

मडगाव: दारू पिऊन रोज आपल्या सावत्र बापाकडून आईला होत असलेली मारहाण सोसता न आल्याने त्याचा आईच्या सहाय्याने गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह राहत्या घरातील शौचालयाच्या खाली पुरून टाकल्याचा आणि नंतर त्या जागेवर टाइल्स लावून ती बुजविल्याचा आरोप असलेल्या पुरुषोत्तम दोरनहळ्ळी याच्याविरोधातील गुन्हा शेवटपर्यंत सिद्ध झाला नाही. त्यामुळे काल त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले.
मडगाव पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार ही खुनाची घटना २००८ मध्ये घडली होती. मात्र, या खुनाला तब्बल ११ वर्षांनी, म्हणजे मार्च २०१९ मध्ये वाचा फुटली. आके, मडगाव येथील कॉस्टा फॅक्टरीजवळ असलेल्या या घरातील खोली मोडून तिथे गोदाम उभारण्यासाठी खोदकाम सुरू असताना शौचालयाच्या जागेत कामगारांना हाडांचा सांगाडा आढळून आला. त्यामुळे या खुनाला वाचा फुटली.
मडगाव पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली असता, २००८ च्या सुमारास या घरात भाड्याने राहणारा भीमप्पा हा बांधकाम कामगार गायब झाला होता. त्याच्याबरोबर राहणारी इतर मंडळी घर सोडून विजापूर येथील आपल्या घरी गेल्याची बाब पुढे आली. त्यानंतर पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार, त्या घरात राहणाऱ्या भीमप्पासोबत रेणुका नावाची महिला आपला मुलगा (संशयित पुरुषोत्तम) आणि दोन मुलींसह राहू लागली होती.
भीमप्पाला दारूचे व्यसन होते आणि तो रेणुकाला मारहाण करत असे. भीमप्पाच्या रोजच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी एका रात्री तो दारूच्या नशेत असताना रेणुका व पुरुषोत्तम यांनी त्याचा गळा आवळून खून केला. ही गोष्ट कुणाला कळू नये, यासाठी घरातच त्याचा मृतदेह शौचालयाखाली पुरून त्यावर टाइल्स लावून ती जागा पूर्णपणे बुजविण्यात आली, असा आरोप होता.
त्यानंतर गोवा सोडून विजापूरला गेलेल्या रेणुकाने भीमप्पा गायब झाल्याची बतावणी केली. नंतर सगळेच ही गोष्ट विसरून गेले असताना, तब्बल ११ वर्षांनी त्या खोलीत खोदकाम सुरू केल्याने या खुनाला वाचा फुटली. दरम्यानच्या काळात रेणुका हिचे निधन झाले. त्यामुळे मडगाव पोलिसांनी पुरुषोत्तम याला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. हा खटला मडगाव सत्र न्यायालयात सुनावणीस आला असता, संशयिताचे वकील ॲड. सुहास वेळीप यांनी, जर हा खून २००८ मध्ये आके येथील त्या खोलीत करण्यात आला असेल, तर त्यावेळी त्या घरात उपस्थित असलेल्या रेणुकाच्या दोन मुलींवर गुन्हा का दाखल केला नाही किंवा त्यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात का पेश केले गेले नाही, असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नाचे अभियोग पक्षाला समर्पक उत्तर देता आले नाही.
साक्षीदार नसल्याने खुनाचा गुंता कायम
दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी हा मुद्दा उचलून धरताना, त्या दोन मुलींची साक्ष नोंदवण्यात न आल्याने हा कथित खून नेमका कुणी केला, हेच सिद्ध होऊ शकले नाही, असे नमूद केले. हा खून झालेली व्यक्ती नेमकी कोण, हा खून कशा प्रकारे करण्यात आला आणि तो करण्यामागचे कारण काय होते, यापैकी एकही बाब अभियोग पक्ष सिद्ध करू शकला नाही, असे नमूद करत न्या. प्रभुदेसाई यांनी संशयाचा फायदा देत संशयिताला निर्दोष ठरविले. ॲड. वेळीप यांना या सुनावणीत त्यांचे सहकारी ॲड. आकाश म्हार्दोळकर, ॲड. मेल्फा क्रुझ आणि ॲड. शॉन गोम्स यांचे सहकार्य लाभले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.