

राजकीय पक्षांतील चढाओढ
फोंड्यात सध्या वरचढ होण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. कुर्टी-फोंड्यातील गणपती विसर्जनस्थळाची दुर्दशा काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी आधी सर्वांसमोर आणली आणि दुरुस्तीकामाची मागणी केली. त्यानंतर ‘आप’चे गीतेश नाईक यांनीही हा विषय हाती घेतला. या दोघांच्या प्रयत्नांमुळे शेवटी हा प्रश्न ठळक झाला. मात्र, यातून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे काँग्रेस आणि ‘आप’वाले दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. एका अर्थाने काँग्रेस आणि ‘आप’चा हा उपक्रम स्तुत्य आहे, हे मान्य करावेच लागेल. शेवटी कुणाचाही कोंबडा आरवू दे, सकाळ झाली म्हणजे झाले.
दळवींची धावपळ
एखादा परीक्षार्थी परीक्षेला बसण्याकरता सर्व बाजूंनी कशी तयारी करतो, तसे सध्या फोंड्याचे नगरसेवक तथा भाजपचे इच्छुक उमेदवार विश्वनाथ दळवी यांचे चालले आहे. बुधवारी ‘ईद’च्या दिवशी सकाळपासून त्यांची गडबड सुरू होती. मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देणे काय, मशिदीमध्ये जाऊन नमाज पढणे काय, हे त्यांचे प्रकार आज दिवसभर फोंड्याच्या लोकांसाठी चर्चेचा विषय बनले होते. त्यात परत फोंडा मतदारसंघात विविध भागातील मुस्लीम बांधवांचे फोटो टाकून लावलेले त्यांचे ‘ईद’च्या शुभेच्छा देणारे फलकही उठून दिसत होते. तशी तयारी तर जोरदार आहे, दळवीबाब; पण या तयारीला ‘फळ’ काय मिळते, हे मात्र बघावे लागेल, असे आता फोंडावासीय बोलायला लागले आहेत. त्यामुळे आता रंगत आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
‘ए-आय’ कॅमेऱ्याचे तालांव
वाहनचालकांना ‘ए-आय’ कॅमेऱ्याची भीती असल्याने सध्या हळूहळू रस्त्यावर शिस्त येऊ लागली आहे. कित्येकांनी स्कूटी वा चारचाकीचे इन्शुरन्स काढले नव्हते, ते जाग्यावर पडत आहे. कागदं घेऊन किंवा ती व्यवस्थितपणे डिजिटल स्तरावर ठेवून गाडी चालवणे ही शिस्तच. बेल्ट घालणे, हेल्मेट परिधान करणे या गोष्टीही कॅमेरा टिपेल व चलन पाठवेल या भीतीने कटाक्षाने पाळल्या जातात. या शिस्तीमुळे अपघातही कमी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर अशाप्रकारे करून घेणे म्हणजे अद्ययावत राहणे. कायदा मोडण्याची सवय झाली होती. सिग्नल असताना पोलिस नाही म्हणून ते मोडून जाणे हे आता शक्य नाही. कारण कॅमेरा आहे. हा वचक अगदी उत्तम आहे. रहदारी सुलभ, सुकर होईल ही आशा.
...म्हणून वीरेशकडून केवळ ३० दिवस
अखेर अपेक्षेनुसार रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजी) येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याचे निश्चित करून चर्चेसाठी समितीही स्थापन केली. ही समिती स्थापन करतानाच जागावाटप, समान किमान कार्यक्रम आदींबाबतच्या चर्चा ३० दिवसांत संपवण्याची विनंती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना केली आहे. आघाडी करण्याबाबत इतर विरोधी पक्षांना शेवटपर्यंत झुलवत ठेवणे आणि अंतिम क्षणी आघाडी करून त्यांना कमी जागा देणे, असाच इतिहास आतापर्यंत काँग्रेसचा राहिलेला आहे. त्यामुळेच बोरकर यांनी काँग्रेसला केवळ ३० दिवसांचा अवधी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. यात आमदार बोरकर यांनी लोकसभा निवडणुकीचीही अट घातली आहे. त्यामुळे लोकसभेच्या राज्यातील दोन जागांपैकी एक जागा ‘आरजी’ने मागितल्यास काँग्रेसची भूमिका काय असेल? हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
सर्वसामान्यांना ताप
संरक्षणमंत्री पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाच्या उद्घाटनासाठी जाण्यापूर्वी महामार्ग तब्बल ३० मिनिटे बंद ठेवण्यात आला आणि सामान्य वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकवून ‘व्हीआयपी संस्कृती’चा पुन्हा एकदा प्रत्यय देण्यात आला. काही मिनिटांच्या ‘व्हीआयपी’ प्रवासासाठी शेकडो वाहनचालकांचा वेळ आणि संयम पणाला लागला. रस्ते सर्वसामान्यांच्या सोयीसाठी की ‘व्हीआयपीं’च्या सोयीसाठी, असा सवाल या घटनेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. लोकशाहीत सगळे समान असले, तरी रस्त्यावर मात्र काहीजण ‘थोडे अधिक समान’ असल्याचे चित्र दिसून आले!
राधारावांचे सोर्सेस...
निवडणूक जवळ आली की सासष्टीचे वातावरण तापू लागते आणि अशा वातावरणात राधारावांसारखे काही राजकारणी त्यात खमंग फोडणीही टाकू लागतात. सध्या राधाराव ग्रासियस एकापाठोपाठ एक घणाघाती असे पोस्ट आपल्या सोशल मीडियावर टाकू लागले आहेत. नुवेची उमेदवारी किती पैशांना विक्रीला काढली आहे? खर्गे यांचे हॉटेलचे बिल कुणी फेडले? विजयचा फायनान्सर कोण? अशी एकापाठोपाठ एक वक्तव्ये राधाराव करत आहेत. हे सर्व पाहिल्यास दुसऱ्या पक्षातील बित्तंबातम्या राधारावापर्यंत पोहाेचवतो तरी कोण?
लुईझिनची पंच्याहत्तरी
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी आमदार म्हणून गोवा विधानसभेचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात त्यांना अनन्यसाधारण असे स्थान आहे आणि त्यांचा लोकसंपर्कही त्यामुळे दांडगा आहे. काल फालेरो यांनी आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांनी खास समारंभ जरी ठेवला नसला तरी त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी होती. त्यात बरेच राजकारणीही होते. फालेरो हे राजकारणातून निवृत्त झाले असले तरी अजूनही त्यांचा प्रभाव कमी झालेला नाही, हेच जणू काल त्यांच्या घरी झालेल्या गर्दीतून दिसत होते.
काहींचे डोळे चमकलेच!
फोंड्यात सुभाष शिरोडकर यांनी जनता दरबार सुरू केला आणि फोंडावासीयांना आपल्या समस्या आणि गाऱ्हाणी मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. फोंड्याचे पात्रांव गेल्यानंतर गेले दहा महिने फोंड्याला वालीच नाही, त्यामुळे सुभाष शिरोडकर यांनी पालकमंत्री या नात्याने फोंड्याची जबाबदारी स्वीकारली आणि गेले दोन मंगळवार फोंड्यात हा जनता दरबार सुरू आहे. दुसऱ्या मंगळवारी तर फोंड्याचे युवा नेते रितेश नाईक हे सुभाषभाऊंसोबत बसलेले दिसले. एका अर्थाने पुढील निवडणुकीची ही एक झलक तर नाही ना... असेच वाटले. कारण गेल्या पोटनिवडणुकीत रितेश नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, आता भाजपची उमेदवारी कुणाला? हा प्रश्न अनुत्तरित आहे. तरीही रितेश नाईक आणि सुभाष शिरोडकर एकाच व्यासपीठावर तेही जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी म्हटल्यावर काहीजणांचे डोळे चमकलेच!
पोलिस खबरेही संकटात...
पोलिसांमध्ये ‘खबऱ्या’ हा एक महत्त्वाचा घटक आहे. पोलिसांना इत्थंभूत माहिती देण्याचे काम हे खबरे करीत असतात. आता हे खबरेही डेंजर झोनमध्ये आले आहेत. वानगीदाखल उदाहरण म्हणजे बाणावलीत हल्लीच घडलेली एक घटना. तिथे पोलिसांचा एक खास खबऱ्या आहे. तो नेहमी परिसरात घडणाऱ्या घटनांची माहिती पोलिसांना इमानेइतबारे देत होता. कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयोजित एका धीरयोच्या विषयी त्याने पोलिसांना सतर्क केले व त्याचे परिणामही त्याला लागलीच भोगावे लागले. आपल्या विरोधात पोलिसांचे कान भरले, ही आतील खबर त्या धीरयो आयोजकाला मिळाली व त्याने त्या खबऱ्याच्या कानशिलात लगावली. पोलिसांचे व धीरयोवाल्यांचे साटेलोटे असते, असे नेहमीच म्हटले जाते, ते काही उगीच नव्हे बरे का?
आता हुतात्म्यांची शोधमोहीम!
गोव्याच्या मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक हुतात्म्याचे नाव दगडावर कोरले जावे, अशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सूचना केली आहे. आता खरी कसोटी सरकारचीच, इतिहासाच्या पानांवर, सरकारी फायलींत आणि जुन्या नोंदींत दडलेली नावे शोधताना एखादे नाव ‘फाईलमध्ये सापडले नाही’ म्हणून हुतात्म्यांच्या यादीतून गायब होऊ नये, एवढीच अपेक्षा. कारण गोवा मुक्त करण्यासाठी ज्यांनी रक्त सांडले, त्यांची नावे दगडावर कोरण्याचे काम आहे; सरकारी लालफितीत गुंडाळून ठेवण्याचे नव्हे!
चतुर्थीची ‘पोटली’ कधी?
महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. साखर, तेल, गूळ, तांदूळ, कडधान्ये सारेच खिशाला परवडत नाही, अशी स्थिती आहे; परंतु यंदा महागाईला टाळता येईल; कारण निवडणुकीचे वर्ष असल्याने अनेक राजकारणी चुतर्थीला लागणाऱ्या साहित्याची ‘पोटली’ वितरित करणारच आहेत. मागील चार वर्षे ही पोटली जरी आली नसली तरी यंदा सगळेचजण ती वितरित करतील, अशी अपेक्षा असून नागरिकांना त्याची आवश्यकतादेखील आहे. जर कोणी साहित्य दिले नाही तर विधानसभा निवडणुकीत त्यांना मत दिले जाणार नाही, असा काहींनी निर्धार केला असल्याची चर्चा आहे. बाकी चतुर्थीला ही भेट सर्वसामान्यांसाठी होती, आता इतर नागरिकही जरी रांगेत दिसले तरी कोणाला अतिशयोक्ती वाटू नये.
तिळारीचे खर्चिक पाणी!
तिळारी कालव्याच्या २२ किलोमीटरच्या कामासाठी गोवा तब्बल ७५ टक्के खर्च उचलणार; कारण पाण्याचा ७५ टक्के वापर गोवा करतो. महाराष्ट्राचा वाटा फक्त २५ टक्के! कालवा बंद असताना आमठाणे आणि कुचेली पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जाणार आहे. आता गोमंतकीयांनी एवढीच आशा ठेवायची की, ७५ टक्के खर्चाच्या बदल्यात निदान ७५ टक्के खात्रीने पाणी तरी मिळावे; नाहीतर तिळारीचे पाणी वाहत राहील आणि गोव्याची जनता नेहमीप्रमाणे ‘पाणी कुठे गेले?’ याचा शोध घेत राहील! तिळारीचे पाणी बंद होणार या वार्तेमुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, पाईपलाईन घातल्याच्या वृत्ताने त्यावर फुंकर घातली तरी त्यानंतर काय? हा प्रश्न कायम आहे.
आता विजय काय करणार?
विधानसभा निवडणुकीतील आघाडीसंदर्भात ‘आरजी’ आणि ‘आप’ या दोन पक्षांसोबत दोन दिवसांत चर्चा सुरू करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी जाहीर केले. त्याचवेळी गोवा फॉरवर्डला आघाडीत घेण्याबाबतच्या प्रश्नावर बोलणे त्यांनी टाळले होते. शेवटी पत्रकारांनी यावर स्पष्ट उत्तर देण्याची मागणी लावून धरल्यानंतर मात्र गोवा फॉरवर्डनेच आघाडीबाबतच्या चर्चेला स्थगिती दिली असून, त्यांनी स्थगिती उठवल्यानंतर आम्ही चर्चेला सुरवात करू, असे ते म्हणाले. आता आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई चोडणकरांना सकारात्मक प्रतिसाद देणार की वेगळा मार्ग निवडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
रायन ब्रागांझांची राजकीय टोलेबाजी!
माजी नगराध्यक्ष संदीप फळारी यांच्या येत्या शनिवारी होणाऱ्या नागरी सत्काराची रूपरेषा मांडण्यासाठी आयोजकांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी फळारींचे कौतुक करताना, ‘त्यांची पालिका प्रशासनावर भक्कम पकड होती आणि ते म्हापशाच्या सर्वोत्कृष्ट नगराध्यक्षांपैकी एक ठरले,’ असे सांगितले. मात्र, लगेचच मागील पालिका मंडळाच्या कारभारावर निशाणा साधत, ‘गेल्या कार्यकाळात त्या दर्जाचे प्रशासन दिसलेच नाही. उलट काहीजण तर केवळ नावापुरतेच नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेले दिसतात,’ असा टोला त्यांनी लगावला. आता त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणावर होता, याचा अंदाज राजकीय वर्तुळात आपापल्या परीने लावला जात आहे. स्वतः सामाजिक कार्यात सक्रिय आणि आगामी आमदारकीच्या शर्यतीत असणाऱ्या रायन यांचा हा राजकीय बाण थेट स्थानिक आमदारांवरच रोखलेला होता, अशी चर्चा सध्या म्हापशात रंगली आहे. कारण मागील पालिका मंडळ हे आमदारांच्याच आशीर्वादाने चालले होते आणि त्या पाच वर्षांत शहराने तब्बल चार नगराध्यक्ष पाहिले. त्यामुळे फळारींच्या सत्कारानिमित्त रायन यांनी जुन्या कारभाऱ्यांसह त्यांच्या पाठीराख्यांवर नेम धरत ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारले आहेत.
पेराल तेच उगवणार!
पेराल तेच उगवणार, अशी एक म्हण आहे... तीच स्थिती आता महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये दिसत आहे. काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन चेतन मंजु देसाई महाविद्यालयातील अपक्ष निवडून आलेला जनरल सेक्रेटरी ‘एनएसयूआय’च्या डोळ्यांत धूळ फेकत ‘अभाविप’ आणि ‘भाजयुमो’च्या गोटात शिरला. जे काही गोव्याच्या राजकारणात घडले, त्याचे प्रतिबिंब आता विद्यार्थी निवडणुकांमध्येही दिसत आहे. परंतु, दुर्दैवाची बाब ही की राजकारणात काँग्रेसला रामराम करत आमदार भाजपात गेले आणि विद्यार्थी राजकारणात ‘एनएसयूआय’ला चकवा देत ‘अभाविप’कडे गेले... सुज्ञास नेमके कोण चुकतेय हे कळालेच असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.