

पणजी: पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत हाती घेण्यात आलेल्या रस्ते दुरुस्ती व देखभाल कामांना काही काळ डांबर उपलब्ध न झाल्याने विलंब झाला असावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (ता.३) स्पष्ट केले. राज्यातील अनेक भागांत रस्त्यांची कामे रखडल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळ्याच्या तोंडावर अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असली तरी काही भागांमध्ये कामांचा वेग अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. यामागे काही कालावधीसाठी डांबराचा पुरवठा सुरळीत न झाल्याचा परिणाम असू शकतो. त्यामुळे कंत्राटदारांना नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्यात अडचणी आल्या.
दरम्यान, आता पावसाळा सुरू झाल्यामुळे गरम मिश्रण (हॉटमिक्स) वापरून रस्ते डांबरीकरणाची कामे थांबविण्यात आली आहेत. मुसळधार पावसात अशा प्रकारची कामे करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने ती पुढे ढकलण्यात आली आहेत. मात्र, याचा अर्थ रस्ते दुरुस्ती पूर्णपणे थांबणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रीमिक्स साहित्याचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपातील दुरुस्ती केली जाऊ शकते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून राज्यभरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
इतर राज्याप्रमाणे रस्ते बांधणीसाठी लागणारे डांबर हे तेलशुद्धीकरण प्रकल्पांतून मिळते. वाढत्या मागणीमुळे विदेशातूनही डांबर आयात करावे लागते. इराक, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवेत आणि काही प्रमाणात इराणमधून डांबराची आयात होते. अमेरिका-इराण तणाव आणि मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चे तेल व त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. परिणामी डांबराची उपलब्धता घटली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.