

पणजी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पुरणेककर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने आणखी दोघांना अलिबागजवळ अटक केली. निखिल यादव आणि नितेश पवार ऊर्फ भावड्या अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघे गोव्याच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईनंतर प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे.
या दोघांनी दडण्यासाठी गोव्याची निवड केली होती. त्यावरून गोवा हे गुन्हेगारांना सुरक्षित आश्रयस्थान बनत चालल्याची चर्चा सुरू झाली आहे. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने देशाच्या विविध भागांत गुन्हे करून पसार झालेले आरोपी तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संबंधित व्यक्ती गोव्यात आश्रय घेत असल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. २०२२ मध्ये मुंबईतील ३० हून अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या विक्रांत ऊर्फ विकी दत्तात्रेय देशमुख याला पणजीत गोवा पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेच्या सहकार्याने अटक केली होती. त्याच्याकडून पिस्तूलही जप्त करण्यात आले होते.
पुरणेककर हत्या प्रकरणातील निखिल यादव आणि नितेश पवार यांनी ठाण्यातून बाहेर पडून रायगडमार्गे गोव्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. अलिबागजवळ त्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले. हत्येनंतर महाराष्ट्राबाहेर जाऊन पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करता येईल आणि गोवा हे त्यांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरू शकते, असा आरोपींचा विचार होता का, याचा तपास केला जात आहे.
आत्तापर्यंत अनेक गुन्हेगारांना गोव्यात अटक
अलीकडील काळात गोवा पोलिसांच्या कारवाईत शेजारील राज्यांतील गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेले आरोपी गोव्यात सापडले आहेत. जून २०२६ मध्ये कर्नाटकातील मंगळूर येथील पनंबूर पोलिस ठाण्यातील खून प्रकरणात वाँटेड असलेल्या प्रशांतकुमार भंडारी याला कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव येथे अटक केली.
त्याच महिन्यात गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मणिपूरमधील बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या नोंगथोंगबाम इंगो याला फातोर्डा-मडगाव परिसरातून अटक केली. तो सुमारे दोन दशकांपासून फरार होता. ऑगस्ट २०२६ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने कळंगुटमधील एका व्हिलामधून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक आणि मनी लाँडरिंग सिंडिकेटशी संबंधित १२ जणांना अटक केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.