

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. गोव्यातही भाजपने आपली जय्यत तयारी सुरु केली आहे. राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढाई पाहायला मिळणार आहे. राज्यातील दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते जुने पुराने मुद्दे काढून एकमेकांवर निशाणा साधत आहेत.
दरम्यान, काँग्रेसने बुधवारी भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. भ्रष्टाचार, पक्षांतर करणाऱ्यांना प्रवेश देणे आणि निवडणूक रोख्यांचा वापर करुन व्यावसायिकांची पिळवणूक करणे ही भाजपची निती आहे, अशी जहरी टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके यांनी केली. बुधवारी भिके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जनतेचा पैसा लुटल्याचा आरोप केला. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर आणि सांताक्रुझ गटाचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यावेळी उपस्थित होते. देश आणि राज्यासाठी काँग्रेसने काय केले असा प्रश्न विचारणाऱ्या भाजपावर त्यांनी सडकून टीका केली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि गोवा मुक्तीसाठी तुम्ही काय केले? असा सवाल देखील त्यांनी यावेळी भाजपला विचारला.
“आम्ही देश आणि गोव्यासाठी काय केले हे त्यांनी (भाजप) आम्हाला विचारु नये. देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी आमच्या नेत्यांनी काय केले हे सर्वांना माहीत आहे. भाजपने देशातील लोकशाही संपवण्यासाठी आपली विचारसरणी भ्रष्ट केली. शिवाय घोटाळे आणि पक्षांतर करणाऱ्यांचे त्यांनी आपल्या पक्षात स्वागत केले," असेही भिके म्हणाले.
भिके पुढे म्हणाले की, “भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून व्यवसायिकांकडून पैसे उकळ्याचे काम केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये, त्यांचा पक्ष भ्रष्टाचारात किती बुडाला आहे हे त्यांनी पहिल्यांदा पाहावे,’’
ते पुढे असेही म्हणाले की, ''भाजप नेते सध्या निवडणुकीच्या काळात धार्मिक स्थळांना भेट देत आहेत, कारण त्यांनी देवांशीही विश्वासघात केला आहे. भाजप प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरला आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.'' एका उच्चपदस्थ व्यक्तीने केलेल्या आरोपांची चौकशी भाजप सरकारने का केली नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना या पक्षाने पूर्वी भ्रष्ट राजकारणी म्हटले होते. परंतु भाजपमध्ये प्रवेश करताच ते शुद्ध होतात, असेही भिके म्हणाले. एसबीआयला निवडणूक रोख्यांची यादी जाहीर करण्यास भाग पाडल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. भिके पुढे म्हणाले की, ''श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील आयुष मंत्रालय रामदेव बाबांना कोविड दरम्यान दिशाभूल करणारी जहिरात प्रसिद्ध करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले. मात्र, रामदेव बाबांच्या कृत्यांचा पर्दाफाश केल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.