खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Khari Kujbuj Political Satire: सध्या ‘ए-आय’च्या माध्यमातून १९८०च्या काळातील फोटो तयार करण्याचा ट्रेंड आला आहे; परंतु यावरूनही राज्यात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

सध्या ‘ए-आय’च्या माध्यमातून १९८०च्या काळातील फोटो तयार करण्याचा ट्रेंड आला आहे; परंतु यावरूनही राज्यात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. भाजप आणि त्याच्यासोबत युतीत असलेल्या नेत्यांना ८०च्या दशकातील खलनायकांच्या भूमिकेत दाखविले आहे, तर भाजपने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना सिनेमा थिएटरच्या बाहेर तिकीट विक्री करतानाचा रिल टाकला आहे. या दोन्ही पक्षांमधील ‘ए-आय’चा वापर करत सुरू असलेले शीतयुद्ध येत्या काही दिवसात थंडावते की ऐन चतुर्थीत अधिकच भडकत शिमग्याचे स्वरूप घेते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. बाकी राजकारण करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नसल्याची चर्चा सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

म्हापशात बदलाचे वारे...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हापसा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी एक गुप्त बैठक पार पडली. एकूण ७० जणांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीत म्हापशात यंदा राजकीय बदल घडवून आणण्याचा आणि शहराचे नेतृत्व एखाद्या हिंदू चेहऱ्याकडेच सोपवण्याचा सूर उमटला. सध्या भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, हा कळीचा मुद्दा ठरला आहे. मयूर सावकार यांच्यानंतर आता गुरुप्रसाद पावसकर यांचे नावही चर्चेत आल्यामुळे पक्षांतर्गत चाचपणी वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट होते. विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांच्याऐवजी नव्या हिंदू चेहऱ्याला संधी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, हा राजकीय विरोध मोडून काढत जोशुआ पुन्हा बाजी मारतात की विरोधकांची मोहीम यशस्वी होते, हे पाहणे आगामी काळात रंजक ठरणार आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

गिरीशचा समर्थक दामूंच्या वाढदिवसाला!

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांमध्ये वातावरण तंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर फातोर्ड्यातून निवडणूक लढवणार, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर गिरीशचा फातोर्ड्यातील एक खंदा समर्थक, जो गिरीशबरोबर युवा काँग्रेसच्या काळापासून होता, तो सर्वांना गिरीशच यापुढील फातोर्ड्याचे आमदार, असे छातीठोकपणे सांगू लागला आहे. मात्र, गिरीशचा हा खंदा समर्थक काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या वाढदिनी दामूंच्या घरी दिसला. फातोर्ड्याचे राजकीय गणित खरेच बदलत आहे का?

उल्हासचा कॉन्फिडन्स

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर हे शांत स्वभावाचे. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नावेली मतदारसंघात इतिहास घडविताना भाजपचे कमळ फुलवण्याचा करिष्मा केला होता. तुयेकर यांचा हा विजय ‘फ्लूक’ होता, असे अजूनही म्हटले जात असले तरी ते स्वत: हे मान्य करीत नाहीत. पंच, सरपंच, झेडपी अशी पायरी चढत आपण आमदारपदी पोहोचलो, हे सांगण्यास ते विसरत नाहीत. ही बाब खरीही आहे, हे त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतात. भाजप सरकारच्या अनेक योजना आपण या मतदारसंघात राबविल्या आहेत. लोकसेवा व कार्यकर्त्यांची फळी या बळावर आपण पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नावेली मतदारसंघातून उभा राहणार असल्याचे त्यांनी एका खासगी चॅनलवर बोलताना स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मागच्या खेपेसारखीच उमेदवारांची भाऊगर्दी झाली तर पुन्हा एकदा तुयेकर यांचे भाग्य फळफळू शकते, अशी चर्चा नावेलीत एव्हाना सुरूही झाली आहे. उल्हासबाब सध्या पूर्ण कॉन्फिडन्ट आहेत, हेही तेवढेच खरे आहे.

आता प्रतिमांचे काय?

नावेली मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळणार, असे सांगत माजी जिल्हा पंचायत सदस्य सिप्रू कार्दोज यांनी दावा केला असून त्यांनी आपल्या प्रचारालाही सुरवात केली आहे. ‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘साष्टीकार’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षनेत्यांनी आपल्याला उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. अशा परिस्थितीत आता या मतदारसंघात काँग्रेस उमेदवारीवर दावा करणाऱ्या प्रतिमा कुतिन्हो यांचे आता काय होणार? की त्यांच्या नशिबी शेवटी ‘लाईट आमगेली डिस्को नाचोता’ हेच म्हणणे येईल?

महामंडळाला नारळ पावला!

राज्यात दरवर्षी गणेश चतुर्थीच्या काळात नारळाला मोठी मागणी असते. या काळात मागील काही वर्षांपासून नारळाचे दर वाढवले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी ‘गोवा स्टेट हॉर्टिकल्चरल कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (जीएसएचसीएल) आपल्या केंद्रांवर नारळ उपलब्ध केले आहेत. प्रतिनग ३८ रुपयांना हा नारळ ग्राहकांना बुधवारपासून मिळायला सुरवात झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आदल्या दिवशी (मंगळवारी) महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ५५ हजार नारळाची खरेदी केल्याचे सांगितले होते; परंतु दुसऱ्याच दिवशी (बुधवारी) महामंडळाचे अध्यक्ष ७० हजार नारळ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगतात. त्यामुळे महामंडळाच्या नारळ विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळत असून, महामंडाळाला काही दिवसांत लाखो रुपये त्यातून मिळणार हे स्पष्ट दिसते. त्यामुळे महामंडळाला नारळ पावला असेच म्हणता येईल.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

राजीनाम्यामागचे गणित

दिवंगत रवी नाईक यांचे कनिष्ठ पुत्र रॉय नाईक यांचा प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेवकपदाचा गुरुवारी दिलेला राजीनामा हा फोंडा शहरात चर्चेचा विषय ठरत असून वेगवेगळे प्रवाद उठताना दिसत आहेत. रॉय भाजप सोडणार असून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारीवर रिंगणात उतरणार आहेत, इथपासून हा नगराध्यक्ष होण्याकरता भाजपश्रेष्ठींवर आणलेला दबाव आहे, इथपर्यंत अनेक प्रवाद ऐकायला येत आहेत. मागे काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रॉयनी आपण २०२७ सालच्या निवडणुकीत निश्चितपणे रिंगणात असणार, असे जे सांगितले होते त्याची आठवणही अनेकजण काढताना दिसत आहेत. काही का असेना; पण राजीनाम्यामुळे रॉय ‘टॉक ऑफ द टाऊन’ ठरले असून पडद्यामागे बरेच काही शिजत असल्याचा वास अनेकांना यायला लागला आहे. एवढे मात्र निश्चित.

शिक्षकांची अस्वस्थता

उच्च माध्यमिक विद्यालयांत तासिका तत्त्वावर वर्षानुवर्षे शिकवत असलेल्या शिक्षकांना आता आपले भविष्य अंधकारमय वाटू लागले आहे. गोवा लोकसेवा आयोग शिक्षकांच्या जागा भरण्याच्या तयारीत आहे, तर उर्वरित जागा बढतीने भरण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थी आंदोलनामुळे तासिका तत्त्वावरील शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात आलेली नसली तरी पुढील शैक्षणिक वर्षात कामावर बोलविले जाईल का, याची शाश्वती त्या शिक्षकांना राहिलेली नाही. नाही म्हणायला त्यांनी गुरुवारी शिक्षण संचालकांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. हे करताना डबल इंजिन सरकार आहे, याचीही आठवण त्यांनी करून दिली आहे. या शिक्षकांसोबत आमदार वीरेश बोरकर हेही शिक्षण संचालकांची भेट घेण्यासाठी गेल्याने आता त्यांचा प्रश्न सरकार कसे हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष नक्कीच लागले असणार!

आम्हाला फायदा का नाही?

निवडणुकीच्या वर्षी सत्ताधाऱ्यांकडे जे मागतात ते मिळते एवढेच नाही, तर न मागताही सत्ताधारी आम जनतेला देण्यास राजी होतात. राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना व शिक्षकांना कायम करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यांनी दहा वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम केले आहे त्यांना कायम करणार, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन दिले होते. मात्र, सरकारचा हा निर्णय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीवर शिकविणाऱ्या शिक्षकांना लागू होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. जर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर कंत्राटी शिक्षक म्हणून गेली दहा वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना सेवेत कायम केले जाणार, तर हा कायदा महाविद्यालयीन शिक्षकांना का लागू होत नाही, असा प्रश्न महाविद्यालयीन कंत्राटी शिक्षक विचारीत आहेत.

आव्हानासमोर दबले सारे

सरकारने गोवा उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीचा हट्ट धरला. तीन दिवसांत लाख अर्जांची छाननी करणे नागरी पुरवठा खात्याला केवळ अशक्य झाले. मात्र, गुरुवारी या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायचाच होता. त्यामुळे प्रयत्नांची शिकस्त करण्यात आली. सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशा वातावरणाला चटावलेल्यांचे हात भराभर चालू लागले आणि अखेर १५ हजार जणांच्या अर्जांची माहिती परिपूर्ण करण्यात आली. तेवढ्याच जणांच्या खात्यावर प्रत्येकी ३ हजार रुपये जमा झाले. बाकीच्यांचे चतुर्थीनंतर पाहू, असा सुस्कारा या योजनेच्या अंमलबजावणीचे टेन्शन आलेल्यांनी गुरुवारी सोडला.

Khari Kujbuj Political Satire
Mumbai-Goa Highway: 16 ते 17 वर्षांची रखडपट्टी अन् आता गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, 'मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्धाटनाला येणार नाही, मला लाज वाटते' VIDEO

याला काय म्हणावे?

शिक्षणात राजकारण आणले की, शिक्षणाचा बट्याबोळ होणे स्वाभाविक. या दिवसांत सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी तासिका पद्धतीवर असलेल्या शिक्षकांना कामावरून कमी करू नये म्हणून आंदोलन करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात राजकारण्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्णवेळ शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप होत होता. आता अनुभवी पूर्णवेळ शिक्षक नेमल्यावर अनुभवी पूर्णवेळ शिक्षक नकोत, तासिका शिक्षकच हवेत म्हणून आंदोलन होत आहे. आता याला काय म्हणावे?

‘एफडीए’कडून अपेक्षा

चतुर्थी जवळ आली की गणरायांसोबत ‘एफडीए’ विभागालाही जाग येते. मग सुरू होतात आस्थापनांवर छापे, तपासण्या, नमुने आणि कारवाई. कारवाई झालीच पाहिजे, त्यात दुमत नाही; पण ती फक्त सणाच्या आधीच दिसायला नको, अशी जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात सध्या अन्नभेसळीचे जे प्रकार समोर येत आहेत, ते पाहता त्याची ‘मिसळ’ गोव्यात येऊ नये एवढीच भीती! शेवटी भेसळ कुठल्याही पदार्थात असो, त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. त्यामुळे यंदा ‘एफडीए’ने चतुर्थीच्या आधी पेडण्यापासून काणकोणपर्यंत अशी धडाकेबाज कारवाई करावी की, भेसळ करणाऱ्यांनी प्रसाद सोडा, साधे पाणीही तपासून प्यावे!

आता बदल हवा!

अहो, पोलिसांच्या अचानक बदल्या झाल्या आणि लगेच विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. आता या बदल्यांमागचे नेमके कारण काय, याची चर्चा रंगणे साहजिकच आहे. काहींचे म्हणणे आहे की, ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांची ‘कामगिरी’ पाहून त्यांना हलविले, तर काहीजण म्हणतात की, विरोधकांच्या दुव्यामुळेच हा बदल्यांचा खेळ झाला! आता खरे काय आणि खोटे काय, हे सरकार आणि पोलिसच जाणोत; पण या सगळ्या बदल्यांमुळे एक चांगली गोष्ट तरी होऊ द्या- कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांची पुन्हा चर्चा व्हावी आणि ‘पोलिस आहेत बरं का!’ असा विश्वास जनतेमध्ये निर्माण व्हावा. शेवटी बदल्या झाल्या आहेत, आता बदल दिसतोय का, हेच पाहायचे!

‘मगो’चा बालेकिल्ला

राज्यातील अन्य कोणत्याही मतदारसंघांपेक्षा मडकई मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने ‘मगो’ पक्षाचा बालेकिल्ला आहे. गेली तीन दशके मडकईवर ‘मगो’चे अधिराज्य आहे, त्यामुळे इतर कोणत्याही राजकीय पक्षाने मडकईवर दावा केला तरी त्यांची डाळ शिजणार नाही, अशी भक्कम तटबंदी मडकईच्या किल्ल्याला ‘मगो’वाल्यांनी करून ठेवली आहे. मुळात मतदार खूश तर नेते खूश असे म्हटले जाते आणि ‘मगो’च्या नेत्यांकडून मतदारांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने सध्या तरी ‘मगो’वाल्यांना कोणताही धोका नाही, अशी चर्चा आहे. आता तसे थोडेफार विरोधक आहेत; पण ‘मगो’चा किल्ला भक्कम असल्याचे बालले जात आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: कुत्र्यांच्या भुंकण्याने चोरट्यांचा डाव फसला! सीसीटीव्ही अलर्टनंतर घरातील सदस्य जागे; पळणाऱ्या दोघांना स्थानिक तरुणांनी पकडले

बुयांवबाब जरा सबुरीने!

गोमंतकीय कलाकार सिद्धनाथ बुयांव यांचे काँग्रेस पक्षाकडे व्यावसायिक नाते असल्याचे तेच काँग्रेसवाल्यांना सांगतात. त्यांचेही खरे आहे म्हणा. मागे पुदुचेरी-तमिळनाडूत विधानसभा निवडणुकांवेळी बुयांवबाबांना सोशल मीडियाचे कोटींचे कंत्राट मिळाल्याची खरी कुजबुज बरीच गाजली होती. आता गोवा विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजले आणि बुयांवबाबांनी म्हणे सोशल मीडियाचे कंत्राट मिळवण्याचे मनसुबे रचले. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव मांडून ते दिल्लीत हायकमांडला साकडे घालून आल्याची चर्चा सुरू झाली; परंतु या कामाविषयीचा आदेश मिळेना आणि प्रभारी माणिकराव फोन उचलेनात, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मागच्या सोमवारी पणजीच्या एका आलिशान रॅस्टॉरंटमध्ये व मिरामारच्या एका हॉटेलाच्या लॉबीत बुयांवबाबांचे पित्त खवळले. आता एकंदर प्रकार भाजपवाल्यांच्या कानावर कुणीतरी घातला आहे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मागून घेतले आहे. आता पाहूया, एकंदर प्रकरण कधी व्हायरल होते ते...

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com