

पणजी: गोव्यातील सहकार क्षेत्रात मंगळवारी मोठी घडामोड घडली. राज्यभरात शाखा विस्तार करण्यासाठी पुढे सरसावलेल्या तिरुमला-तिरुपती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला सहकार निबंधक आशुतोष आपटे यांनी जोरदार दणका दिला आहे. या सोसायटीला निबंधकांनी दिलेले ना हरकत दाखले रद्द केले आहेत.
सहकार निबंधकांनी या सोसायटीला यापूर्वी ना हरकत दाखला दिला होता. सहकार निबंधकांनी एनओसी तात्काळ मागे घेतली असून, ती रद्द केली आहे. गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, २००२ च्या कलम १०८ नुसार, केंद्रीय सहकारी संस्थांच्या निबंधकांनी २४ मे २०१३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अधिकार क्षेत्रातील बहुराज्य सहकारी संस्थांच्या तपासणीसाठी राज्य निबंधकांना अधिकार दिले आहेत. त्यानुसार राज्य सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाने केलेल्या नियामक छाननी आणि तपासणीअंती ही कारवाई केली आहे.
का झाली कारवाई?
१. वैधानिक आवश्यकता आणि नियामक निर्देशांचे गंभीर आणि सतत उल्लंघन. २. कायद्यानुसार आवश्यक असलेले लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्र सादर न करणे. ३. वैधानिक तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेत सहकार्य न करणे. ४. ज्या अटी व शर्तींच्या अधीन राहून ना हरकत प्रमाणपत्र दिले, त्यांचे उल्लंघन करणे. ५. नोटीस बजावूनही सहकारी संस्था निबंधकांसमोर हजर न राहणे किंवा प्रतिसाद न देणे.
नागरिकांना आवाहन : निबंधकांनी राज्यातील ग्राहक आणि नागरिकांना सूचित केले आहे की, या संस्थेच्या नियामक स्थितीची नोंद घ्यावी आणि उपरोक्त संस्थेशी कोणताही आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करताना योग्य ती खबरदारी व सावधगिरी बाळगावी. या संस्थेशी संबंधित कोणतीही तक्रार, वाद किंवा स्पष्टीकरण असल्यास संबंधित व्यक्ती कायद्यानुसार योग्य सक्षम प्राधिकरणाकडे संपर्क साधू शकते.
चार शाखा विनापरवाना!
या सोसायटीला सहकार खात्याने १३ शाखांसाठी परवानगी दिली होती. तरीही व्यवस्थापनाकडून चार अतिरिक्त शाखा परवानगी न घेताच चालविल्या जात होत्या. या शाखांचे ऑडिटही व्यवस्थापन करू देत नव्हते. त्यामुळे बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. त्यामुळेच ‘एनओसी’ रद्द केली, अशी माहिती आशुतोष आपटे यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.