

पणजी: राज्यातील कारागृहात कैद्यांची संख्या मर्यादेत असली, तरी तिथल्या कैद्यांमधील शिक्षणाचे कमी प्रमाण आणि वयोगटाची आकडेवारी एक गंभीर सामाजिक आव्हान उभे करत असल्याचे ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या (एनसीआरबी) २०२४ च्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, गोव्यातील एकमेव कारागृहात एकूण ६१५ कैदी होते. यापैकी बहुतांश कैदी हे ‘अंडरट्रायल’ कैदी असून ते अशिक्षित किंवा दहावीपर्यंत शिक्षण झालेले होते.
एनसीआरबीच्या ताज्या जाहीर झालेल्या या अहवालानुसार, कैद्यांमध्ये शिक्षणाची प्रचंड दरी दिसून येत आहे. दोषी ठरलेल्या कैद्यांतील ९५ पैकी ४७ कैदी एकतर ठार निरक्षर आहेत किंवा त्यांचे शिक्षण केवळ इयत्ता दहावी पर्यंत झाले आहे.
अंडरट्रायल कैदी यांच्यात हे प्रमाण अधिक असून ५१९ पैकी ३३८ कैदी या श्रेणीत येतात. संपूर्ण कारागृहात केवळ १५ दोषी आणि ३६ ‘अंडरट्रायल’ कैदी पदवीधर आहेत.
महत्त्वाचे निष्कर्ष
कारागृहातील जागा : गोव्याच्या कारागृहाचा ‘ऑक्युपन्सी रेट’ ९८.६ टक्के आहे, जो देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत चांगला असून येथे जागांची कमतरता नाही.
परदेशी कैदी : कारागृहात ८ परदेशी दोषी आणि ९३ परदेशी अंडरट्रायल कैदी आहेत.
सुटका आणि मृत्यू : २०२४ मध्ये १,१९८ अंडरट्रायल कैद्यांची सुटका झाली, ज्यापैकी १,०८३ जणांना जामीन मिळाला. वर्षभरात केवळ २ नैसर्गिक मृत्यू झाले असून, कोणतीही आत्महत्या किंवा तुरुंगातून पळून जाण्याची घटना घडलेली नाही.
युवकांचे प्रमाण अधिक : कारागृहातील वयोगटाची आकडेवारी पाहता, युवा पिढीचे गुन्हेगारीतील वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. अंडरट्रायल कैदी ५१९ पैकी २६८ (५१.६ टक्के) कैदी ३० ते ५० वयोगटातील आहेत आणि १८ ते ३० या तरुण वयोगटातील संख्या १९० (३६.६ टक्के) इतकी आहे. दोषी कैद्यांमध्ये ९५ दोषींपैकी ५९ कैदी ३० ते ५० वयोगटातील, तर १९ कैदी १८ ते ३० वयोगटातील आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.