

पणजी: नैऋत्य मान्सूनच्या माघारीदरम्यान अपेक्षित पाऊस न पडणे, पूर्वेकडून वाहणारे कोरडे वारे आणि वाढलेली आर्द्रता यांमुळे गोव्यासह किनारी कर्नाटक आणि कोकण पट्ट्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. पणजीत बुधवारी कमाल ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव तालुक्यात ३६.८ इतके तापमान नोंदवण्यात आले. दुसरीकडे, १९८० नंतर ऑक्टोबर महिन्यातील हे राज्यातील ३७.४ अंश सेल्सिअस तापमान हे सर्वाधिक ठरले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यासह कोकण पट्ट्यात उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यातील कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. वाढत्या उष्णतेत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
४५ अंशांप्रमाणे उष्म्याची झळ
राज्यात कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस असले, तरी प्रत्यक्षात ४५ अंशांप्रमाणे उष्मा जाणवत आहे. घामाच्या धारा लागत असून, घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. राज्यात एप्रिल-मे महिन्यांसारखी स्थिती निर्माण झाली आहे.
म्हापशात सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी तापमान
अन्साभाट म्हापसा येथे सलग तिसऱ्या दिवशी उच्चांकी तापमानाची नोंद झाली. संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी आपल्या वैयक्तिक हवामान केंद्रावर ही तापमानवाढ नोंदवल्याचे त्यांनी कळवले आहे. बुधवारी दुपारी २:२३ वाजता सर्वाधिक म्हणजे ३९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हे तापमान ऑक्टोबरमधील सरासरीपेक्षा तब्बल ६.६ अंशांनी अधिक आहे.
पुढील दोन-तीन दिवस उष्म्याची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता असून, तीन दिवसांनंतर राज्यातील कमाल तापमानात घट होऊ शकते, असे गोवा वेधशाळेचे संचालक.
- नहुष कुलकर्णी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.