

पणजी: आम्ही गोव्याच्या जनतेच्या हितासाठी आमचे सर्व हेवे दावे मागे सारून युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, परंतु युतीधर्मच पाळला गेला नाही. आमची होऊ घातलेली युती ही गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यामुळे तुटल्याचा आरोप आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी केला.
पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते. यावेळी आमदार वीरेश बोरकर आणि अजय खोलकर उपस्थित होते. परब म्हणाले, आम्हाला युतीनाट्यात खेळवत ठेवून आरजी पक्ष संपविण्याचा मास्टरप्लान सरदेसाई व पाटकर यांचा होता.
आमदार विजय सरदेसाई २०२२ सालचे मायकल लोबो आहेत, नागरिकांच्या सद्भावना मिळवून त्यांना निवडणूक जिंकायची होती आणि नंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश करायचा होता, असा आरोपही मनोज परब यांनी यावेळी केला.
युतीबाबत विजय सरदेसाई खोटं बोलत असल्याचा आरोपही परब यांनी केला. परब यांनी यावेळी जागा वाटपाची एक्सेल शीट देखील दाखवत सरदसेसाईंचा दावा खोडून काढला.
दरम्यान, विजय सरदेसाई यांनी आरजीच्या दिल्ली दौऱ्यानंतर युती बाबतच्या चर्चांमध्ये तफावत निर्माण झाल्याचा आरोप केला. दिल्ली भेटीत काहीतरी जादू झाल्याचे त्यांनी म्हटले होते.
आम्ही दिल्लीला गेलोच नव्हतो
मी आणि वीरेश बोरकर पूर्वी मुंबईला विमानाने गेलेला फोटो समाजमाध्यमांवर टाकत दिल्लीला गेल्याचे विजय सरदेसाईना वाटावे यासाठी टाकला. त्यामागे आमचा काही सुप्त उद्देश होता. आम्हाला युतीच्या बोलणीवेळी सरदेसाईबाबत संशय निर्माण झाला होता, म्हणून हा फोटो युरी आलेमाव यांना कल्पना देऊन टाकण्यात आला होता, असे मनोज परब यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.