गोव्यात गेल्या 12 तासांत पावसानं हाहाकार माजवला आहे. राजधानी पणजीसह राज्याच्या विविध भागात मुसळधार सरी बरसतायेत. सत्तरी, पेडणे, डिचोली, धारबांदोडा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने पूसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, आज (1 ऑगस्ट) हवामान खात्याकडून रेड अलर्टही वर्तवण्यात आला. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुढील दोन-तीन तासात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. मोपा विमानतळावरील पाणी सोडण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा नागझर येथील रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेले लोक अडकून पडले.
सत्तरीत सध्या मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटी नदीला आलेल्या पूरामुळे घोटेलीतील वाहतूक बंद करण्यात आली. या भागातील मुलांना सुट्टी देण्यात आली. पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनीही विधानसभेत बोलताना सत्तरीतील पूरसदृश्य स्थितीवर चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी डब्ल्यूआरडी खात्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनेची मागणी केली.
सत्तरी, पेडणे, डिचोली, धारबांदोडा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा स्थिती खराब झाली आहे. मुलांना शाळेत जाणंही मुश्किल झालं आहे. याचदरम्यान मुलांनी व पालकांनी परीक्षेची चिंता करु नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचे प्रथम प्राधान्य आहे. पुरामुळे शाळेत न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा चुकली म्हणून नुकसान होणार नाही, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्याकडून सांगण्यात आले.
सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे म्हादई, वाळवंटी, रगाडा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. खबरदारी म्हणून सोनाळ-वाळपई, गुळेली-उसगांव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
नानोड्यातही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कदंबच्या प्रवासी बसगाडीसह अनेक वाहने अडकल्याने वाहतूक कोंडी झाली. तर दुसरीकडे, दूधसागर नदीला पूर आल्याने धावकोण रस्त्ता तर उन्नया नदीला आलेल्या पूरामुळे निरंकाल रस्ता कालपासून पाण्याखाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या साखळीतही पावसानं हाल बेहाल केलं आहे. आज सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा स्थिती खराब झाली. सततच्या पावसामुळे साखळीतील वाळवंटी नदीला पूर आला आहे. वाळवंटी नदीच्या पुराच्या पाण्याने बंदिरवाडा विठ्ठलपूर येथे एका घराला वेढा घातल्याने तीन जण घरात अडकले. यादरम्यान सात जणांना सुखरुपणे बाहेर काढण्यात आले.
उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी साखळीतील पूरस्थितीची पाहणी केली. सर्व परिस्थिती नियंत्रणात असून लोकांनी चिंता करु नये. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून संपर्क क्रमांकही जारी करण्यात आल्याचे यावेळी जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांच्याकडून सांगण्यात आले.
पावसाचा जोर कायम असताना तिळारी धरणातून जलविसर्ग सुरु झाल्याने शापोरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. तर साळसह नदीकाठच्या गावांवर पुराचे सावट निर्माण झाल्याने लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पार नदीच्या पाणी पातळीत वाढल्याने मयते- अस्नोडा परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गिते आणि बार्देशचे उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्यासोबत पाहणी करत आढावा घेतला. आतापर्यंत 12 घरांमध्ये पाणी शिरले आहे.
डिचोलीतही आज सकाळपासून पाऊस सुरु झाल्याने बाजारपेठेत पाणीच पाणी झाले. त्यामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.