

म्हापसा: दिवाळी सणासाठी आपल्या गावी निघालेल्या कामगारांच्या सुरक्षिततेशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार म्हापशात उघडकीस आला. अवघी ४८ प्रवाशांची आसनक्षमता असलेल्या खासगी बसमधून तब्बल १४० प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
म्हापसा वाहतूक पोलिसांनी बोडगेश्वर मंदिराजवळ ही आंतरराज्य बस मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ताब्यात घेतली. या घटनेमुळे आंतरराज्य प्रवासी वाहतुकीतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्य प्रदेशातील मालकीची ही बस गेल्या चार वर्षांपासून या मार्गावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे.
आंतरराज्य तपासणी नाक्यांवर बस अडवली गेली तरी ३० ते ४० हजार रुपयांचा दंड भरून पुढील प्रवास सुरू ठेवला जात असल्याचे चालकाने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘दंड भरून आम्ही व्यवसाय सुरू ठेवतो,’ असे चालकाने म्हटल्याने तपासणी नाके आणि संबंधित परिवहन यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रत्येकी ४ हजार रुपये भाडे
ही बस म्हापशातून मध्य प्रदेशातील इंदूरमार्गे उत्तर प्रदेश आणि पुढे नेपाळ सीमेकडे जात होती. गोव्यात विविध ठिकाणी काम करणारे नेपाळ आणि उत्तर प्रदेशातील कामगार दिवाळी साजरी करण्यासाठी गावी निघाले होते. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, दोन प्रवाशांसाठी असलेल्या जागेवर सात ते आठ जणांना बसविण्यात आले होते. या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाकडून तब्बल चार हजार रुपये भाडे आकारण्यात आले होते. गोव्याहून नेपाळपर्यंत पोहोचण्यासाठी या प्रवासाला साधारण चार दिवस लागतात.
कारवाईनंतर १४० प्रवासी उघड्यावर; चालक फरार
पोलिसांनी बस ताब्यात घेऊन नवीन केटीसी बसस्थानकावर उभी केली. तसेच चालकाला न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली. मात्र, कारवाईनंतर चालक प्रवाशांना सोडून पसार झाल्याने त्यांचे हाल झाले. मध्यरात्रीच्या वेळी महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह सुमारे १४० प्रवासी पर्यायी वाहतुकीच्या सुविधेविना अडकून पडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.