

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाकडून काँग्रेस पक्षाकडे सुरू असलेली युतीची बोलणी एका बाजूने स्थगित केलेली असताना, मंगळवारी काँग्रेस खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी विजय सरदेसाई यांची भेट घेतल्याने पुन्हा युतीच्या बोलणीला चालना मिळाली, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘मी कॅप्टन विरियातो यांच्याशी चर्चा केली आहे खरी; पण विरियातो यांना काँग्रेस पक्षात किती विश्वासात घेतले जाते, याबद्दल आपल्याला शंका आहे,’
अशी प्रतिक्रिया विजय सरदेसाई यांनी बुधवारी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली. सरदेसाई म्हणाले, ‘सर्व विरोधी पक्षांना घेऊन काँग्रेस पक्षाला खरेच पुढे जायचे आहे की त्यांना तसा दिखावा करायचा आहे, याबद्दल मला शंका आहे. मी कालच्या चर्चेत कॅप्टन विरियातो यांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरे आम्हाला अजून मिळालेली नाहीत. आम्ही या उत्तरांची वाट पाहत आहोत.’
‘गोमन्तक’ टीव्हीच्या ‘साष्टीकार’ या कार्यक्रमात सरदेसाई यांनी विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली. ‘गोमन्तक’चे ब्युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली. दरम्यान, विजय सरदेसाई, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी एकत्र येऊन ‘गोवा फर्स्ट’ म्हणून जी संकल्पना पुढे आणली आहे, ती भविष्यात पर्याय देणारी राजकीय आघाडी म्हणून पुढे येऊ शकते, याचे संकेत विजय सरदेसाई यांनी दिले.
ते म्हणाले, ‘गोवेकर सध्याच्या भाजप सरकारला विटले आहेत. त्यांना पर्याय पाहिजे. काँग्रेस हा पर्याय देऊ शकत नाही, असे त्यांची कार्यपद्धती पाहिल्यास वाटते. त्यामुळे लोकांना पर्याय पाहिजे. हा पर्याय देण्यासाठी आता आम्ही एकत्र आलो, तर त्यात चूक काय? त्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचे मी काम सुरू केले आहे. २०२७च्या निवडणुकीत आमचा ‘गोवा फर्स्ट’ हा सक्षम पर्याय निश्चितच असू शकतो.’
सरदेसाई यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सांगितले की, काँग्रेसचे आमदार दोनवेळा फुटले. त्यामुळे या पक्षावरील गोवेकरांचा विश्वास उडालेला आहे. मागील साडेचार वर्षांत गोवेकरांचा विश्वास पुन्हा कमावण्याची संधी काँग्रेसकडे होती; पण त्यांनी त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आता लोकांना काँग्रेस तिसऱ्यांदा का फुटणार नाही, हा प्रश्न पडला आहे आणि काँग्रेसकडे त्याचे समाधानकारक उत्तर नाही. अशा परिस्थितीत लोकांना सक्षम पर्याय देणे ही आमची जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी केला.
गोवा फॉरवर्डने जो व्यापक स्वरूपाचा सर्व्हे केला आहे, त्यातही गोव्यातील जनतेचा काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे, हे स्पष्ट झालेले आहे, असे सरदेसाई म्हणाले. त्यामुळे लोकांना पर्याय देणे ही एक ज्येष्ठ आमदार या नात्याने माझ्यावर जबाबदारी येते. यासाठीच आम्ही प्रत्येक मतदारसंघात जात आहोत. काँग्रेसला बरोबर न घेताही निवडणूक जिंकता येणे शक्य आहे. लोकांसमोर जर चांगले पर्यायी उमेदवार उभे केले, तर लोक त्यांना निवडून देतात, हे आजवर अनेक उदाहरणांनी स्पष्ट झालेले आहे.
यासाठी काँग्रेसच्या काही मतदारांचे मन वळविण्याची गरज आहे. गोव्यात विधानसभा निवडणूक होण्यासाठी अजून चार ते पाच महिने बाकी आहेत. या कालावधीत ते सहज करता येणे शक्य आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसबरोबर गोवा फॉरवर्डची युती होणार नाही ना, असे विचारले असता ते म्हणाले, ‘आम्ही काँग्रेसला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याची उत्तरे कशी येतात, यावर पुढील निर्णय घेता येईल. पण सध्या तरी आमची युतीची बोलणी स्थगित आहेत. जर त्यात काही बदल झाला, तर आम्ही त्याची कल्पना लोकांना देऊ.’
गोवा फॉरवर्डबरोबर युती होण्यासाठीच बोलणी : शेख
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी खासदार विरियातो फर्नांडिस यांच्याबरोबर मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख हे गेले होते. या भेटीबद्दल शेख यांना विचारले असता ते म्हणाले, ‘भाजपला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळेच विजय सरदेसाई यांच्याकडे चर्चा करावी, असे आमचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले होते. त्यासाठी आम्ही गेलो होतो. गोवा फॉरवर्डला काँग्रेसबरोबर युती करायची आहे की त्यांना स्वतःला काँग्रेसमध्ये विलीन करून घ्यायचे आहे, हे आम्ही विजय सरदेसाई यांना या भेटीत विचारले,’ असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री व्हायचे असते तर त्रास का काढले असते?
विजय सरदेसाईंना मुख्यमंत्री व्हायचे आहे, म्हणून ते काँग्रेसबरोबर येऊ पाहत नाहीत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या व्यक्त केल्या आहेत. यावर विजय सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री व्हायचे असते, तर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे हे त्रास मी का घेतले असते? सरळ सत्ताधारी पक्षाबरोबर जाऊन मला काय साध्य करायचे, ते मी सहज साध्य करू शकलो असतो. भाजपला हरविण्यासाठी सक्षम पर्याय तयार करणे ही काळाची गरज आहे. तो मी देऊ पाहत आहे. त्यात माझा कुठलाही इगो लपलेला नाही. मला इगो असता, तर मी गिरीश चोडणकर यांच्या घरी स्वतः जाऊन चर्चा केली नसती. सध्या काँग्रेस कुठल्या मोडमध्ये आहे, हे कुणालाच कळत नाही. त्यांना भाजपला हरवायचे आहे की नाही, हेही कळत नाही.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.