खरी कुजबुज: आता गोव्याचे ऑलिम्पिकचे स्वप्न

Khari Kujbuj Political Satire: गोव्याने २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी आतापासूनच तयारी सुरू करण्याचा निर्धार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

आता गोव्याचे ऑलिम्पिकचे स्वप्न

गोव्याने २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी आतापासूनच तयारी सुरू करण्याचा निर्धार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या संवादात त्यांनी तळागाळातील क्रीडा विकासावर भर देताना आठ-नऊ वर्षांच्या मुलांपासून क्रीडा कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सरकार आर्थिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि संघटनांनी नव्या पिढीतील खेळाडूंना घडवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऑलिम्पिकचे स्वप्न मोठे; पण मैदानावरची तयारी त्याहून मोठी हवी! त्यामुळे आतापासून कामाला लागावे, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. २०२३ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून गोव्याने देशाचे लक्ष वेधले होते.

‘सीसीटीव्ही’ फुटेजमुळेच...

पर्वरी येथे झालेल्या गोळीबाराचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण माध्यमांपर्यंत कोणी पोहोचवले, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभा अधिवेशन तोंडावर आल्याने या प्रकरणातील मूळ संशयित सापडले नसल्यास अन्य दोघांना अटक करून प्रकरणावर पडदा पाडण्याचा होऊ शकणारा प्रयत्न या फुटेजमुळे उधळला गेला आहे, अशी चर्चा आहे. आता पोलिसांना मूळ संशयितांचाच माग काढावा लागणार आहे. सीसीटीव्ही फुटेज लीक झाल्यामुळे त्यात दिसणाऱ्या संशयितांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर वेळ मारून नेण्याची कृती करणे यामुळे पोलिसांना अवघड झाल्याचा चर्चेचा सूर आहे. या साऱ्यामुळे गोळ्या झाडणाऱ्यांसोबतच सीसीटीव्ही फुटेज लीक करणाऱ्याचाही पोलिसांना आता शोध घ्यावा लागणार, असा मिश्कील शेरा ऐकू येऊ लागला आहे!

Khari Kujbuj Political Satire
Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची 'बॅटिंग'! बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम; पुढील 2 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

भेटीचा शनिवार!

निवडणुकीच्या राजकारणात मतदारांची आठवण ठेवणे गरजेचेच! त्याचाच भाग म्हणून उपसभापती तथा म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी एकतानगरातील प्रभाग १२ मध्ये शनिवारी फेरफटका मारून रहिवाशांच्या समस्या ऐकल्या. अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत कार्यवाहीचे आश्वासनही दिले. गणेशोत्सवाच्या तयारीचीही चर्चा झाली. आता प्रश्न एवढाच, दर शनिवारी होणाऱ्या या भेटींमधून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षात किती सुटतात, की त्या फक्त वहीत नोंदवून पुढच्या शनिवारी पुन्हा ऐकण्यासाठी जपून ठेवल्या जातात?

‘गोमेकॉ’तील उंदीर!

बांबोळीच्या ‘गोमेकॉ’मध्ये उंदराने रुग्णाचा पाय कुरतडल्याची घटना समाजमाध्यमांवर चांगलीच गाजतेय. हा उंदीर आला कसा, हा प्रश्न सध्यातरी नकोच... पण कचरा, अस्वच्छता आणि उघड्यावर फेकलेले अन्नपदार्थ दिसले की उंदरांची ‘वस्ती’ तयार होते, असे म्हटले जाते. मग, गोमेकॉत उंदरांचा वावर आढळला म्हणजे तेथेही अस्वच्छतेने बस्तान बसवले आहे का, असा सवाल आता लोक विचारू लागले आहेत. खरे तर गोमेकॉच्या स्वच्छतेकडे सध्या विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या एका उंदराने गोमेकॉ व्यवस्थापनाचे ‘टेन्शन’ वाढवले आहे, हे नक्की! दुसरीकडे, गोमेकॉ परिसर आणि आजूबाजूला उभे राहिलेले खाद्यपदार्थांचे गाडे, त्याभोवतालचा कचरा आणि अस्वच्छता पाहता उंदरांनी येथे ‘मुक्काम’ का ठोकला, याचे उत्तर कदाचित त्यांनाच माहीत असावे!

विरोधकांच्या आवाजाकडे लक्ष

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा ‘कायदा’ नेमका कुठे आहे आणि ‘व्यवस्था’ कोण सांभाळत आहे, असा सवाल करत विरोधकांनी आता सरकारवर आरोपांची सरबत्ती सुरू केली. त्यामुळे या आरोपांचा खरा आवाज आता विधानसभेत किती घुमतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनात सरकारला धारेवर धरायचे आणि अधिवेशन संपताच बाहेर येऊन पत्रकार परिषदेत पुन्हा सरकारवर आरोपांची ‘रिपीट टेलिकास्ट’ करायची, अशी विरोधकांची रणनीती तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. आता पाहायचे एवढेच की, विधानसभेच्या सभागृहात विरोधकांचा आवाज किती बुलंद होतो आणि बाहेरच्या पत्रकार परिषदेत त्याचा ‘व्हॉल्यूम’ किती वाढतो!

दोन ‘सुभाष’ जेव्हा एकत्र येतात तेव्हा...

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि पाणीपुरवठामंत्री सुभाष फळदेसाई हे दोन्ही मंत्री ‘ओपा’ जलप्रकल्पावर धडकले आणि त्यांनी पाण्याचा आढावाच घेतला. सध्या फोंड्यातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. सुभाष भाऊंनी फोंड्यात जनता दरबार सुरू केला, त्यावेळी सर्वांत आधी प्रश्न आला तो पिण्याच्या पाण्याचा. अर्थातच, आता पाऊस कोसळत असल्याने पाण्याची टंचाई तशी अजिबात नाही; मात्र नेमके हे पाणी नळातून येत नाही, हीच कैफियत आहे. सुभाष भाऊंनी ही समस्या गंभीरपणे घेत चतुर्थीपूर्वी सर्वांना पाणी मिळाले पाहिजे, अशी ताकीदच या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. ही ताकीद देऊन सुभाष शिरोडकर थांबले नाहीत, तर या खात्याचे मंत्री असलेले सुभाष फळदेसाई यांना घेऊन त्यांनी तडक ओपा जलप्रकल्प गाठला, जेथून पाण्याचा पुरवठा होतो. आता दोन मंत्री येताहेत म्हटल्यावर सरकारी अधिकाऱ्यांना धडकी भरणारच. त्यामुळे दोन्ही सुभाषद्वयींनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि आठवड्याभरात पाण्याची समस्या सुटली पाहिजे, असा आदेश दिला. सध्या ओपा जलप्रकल्प कामाला लागला आहे, ते म्हणजे फोंडावासीयांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी.

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: दोन्ही भाडोत्री मारेकरी अजून फरार; नायक गोळीबारप्रकरणी 24 तासांनंतरही धागेदोरे सापडेनात

एल्विस गोम्स यांची घुस्मटमार!

दूषित वातावरणात माणसांना श्वास घेणे कठीण जाते. त्यामुळे माणसाला जीवघेणी घुस्मटमार सहन करावी लागते. आता राजकीय पक्षांत काही नेत्यांची म्हणे घुस्मटमार होत आहे. स्थानिक पक्षनेत्यांनी आपल्याला बाजूला केल्याची खंत एल्विस गोम्स यांनी बोलून दाखविली. खरे म्हणजे, सरकारी नोकरीत असताना घुस्मटमार होते म्हणून एल्विस गोम्स यांनी उच्चपदावरील नोकरीला रामराम ठोकून सेवानिवृत्ती पत्करली होती. राजकारणात आल्यावर गोम्स यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाने एल्विस गोम्स यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. मात्र, ‘आप’मध्ये घुस्मटमार सहन न झाल्याने गोम्स यांनी ‘आप’ सोडला व काँग्रेसची हात पकडला. आता गोम्स यांची म्हणे काँग्रेस पक्षातही घुस्मटमार व्हायला लागली आहे. आता त्यांच्या घुस्मटमारीला जबाबदार कोण? एल्विस की राजकीय पक्ष?

एल्विस गोम्स यांची घुस्मटमार!

दूषित वातावरणात माणसांना श्वास घेणे कठीण जाते. त्यामुळे माणसाला जीवघेणी घुस्मटमार सहन करावी लागते. आता राजकीय पक्षांत काही नेत्यांची म्हणे घुस्मटमार होत आहे. स्थानिक पक्षनेत्यांनी आपल्याला बाजूला केल्याची खंत एल्विस गोम्स यांनी बोलून दाखविली. खरे म्हणजे, सरकारी नोकरीत असताना घुस्मटमार होते म्हणून एल्विस गोम्स यांनी उच्चपदावरील नोकरीला रामराम ठोकून सेवानिवृत्ती पत्करली होती. राजकारणात आल्यावर गोम्स यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाने एल्विस गोम्स यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. मात्र, ‘आप’मध्ये घुस्मटमार सहन न झाल्याने गोम्स यांनी ‘आप’ सोडला व काँग्रेसची हात पकडला. आता गोम्स यांची म्हणे काँग्रेस पक्षातही घुस्मटमार व्हायला लागली आहे. आता त्यांच्या घुस्मटमारीला जबाबदार कोण? एल्विस की राजकीय पक्ष?

रक्षाबंधनाचा उत्सव!

निवडणुकीचे वर्ष असल्यावर राजकारण्यांना सण-उत्सवही ‘पॉलिटिकल इव्हेंट’ वाटू लागतात की काय, अशी चर्चा आहे. शुक्रवारी रक्षाबंधन होते. मग काय, काही ‘भावां’नी मानलेल्या बहिणींच्या घरी धाव घेतली, राख्या बांधून घेतल्या आणि भेटवस्तूही दिल्या. काहींनी बहिणींनाच घरी बोलावून रक्षाबंधन साजरे केले. एकंदरीत यंदा या उत्सवाला राजकीय रंग काहीसा अधिकच चढला! पूर्वी राखीचा धागा भाऊ-बहिणीचे नाते घट्ट करायचा. आता त्याला ‘मतांचा धागा’ही जोडला जातोय की काय, अशी कुजबुज आहे. भेटवस्तू घेतलेल्या बहिणींनी आणि राखी बांधलेल्या भावांनी हे नाते निवडणुकीपर्यंत टिकवले, तरच या रक्षाबंधनाचा ‘राजकीय फायदा’ झाला म्हणायचा! आता पाहायचे एवढेच... या ‘बहिणी’ आपल्या राजकीय ‘भावाला’ मतपेटीत खरोखर न्याय देतात का!

‘प्रेसिडेंट कलर’ अन्‌ चर्चा

गोवा पोलिसांची कर्तव्यनिष्ठा पाहून राष्ट्रपतींच्या ‘प्रेसिडेंट कलर’ सन्मानासाठी त्यांची निवड झाली. गोव्यासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब! पण त्याचवेळी शनिवारी पर्वरीत कॅसिनो संचालकांवर झालेला हल्ला आणि यापूर्वी उच्च न्यायालयाने गोवा पोलिसांचे काढलेले वाभाडेही जनतेच्या चांगलेच लक्षात आहेत. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था उत्तम राखली म्हणून गौरव होतोय, हे अभिनंदनीयच. मात्र, या गौरवाबरोबरच जनतेप्रती असलेली संवेदना आणि कार्यक्षमताही ‘प्रेसिडेंट कलर’च्या तोलामोलाची राहावी, अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही. कारण, राज्यात गेल्या काही घटनांमध्ये पोलिसांच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कुडचडे व सावर्डे मतदारसंघात नवे चेहरे?

‘जो जिता वही सिकंदर’ असे म्हटले जाते, ते खरे. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, तर जनाधाराची आणि धनाधाराची गरज असते. ज्याच्याकडे जनता आणि धन, त्याच्याकडे ‘व्हिनेबिलिटी’ असे समीकरण ठरलेले आहे. भाजपने म्हणे आगामी निवडणुकीत तीस जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. विद्यमान आमदारांपैकी बऱ्याच जणांचा पत्ता कट होण्याच्या संभाव्यतेवर भाजपच्या गोटात चर्चा आहे. जर राजकीय आरक्षण लागू झाले, तर कोणती उपाययोजना आखावी आणि राजकीय आरक्षण लागू झाले नाही, तर कोणता प्लॅन तयार करावा, याची तयारी म्हणे भाजपने केली आहे. सावर्डे व कुडचडे मतदारसंघात भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, अशी जोरदार चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. आता पाहूया, भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देतो की जुन्यावरच भरवसा ठेवतो.

Khari Kujbuj Political Satire
Goa Environment: पर्यावरण रक्षणासाठी गोमंतकीयांचा लढा; चिपकोपासून कारापूरपर्यंत भूमी, जंगल आणि निसर्ग वाचविण्याची संघर्षगाथा

विजयला दिलेला सल्ला

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांत युती होणार की नाही, हा प्रश्न सध्या लोंबकळत पडलेला असताना ही युती व्हावी, अशी इच्छा असलेले लोक बुचकळ्यात पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी सांगे मतदारसंघाचा दौरा केला त्यावेळी विजय सरदेसाई यांना याचा स्वतः प्रत्यय आला. यावेळी दोघांनी सरदेसाई यांना सरळ सांगितले, तुम्ही युती करून निवडणुकीला सामोरे गेलात तरच तुमची खैर आहे. अन्यथा भाजपच जिंकणार, हे तुम्ही लक्षात ठेवा! काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यातून काही बोध घेणार का?

कुत्र्यांची दगदग

रस्त्यावरून चालणाऱ्यांना किंवा रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षितता महत्त्वाची असते. अजूनही कुत्र्यांचा उपद्रव कमी झालेला नाही. काही श्वानप्रेमी अती प्रेमापोटी सकाळ-संध्याकाळी रस्त्याच्या बाजूला पेव्हरवर कुत्र्यांना अन्नदान करतात. त्यामुळे कुत्र्यांचा एक-एक कळप दिवसरात्र तिथेच ठाण मांडून बसलेला असतो. लहान मुले त्यांना घाबरून पळू लागली की ते हल्ला करून झडप घालतात. स्कूटरचालकांच्या अंगावर दोन-चार कुत्रे आल्यावर ते खाली पडतात. चार वर्षांआधी कुत्र्यांचे प्रमाण राज्याच्या लोकसंख्येच्या ९ टक्के इतके होते. हा विषय गंभीर आहे. कारण, रेबीज हा प्राणघातक आजार आहे. इंजेक्शने आहेत; पण ती उपचारांसाठी लागलीच, वेळेवर घेणे गरजेचे असते. गोवा हे कुत्र्यांपासून सुरक्षित राज्य होणे अत्यंत गरजेचे आहे.

बाणावलीतही होणार धुमशान?

काँग्रेस-आपमध्ये युती होणार असे सांगितले जात असले तरी ही युती खरेच होणार का? हा प्रश्न उद्भवण्याचे कारण म्हणजे बाणावलीचा तिढा. या मतदारसंघाबाबत काँग्रेस काय भूमिका घेणार, हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. सध्या बाणावलीत आपचा आमदार आहे आणि बाणावली मतदारसंघ ‘आप’ला सोडू नये, असा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोर धरला आहे. त्यामुळे वेळ्ळीपाठोपाठ आता युतीवरून बाणावलीतही धुमशान माजणार आहेच, असे वाटू लागले आहे.

महिलांना कदंब प्रवास फुकट

महिलांना मोफत कदंब प्रवास देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. अशा तऱ्हेची सोय कर्नाटक धरून सुमारे आठ राज्यांत अगोदरच चालू आहे. स्त्रीदाक्षिण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. गोव्यात वर्षाकाठी सरासरी ६० टक्के महिला कदंब बसमधून प्रवास करतात. या नव्या प्रस्तावाचे स्वागत महिला वर्गाकडून होत आहे. सरकारकडून औपचारिकता पूर्ण झाल्यावर या प्रस्तावाला मान्यता मिळाली, तर महिला सबलीकरणाच्या दिशेने राज्यातील ते महत्त्वाचे पाऊल ठरेल. प्रवासाचा खर्च कमी झाल्यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. बचत होईल. महिलांचा सार्वजनिक, सांस्कृतिक जीवनातील सहभाग वाढेल. बस प्रवासावर खर्च नसल्याने अधिक महिला नोकरीकडे वळतील, अशी आशा आहे

भेसळखोरांमध्ये धास्ती!

राजधानी पणजीत गेल्या आठवड्यात ‘एफडीए’ने हॉटेल्सवर धाड टाकली आणि व्यवस्थापनात सुधारणा होईपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले. बंद झालेल्या हॉटेल्सनी तर सुधारणा केल्याच; पण शेजारच्या हॉटेल्सनीही ‘एफडीए’ची धास्ती घेत आपापली व्यवस्था सुधारून घेतली म्हणे. आता सणासुदीचा काळ सुरू होताच मिठाईवरही ‘एफडीए’ची नजर वळली आहे. अस्वच्छतेचे कारण देत काही भागांत बुंदीचे लाडू नष्ट करण्याची वेळ आली. त्यामुळे भेसळखोर आणि निष्काळजी व्यावसायिकांमध्ये चांगलीच धास्ती पसरली. कारवाई अशीच सुरू राहिली, तर ‘एफडीए’च्या धाडीची चाहूल लागताच हॉटेल्सपासून मिठाईच्या दुकानांपर्यंत सगळेच चकाचक होतील, अशीच चर्चा आता सुरू आहे!

Khari Kujbuj Political Satire
Goa Special Railway: वालंकिणी यात्रेसाठी गोव्यातून विशेष रेल्वे रवाना; फातोर्डा, मडगाव, नावेली, कुडतरीतील भाविकांचा मोठा सहभाग

अनुवाद वाढण्याची गरज

अनुवाद ही सृजनशील प्रक्रिया असल्याने उत्तेजन देण्यासाठी साहित्य अकादमीने या प्रकारातही पुरस्कार देण्यास सुरवात केली. इंग्रजी सोडून इतर भाषांतील जागतिक साहित्य चाखण्यास अनुवादच कामी येतात. मुबलक अनुवादित साहित्य मराठीत येत असले, तरी मराठी साहित्य जगाच्या पटलावर हवे तितके का पोहोचत नाही, त्याच्यावर तज्ज्ञांमध्ये चर्चा होते अधेमधे. विंदा करंदीकरांनी आपल्या ज्ञानपीठ पुरस्कारातील रकमेचा मोठा भाग साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला देऊन मराठीतील उत्तम भाषांतरित ग्रंथासाठी पुरस्काराची तरतूद केली. त्यातून २००७ सालापासून दरवर्षी अनुवाद पुरस्कार दिला जातो. असे प्रयत्न होत राहायला हवे. कोकणीतही पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रजी भाषांतून अनुवादीत साहित्य झाले आहे; परंतु उत्कृष्ट कोकणी साहित्य इतर भाषांत अनुवादीत होणे, ही काळाची गरज आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com