

सांगे: पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून दक्षिण गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखले जाणारे साळावली धरण पूर्ण भरण्यासाठी अजून आठ मीटर उंचीचा जलाशय भरणे बाकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरण तुडुंब भरण्यासाठी समाधानकारक पाऊस पडला, तर जुलै महिन्याच्या शेवटी गोड बातमी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण त्यासाठी आता ऑगस्ट महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरवर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस पडत असल्यामुळे सर्वत्र नदी नाल्यांना पूर येऊन रस्ते, शेती, बागायती पाण्याखाली जात होती, परंतु यंदा पावसा प्रचंड तुटवडा असल्याने साळावली धरणाचा जलसाठा कमी आहे. आता ऑगस्ट महिन्यात पाऊस समाधानकारक पडल्यास जलाशय पूर्ण भरू शकतो. सप्टेंबरनंतर पाऊस कमी होत असल्यामुळे पुढील वर्षभर स्थिती बिकट बनण्याची भीती नागरिक आतापासून व्यक्त करू लागले आहेत.
धरणात ३४.६२ मीटर पाणी
गेल्या वर्षी याच दिवसात जलाशयाची उंची ४२ मीटर इतकी होती. दोन वर्षांपूर्वीही तितकीच होती, पण यंदा जलाशयातील पाण्याची उंची ३४.६२ मीटर इतकी आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत आठ मीटर उंचीचा पाणी साठा कमी आहे. एका बाजूने पावसाने दडी मारली आहे, तर दुसऱ्या बाजूने जलाशयातील पाणीसाठा घटत आहे. हे चित्र संपूर्ण जुलैपर्यंत असेच राहिल्यास स्थिती कठीण बनणार असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
गाळ, पालापाचोळा काढणे गरजेचे
यंदा पावसाने दडी मारल्यास पुढील वर्षी पाणीपुरवठा कमी होणार हे नक्की असून पर्याय म्हणून धरणाची उंची वाढवून अधिक पाणी साठविण्याचा प्रयत्न चुकीचा ठरणार आहे. कारण जितकी उंची वाढविली जाईल, तितकी गावे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यापेक्षा विस्तीर्ण अशा साळावली जलाशयात गेल्या चाळीस वर्षात कितीतरी पटीने माती आणि पालापाचोळा साचलेला आहे. जलसंपदा खाते जलाशयात किती मातीचा गाळ आणि पालापाचोळा साचला याचे गुगल सर्व्हेक्षण करते. त्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणी करून गाळ आणि पालापाचोळा काढण्याची गरज आहे.
उंची वाढवू नये
वाडे कुर्डी येथील ऊस उत्पादकांना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणारा नायकाबांध कितीतरी वेळा मातीच्या भरावासह वाहून गेला आहे. बांध फुटल्यानंतर ती माती जलाशयात साठते. त्यामुळे धरणाची उंची वाढविण्यापेक्षा जलाशय कोरडा आहे, तिथपर्यंतच्या भागातील गाळ उसपल्यास मुबलक पाणी साठा होऊ शकतो. यासंदर्भात कुर्डीवासीयांना विचारल्यास कोणत्या भागातील मातीचा भराव काढल्यास पाणी साठवता येते याची सविस्तर माहिती मिळू शकते. नाहक उंची वाढवून संकटात सापडलेल्या धरणग्रस्थांना समस्यांच्या गर्तेत ढकलण्यासारखे होईल याचा विचार होणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.