

बंटींची गोव्यात ‘एन्ट्री’
गोव्याला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’ डेअरीच्या निवडणुकीत भाजपला पाणी पाजलेल्या काँग्रेस खासदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात ‘एन्ट्री’ झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेसने गोव्यासाठीच्या छाननी समितीत सतेज पाटील यांचा समावेश केल्याने प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांमध्येही उत्साह पसरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपकडे मंत्री, आमदार, खासदार असा सुमारे १२ जणांचा ताफा असतानाही ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पाटील यांनी केवळ ‘शक्कल’ वापरून भाजपला झुकवले, तसाच चमत्कार ते गोव्यात करून दाखवतील का? याकडे सर्वांचेच लक्ष असेल... ∙∙∙
युरी आलेमाव खूष झाले!
जनतेच्या आधारावर व पाठिंब्यावर राजकारण्याचे भवितव्य अवलंबून असते. विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्या वाढदिनी कार्यकर्त्यांची व समर्थकांची गर्दी पाहून युरी खूष झाले असणार. सुमारे आठ हजार लोकांचा जनसमुदाय युरींना वाढदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुंकळ्ळीत एकत्रित झाला होता. केवळ स्थानिक कार्यकर्तेच नव्हे, तर गोव्याच्या विविध भागांतून अनेक नेते उपस्थित होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, आमदार, खासदार, काँग्रेसच्या विविध समित्यांचे सदस्य व मतदारसंघातील सरपंच, पंच सदस्य व झेडपी मिळून अडीचशे लोक विराजमान झाले होते. आता निवडणूक तोंडावर आलेली असताना युरी आलेमाव यांनी वाढदिनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. गर्दी पाहून युरीच नव्हे, काँग्रेस नेतेही खूष झाले असणार यात शंका नाही.
ठराव झाले पुढे काय?
पणजीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाने पाच महिन्यांची मुदत दिली आहे, तर महापालिकेने वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठरावही मंजूर केला आहे, अशी माहिती महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिली. शहरातील कार्यक्रमांवरही महापालिका लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणजे आता वाहतूक कोंडीवर न्यायालयाची पाच महिन्यांची मुदत, महापालिकेचा ठराव आणि कार्यक्रमांवर देखरेख असे सगळे उपाय कागदावर सज्ज झाले आहेत. प्रत्यक्ष रस्त्यावर मात्र वाहनचालकांना कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अजूनही स्वतःच मार्ग शोधावा लागत आहे. ठरावांच्या वेगाने वाहतूक सुरू झाली असती, तर पणजीने कधीच मोकळा श्वास घेतला असता!
काब्रालचा तुळशी विवाहानंतर धमाका!
‘अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याएवढाच जबाबदार असतो’ असे म्हणतात ते खरे. भाजपाचे कुडचडे मतदारसंघाचे आमदार नीलेश काब्राल यांच्यावर भाजपाने अन्याय केल्याची भावना काब्राल समर्थकांत आहे. काब्राल हे सक्रिय मंत्री असताना भाजपाने त्यांचे मंत्रिपद काढून त्यांच्यावर पहिला अन्याय केला. एवढ्यावरच स्थानिक भाजपा नेतृत्व थांबले नाही, काब्राल यांच्या मतदारसंघातील मंजूर झालेली विकासकामे रोखून ठेवली. त्यापुढे जाऊन भाजपाने काब्राल यांच्या मतदारसंघात समांतर नेतृत्वाला पाठिंबा दिला व आता भाजपाने काब्राल यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे काब्राल समर्थक सांगतात. आता काब्रालने म्हणे या अन्यायाच्या विरोधात बडा धमाका करण्याचे ठरविले असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. मोठ्या दिवाळीनंतर म्हणजे तुळशी विवाहानंतर काब्राल काही मोठे करणार आहेत, आता पाहूया काब्रालचा धमाका काय आहे.
भाषाच कळेना, मग गुन्हा कळला कसा?
म्हापशातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात संशयिताला अटक करून पोलिस न्यायालयात पोहोचले खरे; पण सोमवारी (ता. १६) पुढील पोलिस कोठडी मागताना म्हणे पोलिसांचीच परीक्षा सुरू झाली. संशयिताला कन्नड भाषा येते, तर त्याच्याशी संवाद साधण्यासाठी भाषांतरकाराची व्यवस्था करणेही पोलिसांना जमले नाही. न्यायालयाने मग प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. आता प्रश्न असा की, संशयिताची भाषा समजत नाही, त्याची बाजू समजून घेण्याची व्यवस्था नाही. पोलिसांनी गुन्हा उकलण्याआधी भाषेचा अडसर तरी उकलायला हवा होता की नाही? न्यायालयात संशयिताची परीक्षा होण्याऐवजी पोलिसांचीच परीक्षा झाली, अशी चर्चा आता न्यायालयाबाहेर रंगू लागली आहे!
छठपूजा आणि समुद्राची स्वच्छता
राज्यात छठपूजेचा उत्साह चांगलाच रंगला होता, पण उत्सवानंतर समुद्रकिनाऱ्यांवर पडलेल्या कचऱ्याचीही मोठी चर्चा सुरू झाली. यातच बायणा किनाऱ्यावर एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राज्यातील इतर समुद्रकिनाऱ्यावर विविध संघटना आणि उत्तर भारतीय बांधवांकडून स्वच्छता करण्यात आली, परंतु बायणा समुद्रकिनाऱ्यावर वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत किनाऱ्याची साफसफाई केली. सण उत्सव साजरे करण्यासोबतच समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेला देखील प्राधान्य देणे गरजेचे असल्याचा संदेश त्यांनी या कृतीतून दिला. आमदारांच्या या ‘स्वच्छता मोहिमे’ची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रशंसा केली जात आहे. समाज माध्यमांवरही या उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे.
नेमके काय करावे..?
हणखणे येथे मगरीने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने आता शेतात राबायचे की मगरीच्या भीतीने घरात बसायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेती करायची तर पाण्याची गरज आणि पाण्याजवळ जायचे, तर मगरीची भीती! वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचेच; पण माणसांच्या सुरक्षिततेचे काय? मगरींचा अधिवास वाढतोय की माणसांची सुरक्षित जागा कमी होतेय, याचा विचार आता संबंधित यंत्रणांनी करायलाच हवा.
युरींच्या कळपात टोनी!
राजकारणात कधी काय होईल हे सांगणे कठीण. म्हणूनच राजकारणाला अस्थिरतेचा खेळ म्हटले जाते. कुंकळ्ळी मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या स्वाभिमानी मतदारांनी व नेत्यांनी एकत्र येऊन विद्यमान आमदार युरी आलेमाव यांच्या विरोधात एकसंध होऊन स्थानिक उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न झाले होते. स्वाभिमानी कुंकळ्ळीकर बॅनरखाली सर्व नेते एकत्र येऊन युरीविरुद्ध एक उमेदवार उभा करावा यासाठी बैठक झाली होती. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले एल्विस गोम्स, सेवा निवृत्त पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस, डॉ. जॉर्सन फर्नांडिस, सॅमी तवारीस, क्लाफास डायस, आपचे प्रशांत नाईक यांनी स्वाभिमानी कुंकळ्ळीकरांच्या नावाने ‘आमचा गाव, आमचा माणूस आमचा स्वाभिमानी’ असे घोषवाक्य जाहीर केले होते व मतदारसंघात बॅनर लावले होते. मात्र, आता ‘आमचा माणूस’ मागे पडल्याचे संकेत मिळत आहेत. युरी आलेमाव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात टोनी साहेब युरीच्या मंचावर उपस्थित होते, त्यांनी युरीचा समर्थनात भाषण ही ठोकले. सेवा निवृत्त पोलिस अधीक्षक सॅमी तावारीस प्रेक्षकांत उपस्थित होते अशी खबर आहे. याचा अर्थ स्वाभिमान निवडणुकीपूर्वीच तुटला व ‘आमचा माणूस, आमचा स्वाभिमानी’ खुंटीला टांगल्यामुळे एल्विस गोम्स निश्चितच संकटात सापडले असणार.
गिरीशचे भाकीत
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा वाढदिवस मोठ्या थाटात कुंकळ्ळीत साजरा करण्यात आला. कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आगामी विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित राहून युरींना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या भाषणात पुढील वर्षी युरी आलेमावचा वाढदिवस असाच साजरा होणार असून त्यावेळी व्यासपीठावर कॉंग्रेस सरकारचे मुख्यमंत्री, मंत्री व आमदार बसलेले असतील असे भाकीत केले. मात्र, त्या यादीत वाढदिवसाचे मानकरी आणि विद्यमान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा नामोल्लेख करण्याचे त्यांनी खुबीने टाळले. हा केवळ योगायोग की युरींच्या राजकीय भवितव्याबाबत गिरीश यांनी केलेले सूचक सुतोवाच? वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने गिरीश यांनी युरींना शुभेच्छांपेक्षा मोठा राजकीय संदेश तर दिला नाही ना? यावर म्हणे कुंकळ्ळीत चर्चा सुरू आहे.
स्वाभिमान आणि बेडूक
सध्या निवडणूक तोंडावर आल्यामुळे प्रत्येक नेत्यांचे वक्तव्य एकप्रकारचे राजकारणच होते. विरोधी पक्षनेेते युरी आलेमाव यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष आशिष नोरोन्हा यांनी केलेल्या वक्तव्याचेही आता असेच राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. नोरोन्हा यांनी या कार्यक्रमात बोलताना, ‘सन ऑफ सॉयल’, ‘स्वाभिमानी कुंकळकर’ अशी बिरुदे लावून कित्येक बेडके तुमच्यासमोर येतील असे म्हटले होते. वास्तविक त्यांचा रोख एल्विस गोम्स यांच्याकडे होता. मात्र, आता हा मुद्दा भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी उचलला आहे. स्वाभिमानी कुंकळकार म्हणजे बेडके आहेत का असा सवाल आता ते करू लागले आहेत. यामुळे कुंकळ्ळीत राजकारण तापण्याची शक्यता आहे.
नवा शैक्षणिक सिद्धांत
शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची असेल, तर सर्वप्रथम शिक्षकांच्या खुर्च्या उंची, महागड्या आणि आरामशीर असणे अत्यंत आवश्यक आहे, हे आता नव्याने समजले आहे. त्यामुळे प्राध्यापकांसाठी एक्झिक्युटिव्ह हायबॅक खुर्च्यांची खरेदी करण्याचा गोवा विद्यापीठाचा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल! खुर्ची जितकी आरामदायी, तितके अध्यापन अधिक दर्जेदार होते, असा काही नवा शैक्षणिक सिद्धांत विद्यापीठाने शोधला असावा. विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्या, शैक्षणिक सुविधा आणि अध्यापन साहित्य यांपेक्षा प्राध्यापकांच्या बैठकीची सोय महत्त्वाची ठरू लागली, तर शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल; किमान खुर्च्यांची उंची तरी!
जनगणना ड्युटीवरून शिक्षण खात्याने केले हात वर!
‘बॉस इज अल्वेस राईट’ म्हणतात ते खरे. पुढच्या महिन्यापासून जनगणनेचे काम सुरू होत आहे. जनगणनेच्या कामाला प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना ड्युटी दिली आहे. आता महिनाभर शिक्षक नसले म्हणजे विद्यार्थ्यांचे काय होणार? शाळेला सुटी द्यावी काय? शिक्षक नसताना शाळा कशी चालवावी? यावर मुख्याध्यापक संघटनेने म्हणे शिक्षण खात्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. ‘काहीही करा तीस दिवस ढकला’ असा सल्ला म्हणे शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा मुख्याध्यापकांना दिला आहे. ‘उजळणी घ्या, ऑनलाईन शिकवणी घ्या, स्कील कार्यकलाप घ्या’ असा सल्ला शाळांना देण्यात आला आहे. आता हे यासाठी शिक्षक लागणारच ना? कदाचित अभ्यासक्रमात काटछाट केली जाणार. कदाचित परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार. हे सगळे ठीक आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांचे काय? मुख्याध्यापक संघटनेच्या मागण्यांनाही शिक्षण खात्याने केराची टोपलीच दाखवली.
विरोधकांकडे लक्ष
गोव्यात सध्या राजकारणाचा खेळच काही वेगळा सुरू आहे. सरकार कोणाचे, विरोधक कोण आणि कोण कुणाच्या बाजूने आहे, हेच जनतेला समजेनासे झाले आहे. विरोधक आंदोलन करतात, तर सत्ताधारीही आंदोलनाच्या माध्यमातून मैदानात उतरतात. त्यामुळे आंदोलनाची स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र आहे. गंमत म्हणजे दोघांचाही उद्देश एकच, तो म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्याचा! मुख्यमंत्र्यांनीही काँग्रेसवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. आता या टीकेला काँग्रेस काय उत्तर देते आणि त्यासाठी कोणते नवे आंदोलन छेडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक मात्र खरे, सध्या गोव्यात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आंदोलनाच्या मूडमध्ये आहेत.
आरोग्यमंत्र्यांचे होतेय कौतुक
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्यमंत्री स्वतः प्रत्येक मतदारसंघात जाऊन कामाचा आढावा घेत आहेत. ज्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य केंद्रात येणे शक्य नाही, त्यांच्या दारापर्यंत उपचार पोहोचत आहेत की नाही याची खात्री करून ते तात्काळ मदत मिळवून देत आहेत. त्यांच्या या संवेदनशील कार्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून मनापासून कौतुक होत आहे. आरोग्य खात्यासह आपल्या इतर सर्व खात्यांच्या माध्यमातून ते ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम प्राधान्याने राबवत आहेत. एफडीए देखील अधिक सक्रियपणे काम करत असून त्यांच्या या जनहिताच्या कामामुळे प्रशासनावरील विश्वास वाढला असून सरकार आणि सहकारी आमदारांच्या विकासकामांनाही मोठे बळ मिळत आहे.
विनयची वाढती लोकप्रियता
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे असे अजब रसायन आहे की, त्यांनी कधी कुणाला दुखावले असे कधी झालेच नाही. येणाऱ्या प्रत्येकाच्या खांद्यावर हात घालून त्यांना आपल्याकडे कसे खेचावे हे विनय तेंडुलकर यांना चांगलेच जमते. त्यामुळे त्यांचा लोकसंपर्कही जबरदस्त आहे. मागच्यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून सावर्डेतून विनयचे नाव पुढे आले होते, पण त्यांनी उमेदवारी नाकारली हाेती. मात्र, आता विधानसभा निवडणूक लढविण्याच्या शर्यतीत आपण आहाेत हे त्यांनी जाहीर केले आहे. सावर्डे युनायटेड फोर्स या नावाने जो सहाजणांचा गट तयार केला आहे, त्यात विनय यांचेही नाव आहे. विनयची ही लोकप्रियता त्यांना उमेदवारी मिळण्यास कारणीभूत ठरेल का? सध्या सावर्डेत हाही एक चर्चेचा विषय बनला आहे.
पालिकेचा ‘आंधळा कारभार’
म्हापशात चिमुकलीवर झालेल्या घृणास्पद अत्याचारानंतर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गणेशपुरीतील दरोड्यावेळी सीसीटीव्हीचा बोजवारा उडाला, तेव्हा तत्कालीन नगरसेवकांनी शहरात कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्याच्या मोठ्या बाता मारल्या; पण जुने कॅमेरे वर्षानुवर्षे बंदच राहिले. आता ऐन दिवाळीत लोहिया मैदानाजवळ घडलेल्या या विकृत घटनेने संपूर्ण गोवा हादरला, तरीही नगरपालिकेचे डोळे उघडले नसल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. खासदार निधीतून प्रस्तावित असलेला एक कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प लालफितीत अडकल्याने लोकप्रतिनिधी तसेच पालिकेच्या इच्छाशक्तीवर सवाल उपस्थित केले जात आहेत. ताज्या घडामोडींनुसार, संशयिताला बेड्या ठोकून पोलिसांनी आपले काम चोख बजावले; आता म्हापसा पालिका कागदी घोड्यांच्या पलीकडे जाऊन सुरक्षेची जबाबदारी घेत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार का, हेच पाहावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.