
पणजी/मडगाव: हॉस्पेट ते तिनईघाटपर्यंतच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा करीत हे दुपदरीकरण कोळसा हाताळणीसाठी असल्याचे केंद्र सरकारने सुतोवाच केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल चढवला, तर ‘काहीही झाले तरी राज्यातील कोळसा हाताळणीत वाढ होणार नाही’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
हॉस्पेट – तिनईघाटपर्यंतच्या रेलमार्ग दुपदरीकरणाचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. पावसाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या विषयावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सभागृहात धारेवर धरले होते.
अशा स्थितीत हा प्रकल्प पूर्ण झाल्याची घोषणा करताना केंद्राने कोळसा वाहतुकीचाही उल्लेख केल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मात्र कोणत्याही स्थितीत राज्यातील कोळसा हाताळणीत वाढ होऊ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. हा प्रकल्प पर्यटन, व्यवसाय आदी कारणांसाठी तयार करण्यात आल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे.
त्यामुळे तो कोळसा हाताळणीसाठीच असेल, असे म्हणण्यात तथ्य नाही. राज्यात यापूर्वी जितक्या कोळशाच्या हाताळणीसाठी परवानगी देण्यात आली होती, ती मर्यादा तितकीच राहील, असेही त्यांनी नमूद केले.
कोळसा हाताळीस मुरगाव बंदर प्राधिकरण, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी लागते. बंदरात किती कोळसा हाताळणी होऊ शकते याची मर्यादा प्रदूषण नियंत्रण मंडळ जागेच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर ठरवते.
ती मर्यादा ओलांडल्यास प्रसंगी कोळसा हाताळणी बंद करण्याची नोटीस बजावण्याचे अधिकार मंडळाला आहेत. कोळशाची भुकटी शहरात पसरू नये, वाहतूक करताना इतरांना त्रास होऊ नये यासाठी मंडळ अटी घालते. हवेत कोळशाचे कण मिसळले आहे का याची पाहणी करण्यासाठी हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा मंडळ कार्यान्वित करते.
राज्यातील कोळसा हाताळणीत वाढ झाल्यास त्याच्या प्रदूषणामुळे स्थानिक जनतेच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतील याबाबत चर्चा करण्यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांच्यासह विरोधी पक्षांच्या आमदारांना भेटीची वेळ देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मेलद्वारे केली. केंद्र सरकारच्या घोषणेतून गोव्यातील रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण कोळसा वाहतुकीसाठीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच आम्हाला या विषयावर चर्चा करण्यासाठी आपली लवकरात लवकर भेट द्यावी, असेही पाटकर यांनी मेलमध्ये म्हटले आहे.
कोळसा हाताळणी वाढली ः कोळसा वाहतुकीत यंदाच्या ऑगस्टमध्ये गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाल्याची माहिती दक्षिण पश्चिम रेल्वेने दिली आहे. मासिक कोळसा वाहतूक ०.७५ टनावर पोचली आहे, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
१.हॉस्पेट - हुबळी - तिनईघाट - वास्को या दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणखी नेटाने पुढे रेटण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरविले आहे. त्यासाठी या प्रकल्पाला तीव्र विरोध होत असलेल्या सांकवाळ, इसोरशी आणि कासावली या भागातील आणखी ६ हजार चौरस मीटर जमीन संपादित करण्याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने जारी केली आहे.
२.अधिसूचनेनुसार मुरगाव तालुक्यातील एकूण ०.६००७ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे. यासंदर्भात स्थानिकांना उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
३.अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सुनावणी घेतली जाईल. जमिनीचे आराखडे व तपशील मुरगाव भूसंपादन अधिकारी कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध आहेत, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.