Goa Politics: खरी कुजबुज, हे गाजर कधीपर्यंत दाखवणार?

Khari Kujbuj Political Satire: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस पक्षाने नेहमीच कमी महत्त्व दिले, असा आरोप भाजप करत आहे. आता त्यामागेही राजकारण आहे हे सांगण्याची गरज नाही.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

हे गाजर कधीपर्यंत दाखवणार?

‘गाजर दाखविणे’ हा वाक्प्रचार भाजपच्या आमदारांनी ऐकलेला असणार व त्याचा अर्थही त्यांना चांगलाच माहीत असणार. गोवा राज्य मंत्रिमंडळात बदल होणार, अशी हूल गेल्या अनेक महिन्यांपासून उठविण्यात येते. अमक्याचे मंत्रिपद धोक्यात अमक्याला मंत्रिपद मिळणार, अशा बातम्या अधून मधून ऐकायला येतात. आधी म्हणत होते, गेल्या वर्षाच्या पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ बदलले जाणार. त्या नंतर हिवाळी अधिवेशन झाले तोच घोष पुन्हा ऐकायला आला आता हल्लीच उन्हाळी अधिवेशन झाले आता नक्कीच मंत्रिमंडळ बदलणार, अशी चर्चा रंगात होती. मुख्यमंत्र्यांनी दिगंबराला ‘अच्छे दिन’ येणार असे वचन दिले खरे, मात्र एक मंत्री आजारी पडले आणि मंत्रिमंडळ बदल पुन्हा थांबला. आता पुढच्या निवडणुकीपर्यंत इच्छुकांना असेच ताटकळत तर ठेवणार नाहीत ना? असा प्रश्न मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत असलेल्या आमदारांचे समर्थक विचारीत आहेत. ‘आयज येतोलो, फाल्या येतोलो पावन पावोना’, या कोकणी लोक गीताचे बोल आता मंत्रिपदाच्या इच्छुकांच्या रांगेत असलेले आमदार आळवू लागलेत. ∙∙∙

गोवा आम्ही राखला

मुक्त गोवा महाराष्ट्रात विलीन होऊ नये म्हणून प्रयत्न केल्याचे अनेकांचे दावे आजवर ऐकण्यात आले आहेत. त्यात आणखीन एका दाव्याची भर आता पडली आहे. बहुजन समाजाचा गोवा मुक्तच रहावा यासाठी तेव्हा २१ वर्षीय असलेले रवी नाईक यांनी आपल्या स्कुटरवरून गोवा पिंजून काढला. त्यांनी बहुजन समाजाला विलीनीकरणाविरोधात मतदानासाठी प्रवृत्त केले. यामुळे गोवा महाराष्ट्रात विलीन झाला नाही असा दावा आता भंडारी समाजाच्या नेत्यांनी केला आहे. यामुळे गोवा स्वतंत्र राखण्यात आता भंडारी समाजाचा वाटा आहे हेही समोर आले आहे.

काँग्रेसचे आंबेडकर प्रेम ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस पक्षाने नेहमीच कमी महत्त्व दिले, असा आरोप भाजप करत आहे. आता त्यामागेही राजकारण आहे हे सांगण्याची गरज नाही. पण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना खरेच बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ममत्व आहे का? हाही प्रश्न आहेच. कारण तीन दिवसांपूर्वी आंबेडकर जयंतीच्या दिनी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कुडचडे येथील आंबेडकर चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हजर झाले होते मात्र, त्यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेसचे फक्त दोन तीन कार्यकर्तेच उपस्थित होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना आंबेडकरांचे खरेच काही पडून गेले आहे काय? ∙∙∙

Goa Politics
Goa Politics: खरी कुजबुज, CM को गुस्‍सा क्‍यों आया?

दप्तरांचे ओझे अजूनही पाठीवर!

सरकारच्या निर्णयानंतर नवे शालेय वर्ष एक एप्रिलपासून सुरू झाले आहे. पालकांचा प्रथम या बदलाला विरोध होता व तो दूर करताना खात्याने एप्रिल महिन्यात मुलांना शिकविले जाणार नाही तर कृतीशिल शिक्षणावर भर दिला जाईल, असे सांगितले होते. पण मजेची बाब म्हणजे या दुसऱ्या आठवड्यात मुलांना पुस्तके उघडून म्हणे शिकविले जात आहे. त्यामुळे मुलांना सर्व पुस्तके व वह्या रोज न्याव्या लागतात, अशा तक्रारी पालक करू लागले आहेत. वास्तविक खात्याने या बाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही होऊ लागली आहे. अजून काही वेळापत्रक दिले गेलेले नाही, त्यामुळे मुले सर्व पुस्तके व वह्या नेण्याचा हट्ट धरतात वत्यामुळे दप्तरे त्यांच्या ओझ्याने जड होत आहेत. हा नेमका काय प्रकार या महिन्यात रोजचा अभ्यास घेणार की कृतीशिल शिक्षण असणार ते स्पष्ट करावे म्हणजे तयार झालेला गोंधळ दूर होणार हे मात्र खरे. ∙∙∙

भिकाने बाजी मारली?

फोंड्यातील कुर्टी-खांडेपार पंचायत ही अशी एक पंचायत आहे, जिथे कधी काय होईल, हे ब्रह्मदेवालाही सांगता यायचे नाही. आता हेच पहा ना. गटविकास अधिकाऱ्यांनी या पंचायतीतील एक पंच भिका केरकर यांना मागच्या एका प्रकरणावरून चक्क अपात्र म्हणून घोषित करून टाकले. त्यामुळे मग नवीन सरपंचाकरता होणारी निवडणूक पुढे ढकलून प्रशासक नियुक्त करावा लागला. प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. आता न्यायालयाने गटविकास अधिकाऱ्याचा तो हुकूम रद्द बातल करून भिकाचे पंचाचे पद कायम ठेवले आहे. त्यामुळे आता २१ तारखेला असलेली सरपंच निवडणूक होणार, असे वाटू लागलेय. पण वरवर जरी भिकाने बाजी मारली असे वाटत असले तरी ऐनवेळी या पंचायतीत काय होईल हे सांगणे, मात्र कठीणच आहे, हो. तशी चर्चा भागात सुरूही झालीय. आता बोला. ∙∙∙

Goa Politics
Goa Politics: खरी कुजबुज, ड्रग्ज माफिया ते समाजसेवक!

...अन् अधिकारी लागले कामाला!

चुकीचा संदेश वाऱ्यासारखा पसरला की काय परिस्थिती होते, याचा प्रत्यय फोंड्यातील अधिकाऱ्यांना आला. तळावलीत एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन कुणीतरी आत्महत्या केल्याचा संदेश परिसरात फिरला. तसेच फोंडा पोलिस, अग्निशामक दल आणि १०८ रुग्णवाहिका सेवेला माहिती देण्यात आली. त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, घटनास्थळावर पोलिस, अग्निशमन दल आणि अन्य अधिकारी तेथे पोचल्यावर त्यांना बुजगावणे झाडाला लटकत असल्याचे दृष्टीस पडले. हे बुजगावणे माकडांच्या उपद्रवापासून बागायतीचे संरक्षण करण्यासाठी लटकवल्याचे तेथील लोकांकडून सांगण्यात आले. अन् पोलिस अन् अग्निशमन दलासह यंत्रणेचा ‘एप्रिल फूल’ झाल्याची चर्चा मात्र दिवसभर रंगली.

पोलिस बनले लिफ्ट सुरक्षारक्षक!

सरकारी खाती असलेल्या इमारतीत कायद्यानुसार लिफ्ट असणे सक्तीचे आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांगांना पायऱ्या चढून जाणे शक्य नसल्याने ही सुविधा उपलब्ध केली आहे. गोवा पोलिस मुख्यालयात असलेल्या लिफ्टचा अजब प्रकार सुरू आहे. ही लिफ्ट फक्त दिव्यांगांनाच आहे, अशी तेथे सूचना लावण्यात आली आहे. या लिफ्टमध्ये इतर कोणीही जाऊ नये, यासाठी तळमजला व पहिल्या मजल्यावर दोन पोलिस कॉन्स्टेबल्सची वर्णी लावण्यात आली आहे. एकिकडे ही लिफ्ट दिव्यांगांसाठी असल्याचा फतवा लावला असताना यामधून काही पोलिस अधिकारी त्याचा वापर करत आहेत. मुख्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटण्यास येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक किंवा सामान्यांना या लिफ्टच्या ठिकाणी तैनात केलेले हे पोलिस कॉन्स्टेबल जाण्यास अटकाव करतात. पोलिस मुख्यालयात कामाला असलेल्‍या कर्मचाऱ्यांना या लिफ्टचा वापर करता येत नसल्याने नाराजी व संताप आहे. वरिष्ठांचा आदेश आहे, असे या पोलिस कॉन्स्टेबल्सकडून सांगितले जाते. त्यामुळे या लिफ्ट वापराचा अजब प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

‘आरटीओ’ कधी होणार सक्रिय?

आरोग्यखात्याच्या अखत्यारींतील ‘एफडीए’ हल्ली भलतेच सक्रिय झालेले असून त्यांच्या सक्रियतेमुळे उत्तर गोव्यात अन् विशेषतः म्हापसा परिसरांतील खाद्य विक्रेत्यांची धावपळ उडालेली तर आहेच पण सर्वसामान्यांत समाधान पसरलेले आहे. विशेषतः त्यांनी परवा म्हापसा सबयार्ड मधील जी परिस्थिती उघडकीस आणली ती संबंधितांना विचार करायला लावणारी आहे. संबंधित यंत्रणेने मनावर घेतले तर काय होऊ शकते याचे हे उदाहरण असल्याचे मानले जाते.आता याच धर्तीवर गोव्यातील ‘आरटीओ’ची यंत्रणा कधी रस्त्यावर येणार, अशी विचारणा लोकांकडून होऊ लागली आहे. संबंधित मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ‘एफडीए’ सक्रिय झाली असे सांगितले जाते, ते जर खरे असेल तर वाहतूक मंत्र्यांनी ‘आरटीओ’ला सक्रिय व्हा, रस्त्यावर उतरा व वाहतूक व्यवस्थेतील दोष दूर करा, अशी ताकीद का देऊ नये, अशी विचारणा सर्वसामान्य प्रवासी करू लागलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com