Goa Politics: खरी कुजबुज, ड्रग्ज माफिया ते समाजसेवक!

Khari Kujbuj Political Satire: कुडतरी मतदारसंघात सगळीकडे रस्‍ते फोडून ठेवले आहेत म्‍हणून स्‍थानिक आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांच्‍यावर टीका केली जात होती.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

ड्रग्ज माफिया ते समाजसेवक!

दीड दशकापूर्वी ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजले होते. पोलिस - राजकारणी - ड्रग्ज माफिया प्रकरणामुळे कुप्रसिद्ध ड्रग्ज माफिया यानिव बेनाईम ऊर्फ अटाला हा चर्चेत आला होता व त्याला अटक झाली होती. आता पुन्हा त्याला ड्रग्जप्रकरणी अटक झाली आहे. त्याने गोव्यातील किनारपट्टी भागात होणाऱ्या काही क्रीडा स्पर्धांना मदतीचा हात दिला आहे. त्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात देणग्या दिल्या आहेत. ड्रग्ज माफिया म्हणून किनारपट्टी भागात कुप्रसिद्ध असलेला अटाला फुटबॉल व क्रिकेट स्पर्धांचे आयोजक त्याच्याकडे देणगीसाठी गेल्यास तो एखाद्या राजकारण्यांसारखा मदत करू लागला होता अशी चर्चा आहे. त्याचा मिळकतीचा स्त्रोत गुप्त असला तरी ड्रग्ज व्यवहारातील पैशांची तो उधळपट्टी करत आहे. अजूनही काही पोलिस त्याच्या संपर्कात आहेत, त्यामुळे त्याला अटक झाली तरी त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव वा भीती नाही. कोठडीतून सुटका होण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्याची त्याची क्षमता आहे. ∙∙∙

रेजिनाल्‍ड ‘ॲक्शन मोड’मध्‍ये!

कुडतरी मतदारसंघात सगळीकडे रस्‍ते फोडून ठेवले आहेत म्‍हणून स्‍थानिक आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांच्‍यावर टीका केली जात होती. मात्र आता रेजिनाल्‍डने सगळीकडे रस्‍त्‍यांचे डांबरीकरण करण्‍याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. कुडतरीतील सर्व रस्‍त्‍यांचे डांबरीकरण होणार याची खात्री रेजिनाल्‍ड सध्‍या कुडतरीवासीयांना देऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी अशाच एका डांबरीकरणाच्‍यावेळी बोलताना त्‍यांनी म्‍हटले देखील, जो काम करणार तोच यापुढेही जिंकून येणार. सध्‍या रेजिनाल्‍ड ‘फुल ॲक्शन मोड’मध्‍ये आलेेले आहेत. त्‍यामुळे आता त्‍यांचा आत्‍मविश्‍वासही पुरेपूर वाढलेला आहे. ∙∙∙

खरेच चर्चिल ब्रदर्स ‘आय लीग’ चॅम्‍पियन?

यावेळी झालेल्‍या आय लीग फुटबॉल स्‍पर्धेत चांगला खेळ दाखविल्‍यामुळे चर्चिल ब्रदर्स हा गोव्‍यातील फुटबॉल संघ गुणतक्त्यात पहिल्‍या क्रमांकावर पोचला असला तरी इंटरकाशी क्‍लब व नामधारी क्‍लब यांच्‍यात झालेल्‍या सामन्‍याचा निकाल काय लागणार, यावर यंदाचा आय लिग चॅम्‍पियन कोण? हे नक्‍की हाेणार आहे. असे जरी असले तरी चर्चिल आलेमाव यांना हा निकाल इंटरकाशीच्‍या विरोधात जाणार याची शक्‍यताच वाटते, असे नव्‍हे तर त्‍यांना तशी खात्रीही आहे. त्‍यासाठी ते आपले अजब असे तर्कट वापरतात. ते म्‍हणतात, राय येथे झालेल्‍या सामन्‍यात चर्चिल ब्रदर्स अगदी हरता हरता जिंकले आणि शेवटचा जाे गाेल झाला तोही देवाच्‍या कृपेने म्‍हणतात तसा. त्‍यामुळे यंदाचे अजिंक्‍यपद चर्चिलच जिंकणार हा देवाचाच संकेत, असेही ते म्‍हणतात. चर्चिलच्‍या या खात्रीमागे फक्‍त हा देवावरील विश्‍वासच कारणीभूत आहे की, त्‍यांना आणखी काही आतील गोटातील माहिती आहे? ∙∙∙

‘रेंट अ कॅब’वाल्यांचा अट्टाहास

गोव्यात पूर्वी टूरिस्ट टॅक्सीवाल्यांची अरेरावी चालायची व त्यामागील कारण राजकारण्यांचा त्यांना असलेला वरदहस्त असे म्हटले जायचे. आता ती कमी झालेली आहे पण त्याची जागा रेंट अ कॅबवाल्यांनी घेतलेली आहे. लोकांच्या वाढत्या तक्रारी व त्या वाहनांच्या अपघातांच्या संख्येनंतर सरकारने त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी काही पावले उचलल्यावर आता त्या संघटनेने या पावलांविरुध्द आकांडतांडव सुरू केले आहे व खुद्द मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर केले आहे. या वाहनांच्या बेदरकारपणाचा अनुभव सर्वांनी चांगलाच घेतलेला असताना खरे तर सरकारने ही सेवाच बंद करावी, अशी लोकांची मागणी होती. पण तसे न करता या सेवेसाठी नव्याने परवाने न देण्याचा निर्णय घेतला गेला तो योग्यच असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तरीही बदली वाहनांना परवाना देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे ‘रेंट अ कार’वाल्यांची मनमानी चालू ठेवण्यासारखे होणार नाही का? अशी विचारणा लोकांकडून होऊ लागलीय. ∙∙∙

रवी परत एकदा चर्चेत?

कृषी मंत्री रवी नाईक हा एक न संपणारा विषय असे म्हटले जाते ते उगाच नव्हे. गुरुवारी या गोष्टीचा पुन्हा एकदा अनुभव आला. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे रवींना फोंड्यात भेटणे ही ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरली. मग प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार या भेटीचा अर्थ लावायला सुरुवात केली. काहींनी तर रवींच्या मंत्रिपदाचे आता काही खरे नाही, असे बोलायला सुरुवात केली. आहे की नाही, सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार? अर्थात रवींना याचा काही फरक पडत नाही म्हणा. गेली पन्नास वर्षे ते असे अनेक चेंडू टोलवत आले आहेत. पण मुख्य मुद्दा आहे, तो या भेटीमुळे उठलेल्या चर्चेच्या धुरळ्याचा. ही ‘भेट’ कशाकरता होती, हे पुढे कधी कळेलच पण रवींची संबंधित प्रत्येक ‘कृती’ चर्चेचा विषय ठरतेय, एवढे मात्र नक्की! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, चर्चिलच्‍या आखाड्यात ‘हाऊजी’वर बंदी

गव्याची सुटका अन् निद्रिस्त वनखाते!

पेडणे तालुक्यातील कासारवर्णेत काही धाडशी युवकांनी तिलारीच्या कालव्यात पडलेल्या गव्याला वाचवण्याची कसरत केली. मदत करावी अन् अंगलट यावी असा अनुभव या गव्याला कालव्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांपैकी एकाला आला. त्या गव्याने कालव्यातून बाहेर पडताच सुटकेच्या भरात एकाला शिंगावर घेतले. सुदैवाने तो युवक वाचला. आधीच बोंडला प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यावरून वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचा वर्ग घेतलाय. त्यात हा गव्याच्या सुटकेचा व्हिडिओ समाजमाध्यमांत येताच नेटकऱ्यांनीही वनखात्यावर तोंडसुख घेतलं. कौशल्य नसलेले युवक गव्याच्या बचावाला पुढे सरसावलेत, वनखाते झोपलेय का, अशीही विचारणा केलीय. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: राजीनाम्याबद्दल प्रदेशाध्यक्षांशी बोलणे? छे! छे!! रवी नाईकांनी दिला अफवांना पूर्णविराम

‘त्या’ पोलिसांची स्थिती तळ्यात मळ्यात!

गेल्या अनेक वर्षापासून बदल्या होऊनही बदलीच्या ठिकाणी न गेलेल्यांना पोलिस अधीक्षकांनी (मुख्यालय) दणका दिल्यानंतर सर्व पोलिसांनी बदली झालेल्या ठिकाणी जाऊन वर्णी लावली आहे. आता ज्यांनी वर्णी लावली आहे त्यांना त्याची माहिती सादर करण्यास पोलिस स्थानकांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे पुढील महिन्याचे वेतन हे त्यांच्या बदलीच्या ठिकाणानुसारच काढले जाईल, तसे निर्देश पोलिस खात्याच्या लेखा विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांनी बदलीमुळे आजारी सुट्टीवर जाऊन बदली रद्द करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात, त्यांची गोची झाली आहे. त्यांची स्‍थिती ‘तळ्यात मळ्यात’ झाली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com