

तोच कित्ता काँग्रेस पुन्हा गिरवणार?
येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) या दोन पक्षांत युती होण्याचे निश्चित झाल्यानंतर ‘आरजी’चे लक्ष आता जागा वाटपाच्या बैठकीकडे लागले आहे. गोवा राखण यात्रा संपताच जागा वाटपाबाबत बैठक घेण्याची हमी ‘आरजी’चे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांना काँग्रेसने दिली होती. यात्रा संपून चार दिवस उलटले तरीही काँग्रेसकडून जागा वाटपाच्या बैठकीची निश्चित तारीख ठरवली जात नसल्याने ‘आरजी’ पदाधिकाऱ्यांतील संभ्रमावस्था वाढत चालली आहे. गेल्या काही निवडणुकांत काँग्रेसने समविचारी पक्षांना आघाडीसाठी शेवटपर्यंत लटकवले आणि आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेतल्या होत्या. त्याचाच कित्ता काँग्रेस यावेळी तरी गिरवणार नाही ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
बाबू कवळेकर गप्प का?
‘वादळापूर्वीची शांतता’ असा मराठीत एक वाक्प्रचार आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकीय पक्ष आपले अस्तित्व दाखविण्यासाठी धडपडतात. निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असलेले मतदारांशी संपर्क वाढवायला लागले आहेत. गेली पाच वर्षे अज्ञातवासात असलेले काही तथाकथित नेते आता जागे झाले आहेत. नेहमीच चर्चेत राहणारे बाबू कवळेकर मात्र गप्प झाल्यामुळे बाबू समर्थकांत आणि बाबू विरोधकांत संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना बाबू अचानक गप्प का झाले? केपे ‘एसटी’साठी आरक्षित होणार म्हणून बाबू मागे सरलेत का? कुशावती जिल्हा झाल्यामुळे लोकसभेची एक जागा वाढणार म्हणून बाबू लोकसभेच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत का? की बाबूंची शांतता ही वादळापूर्वीची आहे? केपे मतदारसंघात हीच चर्चा रंगात आली आहे.
दसरा उजाडला तरीही...
‘नवरात्र संपली, दसरा उजाडला; मोरूचा बाप मोरूला म्हणाला - मोरू ऊठ, आज दसरा’, जुन्या पाठ्यपुस्तकातील या धड्याची आज आठवण झाली; कारण गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दसऱ्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करू, असे म्हटले होते. आज दसरा उलटून तीन दिवस झाले; पण काँग्रेस नेते एम.के. शेख यांनी दसऱ्यानंतर गोवा फॉरवर्डबरोबर बसून चहा पिऊ, असे म्हटलेले वाक्य सोडल्यास पुढे तथाकथित महायुतीबाबत काहीच झालेले नाही. आज जर मोरूचा बाप असता तर त्याने मोरूला नक्कीच म्हटले असते, मोरू ऊठ, फातोर्ड्यात जा! विजय सरदेसाई आणि गिरीश चोडणकर या दोघांनाही विचार, तुमची महायुती की काय म्हणतात ती होणार कधी बरे?
‘आरजी’ मुसंडी मारेल काय?
फोंडा तालुक्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’च्या उमेदवारांनी बऱ्यापैकी मते मिळवून पुढील काळात या पक्षाला चांगले दिवस येतील, हे दाखवून दिले होते. सांतआंद्रे मतदारसंघात आमदार निवडून आणून ‘आरजी’ने आपले खातेही खोलले होते; पण नंतरच्या काळात ‘आरजी’ अध्यक्ष आणि आमदारामध्ये बेबनाव झाल्याने कार्यकर्ते विखुरले; पण ‘आरजी’ची विविध कारणांवरून आंदोलने सुरूच राहिली. आताही राज्यात ‘आरजी’ने कामाला सुरवात केली आहे. त्यातल्या त्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ने फोंडा तालुक्यात मुसंडी मारल्याने त्याचा धसका इतर राजकीय पक्षांनी घेतला होता. ती क्रेझ पुन्हा ‘आरजी’ आणेल काय? असा सवाल केला जात आहे.
सहा शिक्षक, मात्र राज्यभर चर्चा!
अल्पवयीन विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्याच्या आरोपावरून एकाच वेळी सहा शिक्षकांची नावे चर्चेत आल्याने पेडणे तालुक्यापासून ते राज्यभर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एखाद्या शिक्षकावर आरोप झाला असता तर कदाचित लोकांनी त्याला वैयक्तिक प्रकरण मानले असते; पण सहा शिक्षक एकाच वेळी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने चर्चांना उधाण आले आहे. यामुळे प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे. अर्थात, आरोप म्हणजे दोष सिद्ध होणे नव्हे! त्यामुळे या प्रकरणातील सत्य नेमके काय, हे पोलिसांच्या चौकशीतूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत चर्चेच्या वर्गात मात्र प्रश्नपत्रिका कठीणच दिसतेय!
पेडणे पालिकेची तत्परता
सेवानिवृत्तीनंतर राजकीय वाट चालत असलेले उत्तम पार्सेकर सध्या पेडण्यात सक्रिय आहेत. त्यांनी पेडण्यात कोजागरी पौर्णिमेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणाऱ्या कमानी उभारल्या. पेडणे पालिकेने तत्परतेने शुभेच्छा देण्यासाठी उभारलेल्या त्या कमानी काढून टाकल्या आहेत. यामुळे हीच तत्परता इतर शुभेच्छा फलकांच्याबाबतीत पेडणे पालिका दाखवणार का? असा प्रश्न पेडण्यात चर्चेचा ठरला आहे. पालिका ही तत्परता केवळ विरोधकांच्या फलक आणि कमानींपुरतीच दाखवणार की सत्ताधाऱ्यांच्या अशा फलकांवरही कारवाईची हिंमत दाखवणार, अशी विचारणा लोकांकडून होत आहे.
एल्विसचे कुंकळ्ळीत बॅनर!
बॅनर लावल्याने निवडणुका जिंकणे शक्य नसले तरी बॅनर लावल्याने उमेदवाराची प्रसिद्धी होते, हे मात्र खरे. एल्विस गोम्स अजून जरी काँग्रेस पक्षात असले तरी त्यांनी काँग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याविरोधात कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. एल्विस गोम्स यांनी घरोघरी प्रचाराला सुरवात केली असून मतदारसंघातील प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यावर मोठ-मोठे बॅनर व कटआऊट लाऊन मतदारांचे लक्ष आकर्षित केले आहे. ‘आमचा स्वाभिमान एल्विस’ असा मथळा लिहिलेले बॅनर संपूर्ण मतदारसंघात लावण्यात आले आहेत. काही का असेना, एक मात्र खरे की, एल्विस गोम्स यांचा प्रचार मात्र आतापासूनच सुरू झाला आहे. एका-एका मतदाराला ते भेटत आहेत. कोणी सांगावे एल्विसची ही धडपड पुढे फळालाही येऊ शकते.
युरींनी त्यांना केले जवळ!
राजकारणात कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्याबरोबर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लाऊन त्यांच्या विजयासाठी लढलेले काही जवळचे कार्यकर्ते युरींपासून लांब गेले होते. युरी आलेमाव यांनी आपल्यापासून दुरावलेल्या जवळच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आपल्या कळपात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गैरसमज व युरींकडून मिळालेल्या सावत्र वागणुकीमुळे संतप्त झालेल्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी युरींची साथ सोडली होती. त्या नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आपल्या कळपात आणण्यात युरी यशस्वी झाले आहेत. आता त्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युरी यांनी कोणता फॉर्म्युला वापरला हे मात्र अजून समजलेले नाही.
ओळखपत्रे कुठे?
सरकारी कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत ओळखपत्र गळ्यात घालून किंवा दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवावे, असा आदेश सरकारने काढला आहे; पण वाहतूक खात्याच्या अंमलबजावणी विभागातच या नियमाची आठवण करून देण्याची वेळ येत असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे ओळख मागायची? रस्त्यावर वाहनचालकांकडून कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच ओळख पटविण्याची वेळ नागरिकांवर येत असेल, तर ही सरकारी शिस्त की शिस्तीचा सरकारी देखावा?
राधारावांना उकळ्या फुटतात तेव्हा...
भाजपचे नेते असतानाही ‘उटा’चे अध्यक्ष असलेले प्रकाश वेळीप यांनी ‘एसटी’ आरक्षण प्रश्नावरून आपल्याच सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. यावर राजकीय विश्लेषक राधाराव ग्रासियस यांनी काढलेला अर्थ असा, भाजपचे नेतेच भाजपला निर्वाणीचा इशारा देतात त्यावरून सिद्ध होते की, ‘एसटी’ आरक्षण येत्या काही दिवसांत निश्चित होणार, याचे प्रकाश वेळीप यांना खात्रीचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच त्यांनी असा इशारा दिला. मात्र, या इशाऱ्यामुळे राधारावांना हर्षाच्या उकळ्या फुटल्या आहेत, असे वाटते; कारण चार मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव झाल्यास त्यात नुवे मतदारसंघ निश्चित असणार आणि तसे झाल्यास राधाराव यांना ज्यांची उमेदवार म्हणून ॲलर्जी आहे त्यांची नावे आपसूक बाजूला पडतील ना?
कायद्याचा धाक की धाकधूक?
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, हा प्रश्न आता लोकांनाच पडू लागला आहे. काणकोणमधील घटना पाहून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. लोक एकत्र येतात, संताप व्यक्त करतात आणि पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहते. नागरिकांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही अनेक तक्रारी करून पाहिल्या; पण वेळीच कारवाई झाली असती तर आजची वेळ आली नसती. आता तक्रारींकडे दुर्लक्ष झाले की त्यातील काही धागेदोरेच अपुरे होते, हा तपासाचा विषय. मात्र, घडलेली घटना बदलता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाहीतर लोकांच्या मनात एकच प्रश्न कायम राहणार, कायद्याचा धाक गुन्हेगारांना आहे की कायद्याचीच धाकधूक नागरिकांना वाटतेय?
आकाशवाणीचे कल्याण!
प्रादेशिक बातम्यांसाठी रेडिओ लावला. पाच मिनिटे अगोदर निवेदिकेने सांगितले, आता ऐकूया सुमन कल्याणपूरकर यांनी गायिलेले गीत. कल्याणपूर हे आडनाव कल्याणपूरकर करायचे कसले कल्याण हे? शान होती एकेकाळी आकाशवाणीची. संबंधित अधिकारी रेडिओ ऐकत नाही, निवेदकांना सुधारायचा प्रयत्न करत नाही, याबद्दल कुणी संशय घेऊच नये. इतरांच्या चुका काढण्यात अग्रणी असलेल्या या निर्मात्यांनी अगोदर आपले घर स्वच्छ करावे. वेळोवेळी सुधारणा, उजळणी शिबिरे घेऊन निवेदकांकडून चुका दुरुस्त करून घ्याव्यात. उच्चार पॉलिश्ड करावेत. कोण ऐकत नाही रेडिओ हा गैरसमज व द्रोह डोक्यातून काढून टाकावा. ‘स्वच्छ भारत अभियाना’बरोबर स्वच्छ, अचूक उच्चार यावर भर द्यावा. आपल्या प्रसारणाचा दर्जा घसरत कुठे चाललाय त्याकडे लक्ष द्यावे, असे लोक बोलू लागले आहेत.
खाना, पिना, सो जाना!
हल्ली विविध रूपांत विविध स्तरावर अन्नसत्र सुरूच असतात. मंदिर असो, मठ असो तेथील हे महाप्रसाद कार्यक्रम. त्यात भर पडली आहे ती निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या जेवणावळींची. फरक इतकाच ही जेवणे मासे, मटण, चिकन, पुलाव, फ्राईड राईस अशा स्वरूपाची असतात. विराट मेनू. निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर उलटमोजणी सुरू होते. तेव्हा हा भंडारा ‘रात्रंदिन’ आम्हा युद्धाचा प्रसंग या चालीवर अविरत चालणार. ‘‘खाना, पिना, सो जाना, सब काम है पशु समान’’ असे संत ब्रह्मानंदांनी भजनात म्हटले आहे, त्याची आठवण होते. या हिंदी कविता म्हणजे काही चारोळ्या-तिरोळ्या नव्हे. त्यात अनुभवनिष्ठ सत्य आहे. जेवणावळींची कालमर्यादा मतदानापर्यंत असते. संतकविता चिरंतन निरंजनासारख्या तेवत राहतात.
‘ते’ वैद्यकीय महाविद्यालय कुठे येणार?
गोव्यात आता प्रतिवर्षी तीनशे एमबीबीएस डॉक्टर निर्माण होणार आहेत. अडीचशे डॉक्टर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून तयार होणार तर पन्नास डॉक्टर नव्यानेच सुरू होणार असलेल्या कामगार विमा महामंडळाच्या नव्या वैद्यकीय महाविद्यालात तयार होणार आहेत. मात्र, केंद्र सरकारने मान्यता दिलेले ‘ईएसआयसी’ वैद्यकीय महाविद्यालय मडगावात येते की, कुंकळ्ळीत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वैद्यकीय महाविद्यालय कुंकळ्ळीत येणार, अशी घोषणा केली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व मडगावाचे आमदार केंद्रीय इस्पितळ मडगावात येणार, असा दावा करतात. आता नेमके हे वैद्यकीय महाविद्यालय येणार कुठे?
स्पर्धा फ्लेक्स, बॅनर्सची...
निवडणुका अजून लांब आहेत; पण म्हापशातल्या भावी ‘लोकसेवकांना’ स्वतःचा चेहरा लोकांना दाखवण्याची एवढी घाई झाली आहे की, अख्खा गाव बॅनर्सनी झाकून टाकलाय. रस्त्यावरून जाताना रस्ता कमी आणि या पुढाऱ्यांचे हसरे चेहरेच जास्त दिसतात. बिचारे पालिकेचे कर्मचारी दिवसभर घाम गाळून बॅनर्स आणि फ्लेक्स उतरवून आणतात, तोच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच खांबावर तेच पुढारी नव्या जोमाने हसताना दिसतात. यावर पालिका अधिकारी म्हणतात, हा ‘गनिमी कावा’ सुरू आहे; म्हणजे आता पालिकेला बॅनर्स लावणाऱ्यांना पकडायला गुप्तहेर नेमावे लागतील की काय? दुसरीकडे शहराची वाट लागतेय, वाहतूक तुंबतेय आणि अपघाताचा धोका वाढतोय याचे भान कुणालाच नाही. आता जनताच कपाळावर हात मारून म्हणतेय, ‘बाबांनो, रस्त्यावर पोस्टर चिकटवून मते मिळत नसतात, तेवढे जरा डोक्यात राहू द्या!’
गाड्या धुण्यास पिण्याचे पाणी?
पृथ्वीवर भरपूर पाणी आहे. मात्र, पिण्यालायक पाण्याची कमतरता असल्यामुळे व यंदा गोव्यात पाऊस अत्यंत कमी पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उत्पन्न होण्याचा धोका आहे. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही पिण्याच्या पाण्याची कमतरता होण्याचा धोका ओळखून पाणी सांभाळून वापरण्याची हाक मारली आहे. मात्र, सरकारच्या डोळ्यांदेखत रोज लाखो लिटर पिण्याचे पाणी कार सर्व्हिसिंग सेंटरवाले गाड्या धुण्यासाठी वापरत आहेत. काही ठिकाणी तर घरगुती नळजोडणीचे पाणी कार सेंटरवाले वापरत असल्याचे उघड झाले आहे. पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी यासंदर्भात आवाज उठविला असला तरी प्रशासन ‘दोळ्याआड मसण पाड’ असे म्हणून गप्प आहे. कोणीतरी याची दखल घेणार का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.