Goa News: नरकासुराबरोबरच चर्चा बंडोबांच्या प्रतिमा दहनाची! 'खरी कुजबूज'

Goa News: गोव्यात नरक चतुर्दशीला पहाटे नरकासुराचे दहन करुन दिवाळी साजरी केली जाते. ही प्रथा गोव्यातच पाहायला मिळते.
Goa News | Narkasur
Goa News | NarkasurDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: नरक चतुर्दशीला पहाटे नरकासुराचे दहन करुन दिवाळी साजरी केली जाते. ही प्रथा गोव्यातच पाहायला मिळते. मात्र यंदा नरकासुरांचा विषय गाजतोय. कारण एका मंत्र्याने अशा नरकासुर प्रथेला किंवा स्पर्धांना प्रोत्साहन देऊ नये असे वक्तव्य केलेले आहे. यावर सोशल मीडियावरून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

कारण याच मुद्याला धरून म्‍हणे आता दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हापशात काँग्रेसच्‍या त्‍या बंडखोर आमदारांच्‍या प्रतिमांचे दहन करण्‍यात येणार आहे. या आमदारांनी लोककौलाला फाटा दिल्‍याच्‍या निषेधार्थ हा निर्णय घेण्‍यात आल्‍याचे समजते. कदाचित असे प्रतिकात्मक प्रतिमांचे दहन होणार ही वार्ता पोहोचल्यानेच सत्ताधारी लोकप्रनिधींनी हे नरकासुरवैगरे बंद करा असे म्हटले तर नसेल ना?

Goa News | Narkasur
Goa News: बहुजनांना आरक्षण द्या, अन्‍यथा आंदोलनाचा इशारा!

नरकासुर मंडळांचे ‘सुदिन’ संपलेत!

नरकासुर मंडळांना देणग्या देऊ नयेत, या बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या वक्तव्‍याला वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रोत्‍साहन दिले आहे. पण फोंडा, मडकईतील लोक आता याच वक्तव्‍याचा वापर आता ‘ढाल’ म्‍हणून करू लागले आहेत.

परवा फोंड्यात उद्योजकाकडे काही युवकांचा गट नरकासुरासाठी देणगी मागायला गेला तर त्या उद्योजकाने त्यांना सुदिन यांच्‍या वक्तव्‍याची आठवण करून दिली. ते ऐकताच युवकांच्‍या त्‍या गटाला हात हलवत माघारी फिरावे लागले. एका दगडात अनेक पक्षी मारावेत, ते असे.

न उलगडणारे कोडे

गेल्‍या अनेक वर्षांपासून रखडलेला नावेली ते पांझरखण तसेच तेथून बाळ्ळी इस्‍पितळापर्यंत महामार्गाच्या रुंदीकरणाला संबंधित मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर यंत्रणा आता कामाला लागली आहे. मात्र या रस्त्यावर चिंचिणी-दांडेवाडी टप्प्यात प्रस्तावित केलेल्या उड्डाणपुलाबाबत नाराजीचा सूर आहे.

Goa News | Narkasur
Traffic In Chorla Ghat: चोर्ला घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी! 'अवजड' वाहनांची पुन्हा गर्दी

सदर पुलाऐवजी तेथे अन्य पर्याय उपलब्‍ध करण्याची मागणी आहे. एकीकडे मडगाव पश्चिम बगलरस्त्यावर बाणावलीत खांबांवरील पुलाची मागणी तर दुसरीकडे दांडेवाडीत अशा पुलाला विरोध या प्रकाराने संबंधित यंत्रणा चक्रावली आहे. ‘पाळायला नेले तरी ओरडणे आणि मारायला नेले तरी ओरडणेच’ अशातला हा भाग झाला नाही का?

विद्यापीठातील घराणेशाही थांबणार?

गोवा विद्यापीठात होणाऱ्या नोकरभरतीत विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्याच नातेवाईकांना नोकऱ्या दिल्या जात असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. विद्यापीठ स्वायत्त संस्था असूनही तेथे म्‍हणे असे प्रकार चालतात.

त्यातच आता पुन्हा नोकरभरतीसाठी जाहिरात आली असल्याने यंदाही विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्याच सग्यासोयऱ्यांना नोकऱ्या दिली जातील का, या चिंतेने अन्‍य उमेदवार ग्रासले आहेत. सरकारतर्फे नोकरभरती आयोगामार्फत केली जाणार असल्‍याचे जाहीर करण्यात आले आहे. हा नियम विद्यापीठालाही लागू होऊन तेथे सुरू असलेली घराणेशाही संपणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

Goa News | Narkasur
Congress: काँग्रेसला नवे चेहरे मिळणार तरी कसे? 'खरी कुजबूज'

कारवाई फक्त कागदावरच

‘आओ जाओ गोवा तुम्हारा है’ अशी हिंदीतील म्हण परप्रांतियांसाठी वापरली जाते. आता ही म्‍हण इतर राज्यांतील ट्रॉलर्सना लागू होतेय. मासेमारी हंगामाच्या सुरूवातीला कर्नाटकातील ट्रॉलर्सनी गोव्याच्या हद्दीत येऊन सुमारे पंधरा दिवस बुलट्रॉलिंग मासेमारी केली. मात्र त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई संबंधित खात्यांनी केलेली नाही.

आता तर वास्कोतील बायणा समुद्रकिनाऱ्यावर कर्नाटकातील ट्रॉलर्स बिनधास्‍तपणे विसावत आहेत. या ट्रॉलर्सवर कधी कारवाई होणार का, की केवळ कागदावरच सरकार कारवाई भाषा करणार, असा सवाल उपस्‍थित केला जात आहे.

नरकासुरांची बिदागी

गेल्या वर्षी नरकासुर मंडळांची दिवाळी जोमात होती. कारण इच्छुक उमेदवारांनी मंडळांना भरभरून मदत केली होती. त्यामुळे यावर्षीही त्या व्यक्ती आम्हाला मदत करतील अशी आशा बाळगणाऱ्यांची पणजीत तरी घोर निराशा झाली आहे. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कोणाही मंडळाला नरकासुर करण्यासाठी मदत देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Goa News | Narkasur
Goa Accident Cases: करमल घाटात रक्ताचे पाट; अपघातांची मालिका सुरुच!

तिकडे सुदिन ढवळीकरांनी कौतुकही केले. एका बाजूला अशी कौतुकाची शिडी चढली जात असताना दुसऱ्या बाजूला मर्जीतील मंडळांना मदत मिळाली बरं का, असा सूरही निघू लागला आहे. त्यामुळे त्यात खरे किती आणि खोटे किती? गेल्या वर्षी उत्पल पर्रीकरांनीही मंडळांना भेटी दिल्या होत्या.

त्यामुळे कदाचित मोन्सेरात यांना हात हलका सोडावा लागला असावा, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. असो, बिदागी मिळाली नसली तरी नरकासुराला मदत करणारे नगरसेवक आहेतच की. सध्या त्यांच्याकडे मंडळांनी मोर्चा वळविला आहे म्‍हणे.

Goa News | Narkasur
Goa News: मडगावात आज श्रीकृष्ण पूजनोत्‍सव!

तारांकितवाल्यांचा कचरा

गोव्याची संपूर्ण किनारपट्टी तारांकित हॉटेल्‍सनी व्यापून गेली आहे. पर्यटन क्षेत्रात ही हॉटेल्‍स महत्त्वपूर्ण योगदान देत असली तरी त्यातील काळी बाजूही आता समोर आली आहे. अशा हॉटेल्‍सना सरकारने एमआरएफ सुविधा सक्तीची करावी अशी मागणी चिंचोणे पंचायतीने करून त्याला वाचा फोडली आहे.

ही हॉटेल्‍स आपल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ठेकेदार नेमतात व ते असा कचरा नेऊन कुठेतरी निर्जनस्थळी टाकतात अशा सर्रास तक्रारी आहेत. मात्र सरकारला तारांकित हॉटेल्‍सवर अशी कोणतीही सक्ती करण्याचे खरेच धाडस होईल का, हाच खरा प्रश्‍‍न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com