खरी कुजबुज: 'फोकस' निवडणूक

Khari Kujbuj Political Satire: मंत्रिपद मिळाल्‍याने राजकीय वजन वाढल्‍याचा फायदा घेत संकल्‍प मुरगावातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून निवडणुकीचा प्रचारच सुरू केल्‍याचे दाखवून देत आहेत.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

‘फोकस’ निवडणूक

विधानसभा निवडणूक अवघ्‍या तीन महिन्‍यांवर येऊन ठेपल्‍यानंतर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साडेचार वर्षांपासून मंत्रिपदाच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या संकल्‍प आमोणकर यांची मंत्रिपदी वर्णी लावली आणि माजी मंत्री स्‍व. रवी नाईक यांच्‍याकडे असलेल्‍या खात्‍यांचा कारभार त्‍यांच्‍याकडे सोपवला. आमोणकरांनी तीन दिवस तिन्‍ही खात्‍यांचा आढावा घेत, चौथ्‍या दिवशी कार्यालयाचा ताबा घेतला, पण त्‍यानंतर मात्र मंत्रिपदाच्‍या विळख्‍यात न अडकता निवडणुकीचा गांभीर्याने विचार करीत त्‍यांनी आपल्‍या मुरगाव मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. मंत्रिपद मिळाल्‍याने राजकीय वजन वाढल्‍याचा फायदा घेत संकल्‍प मुरगावातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून निवडणुकीचा प्रचारच सुरू केल्‍याचे दाखवून देत आहेत. त्‍यांना जनतेकडूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत असल्‍याने त्‍यांच्‍याविरोधात निवडणूक लढवू इच्‍छिणाऱ्यांचे धाबे आताच दणाणले असल्‍याच्‍या चर्चा मुरगावात सुरू आहे.

पेडणे - काणकोण वंदे भारत

गोव्यात आधीच मुंबई-गोवा आणि बंगळूर-गोवा अशा दोन वंदे भारत धावत असताना, आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणे ते काणकोण अशी आणखी एक वंदे भारत सुरू करण्याची आशा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी स्वतः काणकोण ते पेडणे असा रेल्वेप्रवासही केला. त्यामुळे गोव्यातील रेल्वे प्रवासाला आता नवा वेग मिळणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पेडणे ते काणकोण हे अंतर कापण्यासाठी वंदे भारत धावणार असेल, तर प्रवासाच्या वेगापेक्षा गाडीच्या थांब्यांची संख्या आणि तिकिटाचा दर हेच अधिक कुतूहलाचे विषय ठरतील! उद्या पणजी ते मडगावसाठीही वंदे भारतची मागणी झाली, तर आश्चर्य वाटायला नको. अखेर गोव्याच्या विकासाची गाडी सुसाट धावली पाहिजे, मग ती रेल्वेच्या रुळांवर असो वा घोषणांच्या!

Khari Kujbuj Political Satire
Goa New Taxi Rules: टॅक्सी व्यवसायाला मोठा धक्का! आता चालकासह कारही मिळणार भाड्याने; केंद्र सरकारचा नवा नियम

दोन्ही संकेत मिळाले?

सध्या राजकीयदृष्ट्या अगदी बॉयलिंग पॉईंटवर असलेल्या सावर्डे मतदारसंघात दोन संकेत आहेत. त्यातील एक संकेत म्हणजे सध्या सावर्डे मतदारसंघात भाजप उमेदवारीवर दावा करणारे युवा नेता संकेत आर्सेकर, तर दुसरे आहेत काँग्रेस उमेदवारीवर दावा करणारे युवा नेते संकेत भंडारी. हे दोन्ही नेते आपापल्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात, पण रविवारी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले. रविवारी संकेत आर्सेकर यांनी सावर्डे येथील आपल्या कार्यालयाचे उद्‍घाटन केले आणि ‘फोव पे चर्चा’ही केली. त्यावेळी संकेत आर्सेकर यांचे अभिनंदन करण्यासाठी चक्क संकेत भंडारी उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही संकेत एकत्र आले तर नाहीत ना? या चर्चेने जोर धरला नसता तरच नवल!

भेटी काय कामाच्या?

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी कार्यालयांना भेटी देण्याचा धडाका कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. मात्र, कार्यालयात गैरहजर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईऐवजी केवळ समज देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या भेटींचा धाक किती दिवस टिकणार, हा प्रश्न आहे. कारण सरकारी कार्यालयांत गैरहजेरीला समज आणि कामचुकारपणाला माफी मिळत असेल, तर कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांच्या भेटीला घाबरायचे तरी कशाला? ‘समज’ मिळवण्यासाठी हजेरी लावण्याची गरजच उरणार नाही!

अखेर दोन महिला पोलिस स्थानके

राज्यात दोन महिला पोलिस स्थानकांना अखेर अधिकृत अधिसूचनेचा दर्जा मिळाला आणि पणजी व मडगावच्या कार्यक्षेत्राचीही निश्चिती झाली. आत्तापर्यंत महिला व बालकांवरील गुन्ह्यांचा तपास एकाच पोलिस स्थानकावर अवलंबून असल्याने तिथल्या पोलिसांवर कामाचा मोठा ताण होता. मात्र, आता उत्तर गोव्यासाठी पणजी आणि दक्षिण गोवा व कुशावतीसाठी मडगाव असे स्वतंत्र कार्यक्षेत्र निश्चित झाल्याने त्या पोलिस स्थानकावरील भार काहीसा हलका होणार आहे. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडत एकमेकांचे अभिनंदन केले. आता प्रश्न एवढाच की, पोलिस स्थानकांची संख्या दोन झाली, कार्यक्षेत्रही विभागले गेले; पण महिलांना न्याय मिळण्याचा वेगही दुप्पट होणार का? कारण अधिसूचना काढणे सोपे, पण न्याय मिळवून देणे हेच खरे आव्हान आहे!

भाषेची अस्मिता की सत्तेचा सारीपाट?

बेळगावच्या सीमेवर मराठी-कन्नड वाद धगधगत असताना, आता याचे पडसाद गोव्यात उमटू लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. निमित्त ठरले, सांकवाळमधील ‘कर्नाटक राज्योत्सव’ मेळाव्याचे! सर्वोच्च न्यायालयाचे वकील संदीप पाटील यांनी गोव्यातील सुमारे साडेतीन लाख कन्नड भाषिकांसाठी विधानसभेत थेट राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. म्हादईच्या पाण्यावरून दोन्ही राज्यांत विस्तव जात नसताना, ‘म्हादईप्रश्नी आम्ही गोव्यासोबतच’ अशी मखलाशी करून स्थानिकांचा रोष टाळण्याचा प्रयत्न झाला; पण पडद्यामागची गोम वेगळीच असल्याची चर्चा आहे. तिकडे बेळगावात मराठी भाषिकांचा संघर्ष सुरू असताना, इकडे स्थानिक आमदारांच्या साक्षीने कन्नड समाजाने स्वतंत्र नेतृत्वाची हाक दिल्याने खमंग चर्चा रंगली आहे. म्हादईचा वाद पेटता ठेवून गोव्यात साडेतीन लाख मतांच्या जोरावर सत्तेत वाटा मागणं, हे निव्वळ भाषेचे प्रेम आहे की गोव्याच्या भूमीवर मांडलेला सत्तेचा नवा सारीपाट? असा प्रश्न आता विचारला जात आहे!

बालाजीचेही शक्ती प्रदर्शन

भाऊ नको आणखी कुणीही चालेल अशी मागणी करून सावर्डे मतदारसंघात विनय, दीपक, विलास रमाकांत, बालाजी आणि डॉ. मिलिंद एकत्र आले असून त्यांनी सावर्डे युनायटेड फोर्स म्हणून आपला एक सहाजणांचा गट केला आहे. आमच्यापैकी कुणालाही एकट्याला उमेदवारी द्या आम्ही सगळे एकत्रित काम करू असे त्यांनी आपले धोरण ठरवले आहे. रविवारी या गटाची धारबांदोडा येथील कार्यकर्त्यांबरोबर बैठक झाली. यासाठी प्रत्येक प्रभागातून मिळून १०० व्यक्ती आणण्याची जबाबदारी म्हणे बालाजी गावस यांना दिली होती, पण प्रत्यक्षात या बैठकीला २०० च्या आसपास लोक होते. एका अर्थाने बालाजी यांनीही ही गर्दी जमवून आपले शक्ती प्रदर्शन घडवून आणले म्हणायचे तर!

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

बोरकर घाबरले

मुख्‍य निवडणूक आयोगाने आपल्‍या कृतीतून आरजी मनोज परब गटाकडेच असल्‍याचे वारंवार दाखवून दिल्‍याने परब यांचे सहकारी अजय खोलकरांनी आमदार वीरेश बोरकर यांच्‍यावरील हल्लाबोल सुरू ठेवला. आता २२ नोव्‍हेंबरला मनोज परब पक्षात पुन्‍हा येत असल्‍याने खोलकरांना दहा हत्तींचे बळ मिळणार असून परब आणि खोलकर दोघे मिळून वीरेश बोरकर यांच्‍यासमोर संकटे उभारण्‍याचा प्रयत्‍न करू शकतात. हे लक्षात घेऊनच आमदार बोरकर यांनीही आक्रमक पवित्रा घेण्‍यास सुरुवात केली आहे, पण बोरकर जे सांगतात, त्‍याच्‍या उलट वागतात, हे त्‍यांनी दाखवून दिले आहे. अजय खोलकर यांना मानहानीची नोटीस जारी करीत तीन दिवसांत माफी न मागितल्‍यास खटला दाखल करण्‍याचा इशारा बोरकरांनी दिला होता, पण तीन दिवस उलटून गेल्‍यानंतरही बोरकर गप्‍पच असल्‍याने बोरकर-खोलकर आता काय पवित्रा घेतात, याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

उर्फानचा बालदिन

गोवा हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी शनिवारी दवर्ली येथील अंजुमन शाळेत बालदिन साजरा केला. सध्या शाळांना दिवाळीची सुट्टी असतानाही मुल्ला यांच्या या कार्यक्रमाला विद्यार्थी हजर होते. शिक्षकवर्ग पडत्या फळाचा आदेश मानून उपस्थित होते. उपस्थिती बघून उर्फान मियाँही आतून सुखावले. त्यांनी आवेशपूर्ण भाषण ठोकताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे व भाजपाचे गुणगान गायले. आता ते उपस्थित विद्यार्थ्यांना समजले की नाही हा भाग वेगळा. मात्र, उर्फान यांची राजकीय आकांक्षा बरीच मोठी आहे व सत्ताधारी पार्टीच्या मदतीशिवाय ते शक्य नाही हे त्यांना पुरते माहीत आहे. त्यासाठीच तर हा सारा खटाटोप नसावा ना?

प्रस्थापितांची धाकधूक वाढली...

राज्याच्या राजकारणात निवडणुकीचे वारे वाहू लागताच, प्रत्येक पक्षाने युती आणि विजयाची गणिते आखण्यास सुरुवात केली आहे. या राजकीय हालचालींमध्ये सध्या प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सणासुदीच्या निमित्ताने गावागावांत दिवाळी आणि नाताळाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या फलकांवर ‘इच्छुक उमेदवार’ असा थेट उल्लेख करण्याऐवजी अनेकांनी नावापुढे ‘समाजसेवक’ अशी ओळख लावण्याची शक्कल लढवली आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, नव्याने पुढे येणाऱ्या या इच्छुकांच्या वाढत्या यादीने गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघात तयारी करणाऱ्या प्रस्थापित आणि जुन्या नेत्यांची धाकधूक वाढवली आहे हे नक्की.

प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा इंधन भरण्याची घाई

चोडण-रायबंदर जलमार्गावरील रो रो फेरीबोटीत प्रवासी सेवा सुरू असतानाच इंधन भरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरू लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फेरीबोटीच्या शिडीजवळ महिलेचे केस यंत्रात अडकण्याची घटना ताजी असतानाच आता इंधन भरण्याचा हा नवा प्रताप! म्हणजे प्रवाशांनी फेरीबोटीत बसताना केवळ नदी पार करण्याचीच नव्हे, तर एखाद्या दुर्घटनेतून सहीसलामत बाहेर पडण्याचीही तयारी ठेवायची काय? भर नदीत इंधनाला आग लागली तर प्रवाशांनी पोहण्याचे कौशल्य दाखवत थेट नदीत उड्या मारून किनारा गाठायचा? फेरीबोट प्रशासनाला प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा इंधन भरण्याची घाई अधिक महत्त्वाची वाटत असेल, तर अशा कारभाराला सुरक्षित जलवाहतूक म्हणायचे तरी कसे? दुर्घटना घडल्यानंतर चौकशीचे सोपस्कार करण्यापेक्षा आधीच सुरक्षिततेचे भान ठेवलेले बरे!

मच्छिंद्रनाथ प्रियोळच्या आखाड्यात?

प्रियोळमध्ये गोविंद गावडे आणि सुनील जल्मी यांच्यातील राजकीय कुस्तीची चर्चा रंगत असतानाच मच्छिंद्र शिरोडकर यांनीही आखाड्यात उतरण्याची तयारी केल्याची चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून मोटारसायकल पायलटांपर्यंत गाठीभेटी, मतदारसंघात दौरे आणि ‘सेवा एनजीओ’च्या माध्यमातून वाड्यावाड्यांवर जनसंपर्क सुरू आहे. फलक झळकताहेत, पण पक्षाचे नाव मात्र गायब! ही समाजसेवा की निवडणुकीची पूर्वतयारी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तिसरा भिडू अपक्ष उतरणार की कुणाच्या आशीर्वादाने मैदानात येणार? प्रियोळच्या राजकीय आखाड्यात सध्या याचीच चर्चा आहे!

Khari Kujbuj Political Satire
Goa Water Crisis: 'जल है तो कल है'! यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे गोव्यात पाणीटंचाईचे गडद संकट

जनमताचा असाही रेटा

गौरेश नागवेकर हा क्रिकेटपटू आयएसपीएलसाठी लिलाव पद्धतीने निवडला गेला. सुरुवातीला त्याचे नाव लिलावात समाविष्ट नव्हते. त्यामुळे अनेकांनी हल्ला-गुल्ला केला. काहींनी त्यासाठी प्रयत्न केले, तर काहींनी समाज माध्यमांवर आपली व्यथा मांडली. जनमताच्या या एकत्रित रेट्यामुळे नागवेकर याचे नाव वाइल्ड कार्ड लिलावात समाविष्ट करण्यात आले आणि आता त्याला भरघोस मानधनही लिलावातून मिळाले आहे. जनमताचा रेटा काय करू शकतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

विकास देईकरच्या कोठडीची चर्चा

पोलिस खात्यात रुबाबात वावरणाऱ्या विकास देईकर यांना आता न्यायालयीन कोठडीची हवा खावी लागणार असल्याने पोलिस वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. आत्तापर्यंत पोलिस ठाण्यात खुर्चीवर बसून आदेश देण्याची सवय असलेल्या साहेबांना आता न्यायालयीन कोठडीत कोणाचे आदेश ऐकावे लागणार, याचीच उत्सुकता काहींना लागली आहे. तिथे ना पोलिस निरीक्षकाचा रुबाब चालणार, ना पदाचा धाक! आता वर्दीचा दरारा बाजूला ठेवून कैद्यांच्या रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. काळाचा खेळही कसा असतो पाहा, कालपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करणारे आज त्याच कायद्याच्या कचाट्यात सापडले!

हे खरोखरच आम आदमी पक्षाचे?

सध्या कोंब - मडगावात काही युवकांचा सुळसुळाट वाढला आहे. हे सर्व स्वतःला आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते भासवितात. मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्र नाही. हे सर्व गोमंतकीय नव्हे, तर स्थलांतरित दिसतात. त्यांच्याबरोबर कोणीही गोमंतकीय दिसत नाही. ते दारोदारी जाऊन पत्रके वाटतात व बैठकीला आमंत्रित करतात. त्यांनी दोनवेळा कोंबमध्ये कोपरा बैठका घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी पोलिस तक्रार केल्यावर तिथे येऊन त्यांना तिथून पळवून लावले. आजसुद्धा विठ्ठल मंदिराकडे बैठक आहे असे सांगून ते परिसरातील घरांमध्ये फिरले. या अनोळखी युवकांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाने या युवकांबद्दल स्पष्टीकरण देण्याची किंवा पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कोंबवाड्यावरील नागरिक करू लागले आहेत.

सार्दिनसरही शर्यतीत....

राजकारणात वयाची अट नसते हे खरेच आहे. माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांचे वय सध्या ८० आहे. या वयातही त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. कुडतरी मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कुडतरी हा त्यांचा बालेकिल्ला आहे. तब्बल सहावेळा ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत, तर दोनदा पराभूत. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण ती नक्कीच स्वीकारणार असे सार्दिन सरांनी हल्लीच सांगितले आहे. त्यांनी आपली ‘मन की बात’ सांगितल्याने मोरेन रिबेलो यांच्यासमोर बाका प्रसंग ओढवला आहे. गेल्या पाच वर्षांत मोरेनबाबने कुडतरीत कॉंग्रेसचे काम सुरू ठेवले होते ते आमदारकीसाठी. जर सार्दिन यांनी काँग्रेसची उमेदवारी पदरात पाडून घेतली, तर आपले काय होणार ही चिंता आत्तापासूनच मोरेन यांना ग्रासू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.