण त्यांच्यात आणि मंत्री रमेश तवडकर यांच्यातील शाब्दिक द्वंद्व काही थांबण्याचे नाव घेत नाही, असे दिसते. आज गावडे बोलले, की उद्या तवडकरांची प्रतिक्रिया किंवा तवडकर बोलले, की दुसऱ्या दिवशी गावडेंची प्रतिक्रिया ठरलेलीच आहे, असे सध्या दिसत आहे. शुक्रवारच्या मुलाखतीत गावडे यांनी तवडकरांनी आपली ‘सुपारी’ घेतल्याचा आरोप केला, त्यामुळे ‘कला राखण मांड’च्या सदस्यांनी सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा ती गावडेंनी नाकारली होती, याची आठवण होणे अपरिहार्यच. ∙∙∙

खाण सुरू करण्यासाठी

सभापतिपदी निवड झालेले गणेश गावकर हे ‘सेसा गोवा’चे ३० वर्षे कर्मचारी होते. कामगार नेते म्हणूनही त्यांनी कामगिरी केली आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा खाणी सुरू करण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. गोवा लोकसेवा आयोगाची मामलेदारपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले गावकर यांनी डॉक्टरेट मिळवल्याचे आश्चर्य वाटले नाही, असे सांगून त्यांनी कोणाला कोपरखळी मारली, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असले तरी विरोधकांचे म्‍हणणे ऐकून घेण्याची मानसिकता हवी, असे सांगत सरदेसाई यांनी गावकर यांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. ∙∙∙

तवडकर यांच्याकडून आभार

मंत्री रमेश तवडकर यांनी गुरूवारी नव्या सभापतींचे अभिनंदन करून आपल्या सभापतिपदाच्या कालवधीत विरोधकांसह सर्वांनीच सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. विजय सरदेसाई यांनी त्याआधी तवडकर हे निष्पक्ष वागत असताना सत्ताधाऱ्यांकडून दबाव येत असल्याने त्यांनी सभापतिपद त्यागून मंत्रिपद स्वीकारणे पसंत केले असा चिमटा काढला असतानाही तवडकर यांनी पोक्तपणे केवळ आभार मानत आपले विचार आटोपते घेतले. गावडेंवर बोलायचे नाही, असे तवडकर आधी म्हणाले होते. त्यामुळे तवडकर यांच्याकडून प्रगल्भतेचे दर्शन झाल्याची चर्चा आहे. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; युरीचा महिमा देशभर

एका दगडात अनेक पक्षी...

गोव्यात आय आय टी साठी अजून जागा निश्‍चित होऊ शकलेली नाही. आजवर ज्या जागा निवडल्या तेथे स्थानिकांनी विरोध केला व त्यामुळे सरकारने तो बेत सोडून दिला. विश्‍वजित बाबांच्या सत्तरीत मिळालेली येथील जागा सुध्दा अशा विरोधामुळे सोडावी लागली आहे खरी. आता कोडार येथील निवडलेल्या जागेचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री सुदिन ढवळीकर यांनी फर्मागुडीवर ‘आयआयटी’ संकुल उभारण्याचा व त्यासाठी सहकार्य करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे, त्याचे स्वागत होऊ लागले आहे. फर्मागुडीवर थोडी जमीन दिली, तर प्रश्‍न म्हणे सुटेल. त्यामुळे अन्य कोणी विरोध करण्याचेही कारण तर राहणारच नाही, तसेच विविध शैक्षणिक संस्थांमुळे फर्मागुडीवर हा शैक्षणिक हब होईल. सुदिनरावांचा हा प्रस्ताव ‘एका दगडात अनेक पक्षी मारणारा आहे’ अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: 'पोलिस सत्‍य निश्‍चित बाहेर आणतील'! काणकोणकर प्रकरणी विरोधकांचे राजकारण; CM, प्रदेशाध्‍यक्षांचा हल्लाबोल

गावकर ‘इनशर्ट’मध्ये!

विधानसभेच्या सभापतिपदी निवड झालेले गणेश गावकर आज सभापतिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यापूर्वी त्यांच्या निवडीनंतर आणि मंत्री-आमदारांनी त्यांच्यावर केलेल्या अभिनंदनाच्या वर्षावानंतर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याने त्यांना ‘प्रोटोकॉल’नुसार त्यांच्या खुर्चीपर्यंत सन्मानाने पोहोचवले. परंतु आज गणेश गावकर यांच्यात साधेपणा दिसला, ते ‘इनशर्ट’मध्ये दिसले. इतरवेळी ते ‘इनशर्ट’मध्ये नसतात, पण पांढऱ्या सदऱ्याला ते अधिक महत्त्व देताना दिसून आले आहे. कदाचित काहीजणांना गावकर सभापतिपदाच्या खुर्चीवर बसताना अंगात कोणत्या रंगाचा कोट घालणार, अशी उत्सुकता होती. पण त्यांनी ‘इनशर्ट’मध्येच जाणे पसंत केले. यावरून गावकरांना ‘कोट'' घालण्याची सवय नसावी, असे दिसते. अन्यथा मुख्यमंत्री आणि सभापती अधिवेशनाच्यावेळी कोणत्या रंगाचे कोट घालतात, याची चर्चा सुरू असतेच. त्यामुळे गावकर यापुढे कोट घालून येणार का, हे पुढील अधिवेशनात कळेलच. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com