खरी कुजबुज: राजकीय महाभारत

Khari Kujbuj Political Satire: पर्यटनाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कळंगुटच्या राजकीय आखाड्यात विद्यमान आमदारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरवात केली आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainiki Gomantak
Published on: 
Updated on: 

राजकीय महाभारत

पर्यटनाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कळंगुटच्या राजकीय आखाड्यात विद्यमान आमदारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरवात केली आहे. मायकल लोबो यांचा पराभव करण्याचे आवाहन काँग्रेसचे इच्छुक उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते सुदेश मयेकर करत असले, तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. एकाच मतदारसंघात काँग्रेसचे चार-चार इच्छुक आपापला बाण चालवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. कथित बेकायदा डान्स बार, पर्यटकांची लूट आणि पाण्याच्या प्रश्नावरून लोबोंना घेरण्याची रणनीती आखली जात असली तरी प्रत्यक्षात विरोधकांमधील जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा कसा सुटणार, हा खरा सवाल आहे. लोबोंच्या ‘वन मॅन शो’ला मात देण्यासाठी एकीची भाषा बोलली जात असली, तरी ऐनवेळी तिकीट न मिळाल्यास हेच इच्छुक नेते पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार की बंडखोरीची नवी ठिणगी पडणार, यावरच कळंगुटमध्ये पुढचे राजकीय महाभारत घडणार आहे. पाहुया आता काय होते ते!

तुरूंगातही ‘शिस्ती’चा फज्जा!

सुधारण्यासाठी तुरुंगात पाठवलेल्यांनीच आत आपापसांत हाणामारी सुरू केली तर बाहेरच्या जगाला काय संदेश मिळणार? कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या मारामारीत एका कैद्याला उपचारांसाठी म्हापशाच्या जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले. बाहेर गुन्हे करून आत आलेल्यांना आता तुरुंगातही आपले वर्चस्व सिद्ध करण्याची हौस सुटली आहे की काय, असा प्रश्न पडतो. कैद्यांना सुधारण्याचे केंद्र असलेल्या कारागृहातच जर हाणामारीचे धडे गिरवले जात असतील, तर सुधारणा नेमकी कोणाची आणि सुरक्षा नेमकी कशासाठी, हा प्रश्न अनुत्तरितच आहे!

Khari Kujbuj Political Satire
Goa Assembly Session 2026: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन केवळ एक दिवसाचे; 16 डिसेंबरची तारीख निश्चित, विरोधकांचा कालावधी वाढवण्याचा आग्रह

धीरयो सुसाट, पोलिस सुशेगाद...

मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळावली-नावेली हे गाव सध्या धीरयोचे माहेरघर बनले आहे. येथे राजरोसपणे रेड्या-पाड्यांची झुंज लावली जाते. मात्र, पोलिसांना त्याची म्हणे खबरबातच असत नाही. पोलिस सुशेगाद असतात, कारवाई करण्याच्या फंदात कोण पडेल? याला कारण धीरयोंचा हफ्ता, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, दिवाळीपूर्वीच हफ्त्याचे दरही वाढवले आहेत. आता प्रत्येक झुंजीमागे ३० हजार रुपये हफ्ता असल्याची वदंता आहे. साहेबांचे खास मर्जीतील सहकारी हे इमानेइतबारे कलेक्शनचे काम करतात म्हणे. खरे-खोटे देवच जाणे!

बेंजामिन सिल्वा वेळ्ळीत सक्रिय...

वेळ्ळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. २०१२ साली अपक्ष उमेदवार म्हणून ते वेळ्ळीतून जिंकून येऊन आमदार बनले होते. त्यानंतर त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. वेळ्ळी हा ख्रिस्तीबहुल मतदारसंघ. येथील मतदारांना सिल्वा यांची भाजपशी सोयरिक पसंद पडली नाही व नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला होता. आता त्यांना पुन्हा एकदा आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. हल्लीच कॉंग्रेस पक्षाच्या गोंय राखण यात्रेत ते सहभागी झाले होते. कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर त्यांचा डोळा असला तरी तिकीट मिळेलच याची खात्री नाही. कारण सावियो डिसिल्वा हे आधीपासूनच स्पर्धेमध्ये आहेत. त्यातच केपे मतदारसंघ एसटीसाठी राखीव झाला तर आमदार एल्टन डिकॉस्ता हे वेळ्ळीत कॉंग्रेसचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे उमेदवारीसाठी बेंजामिनबाबाच्या पुढे अनेक अडचणी आहेत. पुढे काय घडणार हे आता सांगता येत नाही. तूर्त ‘वेट अ‍ॅण्ड वॉच.’

सिनेमा वाहतूक कोंडीचा

इफ्फीचा उत्साह सुरू होण्याआधीच पणजीच्या रस्त्यांवर गर्दीचा ट्रेलर पाहायला मिळू लागला आहे. देशी-विदेशी पाहुणे हॉटेलमध्ये दाखल होत आहेत आणि वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. आता दरवर्षीप्रमाणे यंदाही पणजीकरांना वाहतूक कोंडीचा चित्रपट पाहावा लागणार, की वाहतूक पोलिस काही नवा प्रयोग दाखवणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने वाहतूक व्यवस्थेबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अजूनही रखडल्याची चर्चा आहे. मग न्यायालयाचे आदेश कागदावरच राहणार की इफ्फीच्या निमित्ताने तरी रस्त्यावर दिसणार? नाही तर चित्रपट पाहायला आलेल्या पाहुण्यांना इफ्फीपेक्षा पणजीतील ट्रॅफिकच जास्त लक्षात राहील!

संकल्प यांची उत्तरे

मुरगावचे आमदार आणि आता मंत्री झालेले संकल्प आमोणकर हे सत्ताधारी गटात असतानाही विधानसभेत आक्रमकपणे लोकांचे प्रश्‍‍न मांडायचे. मुख्यमंत्रीही आवर्जून संकल्प यांनी शून्य तासाला मांडलेल्या विषयांना मुद्देसूद उत्तरे द्यायचे, बैठक बोलावतो असे सांगायचे. आमदाराच्या भूमिकेतून संकल्प आता मंत्र्यांच्या भूमिकेत आले आहेत. त्यांना विरोधक कोणते प्रश्‍‍न विचारतील आणि आक्रमक बाजाचे संकल्प त्याला उत्तरे कशी देतील, याविषयी उत्सुकता निश्चितपणे आहे. अर्थात त्यासाठी १६ डिसेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा लोकाभिमुख कारभार

पेडणेपासून काणकोणपर्यंतचे लोक अडीअडचणी मांडण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जनता दरबारात साखळी येथे गर्दी करतात. त्यांच्या मागण्या, समस्यांचे मुख्यमंत्री निराकरणही करतात. परंतु आज मंत्रालयाच्या आवारात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. एका ज्येष्ठ नागरिकाने अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करत मदतीची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भावनांचा आदर करत तात्काळ मदतीचे आश्वासन दिले. कोणत्याही मोठ्या प्रशासकीय कामासोबतच सर्वसामान्यांच्या छोट्या आणि भावनिक अपेक्षांनाही तितकाच आपुलकीचा प्रतिसाद देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत, अशी चर्चा मंत्रालय परिसरात रंगली होती.

Khari Kujbuj Political Satire
Human Trafficking In Goa: मुलाच्या वाढदिवसासाठी घेतले कर्ज, फेडण्यासाठी गोव्यात गेली; महिला मानवी तस्करांच्या जाळ्यात

विधानसभेतील बैठक व्यवस्था

आरजी पक्षाने आमदार वीरेश बोरकर यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे विधिमंडळ सचिव आणि सभापतींना कळविले आहे. त्या पार्श्वभूमीवर १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वीरेश यांची बैठक व्यवस्था बदलण्यात येणार का, हा प्रश्‍‍न चर्चेला आला आहे. तसे झाले तर खोलकर गट हाच मूळ आरजी पक्ष असे विधिमंडळ मानते, असा अर्थ काढला जाऊ शकतो. तसे न केल्यास खोलकर नव्हे, तर बोरकर गट हा अधिकृत असे विधिमंडळ मानते असे मानण्यास जागा निर्माण होऊ शकते. विधानसभा अधिवेशनावेळी वीरेश यांचे आसन पूर्वीप्रमाणेच असल्यास विधानसभा निवडणुकीपर्यंत सभापती कोणताही निर्णय घेणार नाहीत, असा अर्थ काढण्यास सगळेच मोकळे असतील.

प्रचार करावा तरी कधी?

हरवळे येथील श्री देव रूद्रेश्वर संस्थानची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. भंडारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या देवस्थानच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महाजनांच्या यादीत काहींची नावे चुकीची आहेत, तर काही नावेच गायब आहेत. रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांचेच नाव गायब झाल्‍याची चर्चा सध्‍या समाज माध्‍यमांवर सुरू आहे. शिवाय २० रोजी उमेदवारी अर्ज सादर करणे, २१ रोजी अर्जांची छाननी व उमेदवारी माघार, त्याचदिवशी उमेदवारी चिन्हांचे वाटप आहे. त्यामुळे २२ रोजीच्या मतदानासाठी एका रात्रीत प्रचार कसा करायचा, याची चिंता अनेक इच्छुक उमेदवारांना लागून राहिली आहे. त्यामुळे सर्वांसाठी निवडणुकीला स्थगिती, हाच सर्वमान्य तोडगा सध्या दिसत आहे.

पक्षांतर आणि नवा वाद

वाद हा जणू काँग्रेस पक्षाच्या पाचवीलाच पूजला आहे. काहीच कारण नसताना नसते वाद अंगावर ओढवून घेणे, ही जणू काँग्रेस नेत्यांची सवयच बनली आहे. आता हेच पहा ना, काँग्रेसचे ज्येष्ठ पुढारी फ्रान्सिस सार्दिन यांनी काँग्रेस पक्षाने फुटिरांचेही स्वागत करावे, असे वक्तव्य केले आणि नसता वाद ओढवून घेतला. खरे तर सार्दिन यांची ‘स्ट्रेट फॉरवर्ड लीडर’ म्हणून ओळख असूनही कधी कधी ते याच आपल्या इमेजचे शिकार होतात. आताही तसेच झाले आहे. याला काय म्हणावे?

कोलवाळ तुरुंगावर पुस्तक?

कोलवाळचा मध्यवर्ती तुरुंग अलीकडे वाईट कारणांसाठीच चर्चेत असतो. कधी तुरुंगात अमली पदार्थ सापडतात, तर कधी कैद्यांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे होतात. कोठडीत मोबाईल सापडणे, ही बाब नवीन राहिलेली नाही. अमली पदार्थांची तुरुंगात विक्री करताना सुरक्षा रक्षकालाच याआधी पकडण्यात आले आहे. कैद्यांची मारामारी ही नित्याचीच झाली आहे. आता तुरुंगातील हे कारनामे काही वर्षांनी पुस्तक रूपाने वाचावयास मिळण्याची शक्यता आहे. पत्रकार तरुण तेजपाल सध्या कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात आहे. तो बाहेर आल्यावर तुरुंगातील अनुभवावर लिहिताना कोलवाळ तुरुंगातील कथा सांगेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी.

फोंड्यात ‘इलेक्शन फिव्हर’

फोंडा मतदारसंघ काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्यापासून वैद्यकीय शिबिरे काय, स्पर्धा काय, चतुर्थीला आणि दिवाळीला भेटी काय, देवदर्शन काय...बरेच काही जोमाने सुरू आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी राजकीय नेत्यांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. आता कुणाचे हे प्रयत्न फळास येतात, ते पाहणे रंजक ठरणार आहे.

विरोधकांचे कौशल्य

डिसेंबरमध्ये गोवा विधानसभेचे अधिवेशन अवघ्या एका दिवसासाठी होणार असल्याने विरोधकांची चांगलीच कसोटी लागणार आहे. विरोधकांच्या हातात विषयांची कमी नाही; पण त्यात सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यातील ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था! या विषयावर चर्चा करायला एक दिवस तर सोडाच, कदाचित एक आठवडाही कमी पडेल. आता एका दिवसात विरोधक किती प्रश्न विचारणार, सरकारला किती घाम फोडणार आणि सरकारकडून किती ठोस आश्वासने मिळवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण सभागृहात प्रश्न विचारणे सोपे; पण त्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यावर कृती करून घेणे हेच खरे विरोधकांचे कौशल्य! आता एका दिवसाच्या अधिवेशनात लोकांना न्याय मिळतो की फक्त आश्वासनांची पेरणी होते, हेच पाहायचे!

Khari Kujbuj Political Satire
Goa Fire Services Sports Festival: अग्निशमन जवान मैदानात उतरणार! पणजीत 14 व्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन; चार दिवस विविध स्पर्धांचा थरार

राजकीय महाभारत

पर्यटनाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कळंगुटच्या राजकीय आखाड्यात विद्यमान आमदारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरवात केली आहे. मायकल लोबो यांचा पराभव करण्याचे आवाहन काँग्रेसचे इच्छुक उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते सुदेश मयेकर करत असले, तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. एकाच मतदारसंघात काँग्रेसचे चार-चार इच्छुक आपापला बाण चालवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. कथित बेकायदा डान्स बार, पर्यटकांची लूट आणि पाण्याच्या प्रश्नावरून लोबोंना घेरण्याची रणनीती आखली जात असली तरी प्रत्यक्षात विरोधकांमधील जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा कसा सुटणार, हा खरा सवाल आहे. लोबोंच्या ‘वन मॅन शो’ला मात देण्यासाठी एकीची भाषा बोलली जात असली, तरी ऐनवेळी तिकीट न मिळाल्यास हेच इच्छुक नेते पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार की बंडखोरीची नवी ठिणगी पडणार, यावरच कळंगुटमध्ये पुढचे राजकीय महाभारत घडणार आहे. पाहुया आता काय होते ते!

राजकीय डावपेचांचे नवे खेळाडू?

प्रस्‍थापित राजकारणात मतांसाठी घोडेबाजार, पंचतारांकित मुक्काम आणि महागड्या सहलींच्या चर्चा नवीन नाहीत. पण आता गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीतही हेच रंग दिसू लागल्याची चर्चा आहे. ‘एनएसयूआय’कडून ‘अभाविप’च्‍या मतदारांना फोडण्‍यासाठी प्रत्येकी ४० हजार रुपयांची ऑफर दिल्याची वदंता आहे, तर ‘अभाविप’च्या एका नेत्याच्या राजस्थान सहलीचा खर्च उचलल्याचीही आवई आहे. दुसरीकडे, आपल्या मतदारांचा विरोधी गटाशी संपर्क येऊ नये म्हणून त्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय केल्याचे बोलले जाते. या चर्चांना अधिकृत दुजोरा नाही; पण विद्यार्थी निवडणुकीत विचारांची लढाई बाजूला पडून पैशांचे आणि पाहुणचाराचे राजकारण शिरले असेल तर प्रश्‍‍न पडतो- विद्यार्थी नेते घडताहेत की राजकीय डावपेचांचे नवे खेळाडू?

सांताक्रूझमध्ये आग्‍नेलची वर्णी?

तिसवाडीतील पणजी, ताळगाव आणि सांताक्रूझ या तिन्‍ही मतदारसंघांवर मजबूत पकड असलेले नेते म्‍हणून मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांची ख्‍याती आहे. येत्‍या विधानसभा निवडणुकीत पणजीतून स्‍वत:ला, ताळगावातून पुत्र रोहित मोन्‍सेरात यांना आणि सांताक्रूझमधून आपले ‘ओएसडी’ आग्‍नेल डिकुन्‍हा यांना भाजपची उमेदवारी मिळवण्‍याचा प्रयत्‍न बाबूश यांच्‍याकडून सुरू आहे. सांताक्रूझमध्‍ये आग्‍नेल यांनी काही महिन्‍यांपूर्वीच काम सुरू केले आहे. परंतु, तेथून निवडणूक लढवण्‍याबाबत त्‍यांनी कोणतेही भाष्‍य केले नव्‍हते. अखेर बुधवारी ‘मी सांताक्रूझमधून लढणार’, असे त्‍यांनी सांगितले. पण कोणत्‍या पक्षाच्‍या उमेदवारीवर, हे गुपित मात्र त्‍यांनी ठेवले. शेवटी सत्तेत येण्‍यासाठी भाजप प्रत्‍येक मतदारसंघात जिंकण्‍याची पात्रता असलेल्‍या उमेदवाराचा शोध घेत आहे. त्‍यात आग्‍नेल यांच्‍यामागे बाबूश उभे असल्‍याने त्‍यांची सांताक्रूझची उमेदवारी निश्‍चित असल्‍याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.