

नक्की चुकलंय कोण?
विधानसभा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली. परंतु या सोहळ्यावर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी बहिष्कार घातला. याशिवाय काही राजकीय विश्लेषकांनीही या महोत्सवाच्या आयोजनावर समाजमाध्यमातून प्रश्न उपस्थित केले. मार्च २००० मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या संकुलाचे उद्घाटन केल्याने २०२५ मध्येच त्याचा रौप्यमहोत्सव होणे आवश्यक होते, असे सरदेसाई व राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, सध्या विधानसभेचे २७वे वर्ष असून, हे आयोजन चुकीचे आहे. शिवाय विरोधी पक्षनेते, जे आजी-माजी आमदार उपस्थित राहिले, त्यांना रौप्यमहोत्सवी वर्षातील घोळाची कल्पना नक्कीच आली असणार; पण सरकारचा कार्यक्रम असल्याने कदाचित त्यांना येणे भाग पडले असावे. यावरून या घोळात नक्की चूक कोणाची, हा प्रश्न जनतेला केव्हाच पडला असेल.
सरदेसाई आणि आंबे
गोंयकारांना मानकुराद आंबा आवडतो, दिल्लीतील हापूस नव्हे, असे म्हणत विजय सरदेसाई यांनी अकस्मात ‘यू-टर्न’ घेतल्यानंतर गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’मधील सोयरिक तुटली हे स्पष्ट झाले आहेच. त्यामुळे आता गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकी होणार याचीही चाहूल लागली आहे. विजयने ‘आप’ला जवळ घेत तिसरी आघाडी केल्याने फातोर्डा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आणि या तिरंगी लढतीचा आपल्याला कदाचित फायदा होईल अशी अटकळ बांधलेल्या काही जणांच्या मनात आंबे पिकू लागले होते, तर आणखी काही जण आंबे पिकायला घालण्याच्या तयारीत होते. पण विजयने आपली भूमिकाच बदलल्याने कित्येकांच्या मनातले आंबे म्हणे कुजू लागले आहेत.
प्रश्न अजूनही वाहतूक कोंडीतच अडकलेला
पर्वरीचा उड्डाणपूल म्हणे सहाशे कोटींपेक्षा जास्त खर्च करून बांधला. पण खालील रस्त्यावरची वाहतूक कोंडी पाहिली की प्रश्न पडतो, हा पूल वाहतूक कोंडी संपवण्यासाठी बांधला की कोंडीला वरून बघण्याची सोय करण्यासाठी? रोज सकाळी पर्वरी पोलिसस्थानक ते हिरो शोरूमपर्यंत वाहनांची रांग ठरलेलीच! दुचाकीस्वारांना पंधरा मिनिटे अडकावे लागते, मग चारचाकीवाल्यांची अवस्था काय असेल? पूल बांधला, उद्घाटन झाले, खर्च झाला...आता त्याचा फायदा नेमका कोणाला झाला, हा प्रश्न मात्र अजूनही वाहतूक कोंडीतच अडकलेला दिसतोय. लोक म्हणतात, उड्डाणपूल वर उडाला; पण आमची वाहतूक अजूनही खालीच अडकली!
काँग्रेसच्या राखण यात्रेत एल्विस सहभागी होणार?
आम आदमी पक्षात असलेले एल्विस गोम्स यांनी काही वर्षांपूर्वी उमेदीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पण काँग्रेसमध्ये त्यांची डाळ काही केल्या शिजली नाही. एल्विस यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास त्यांना थेट राहूल गांधी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. आता एल्विस कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढवू पाहत असून आपण लोकांचा उमेदवार असे ते सांगत आहेत. पण अजूनही आपण काँग्रेस पक्षात आहे आणि काँग्रेसने आपल्याला कुंकळ्ळीतून उमेदवारी दिल्यास ती आपण घेऊ शकतो असे ते म्हणतात. अशा परिस्थितीत काँग्रेसची ‘गोंय राखण यात्रा’ पुढच्या आठवड्यात कुंकळ्ळीत येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांची कुंकळ्ळीत बैठकही होणार आहे. त्या यात्रेत आणि ज्यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणले, त्या राहुल गांधींचा सभेला एल्विसची हजेरी असेल का? कुंकळ्ळीत होणाऱ्या त्या सभेपेक्षा कुंकळ्ळीतील लोकांना एल्विसची हजेरी असेल की नाही, याचीच उत्सुकता अधिक लागून राहिली आहे म्हणे.
‘आरजी’कडून दबावाची रणनीती
‘आप’सोबतची युती तुटल्यानंतर काँग्रेस-आरजी आघाडीत जाणार की नाही, हे गोवा फॉरवर्डने अजून स्पष्ट केलेले नाही. पण, विजय या आघाडीतच जाणार असे संकेत सध्या तरी मिळत आहेत. त्यामुळे आरजीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांना जागा वाटपाचे ‘टेन्शन’ आले आहे. गोवा फॉरवर्ड आघाडीत नसल्याने काँग्रेस आरजीसाठी दहापेक्षा अधिक जागा सोडेल, असा विश्वास बोरकरांना होता. परंतु, विजयची ‘एंट्री’ झाल्यास काँग्रेस आरजीपीला अपेक्षित जागा देणार का, असा प्रश्न उभा राहिला आहे. तशाही स्थितीत काँग्रेसवर दबाव आणून हव्या तितक्या जागा मिळवण्याची ‘आरजी’ आखत असल्याची चर्चा सुरू आहे.
तिकीट कुणाला, नारळ कुणाला?
म्हापशात बुधवारी आयोजित भाजपची सेवा ज्योती यात्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी भाषणाच्या कार्यक्रमात आगामी पालिका निवडणुकीचे राजकीय रंग उघडपणे दिसून आले. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक काही नवे-जुने चेहरे कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावून चमकताना दिसले. तर, मागील पालिका मंडळातील अनेक मातब्बरांनी मात्र पाठ फिरवली. हे माजी नगरसेवक खरोखरच इतर कामांत व्यस्त होते की तिकीट कापले जाण्याचे संकेत मिळाल्यानेच त्यांनी जाणीवपूर्वक दांडी मारली, याची चर्चा आता रंगली आहे. दुसरीकडे, गेल्या टर्ममध्ये स्थानिक आमदारांशी उभा दावा मांडणारे काही माजी नगरसेवक सध्या थेट आमदारांच्या गळ्यात गळा घालून ऊठबस करताना दिसताहेत. कालचे कट्टर विरोधक आज मनधरणी करून आमदारांचे विश्वासू बनू पाहत असताना, कधीकाळी सावलीसारखे सोबत असणारे निष्ठावंत मात्र एकापाठोपाठ एक कार्यक्रमांना गायब दिसू लागल्याने, म्हापसा पालिकेत उमेदवारीवरून मोठी उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आलेक्स रेजिनाल्डच्या वाढदिवसाला पोचले लुईझिन
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा सोमवारी ५७वा वाढदिवस झाला. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने आलेक्सबाबने यंदा बर्थडे दणक्यात साजरा केला. कुडतरीच्या सर्व मतदारांना त्यांनी निमंत्रण दिले. काही प्रभागांतील लोकांसाठी तर खास बससेवा उपलब्ध केल्या. आलेक्सच्या बर्थडेला माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो हेही उपस्थित होते. कुडतरी येथे आलेक्सच्या निवासस्थानी जाऊन फालेरो यांनी त्यांना बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या. बराच वेळ ते रेजिनाल्ड यांच्याशी बोलत होते. आता नेमका दोघांमध्ये काय सवांद झाला, हे कळायला तसा मार्ग नाही म्हणा. लुईझिन हे आपण राजकीय संन्यास घेतल्याचे सांगत असले तरी ते शेवटी पक्के राजकारणी आहेत हे कुणीही नाकारू शकत नाहीत. आलेक्स यांचे समर्थक तसेच त्यांच्या विरोधकांमध्ये नेमके या दोघांमध्ये चर्चा ती काय रंगली, याची उत्सुकता लागून राहिली आहे हे मात्र खरे.
सुकाळ विद्यापीठांचा
गोव्यात एकच सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय होतं तेव्हा विद्यार्थ्यांना बोलावून आणावे लागायचे. सीट खाली राहतील हा ताण. हळूहळू अभियांत्रिकी कॉलेजांची गर्दीच झाली. आज जेईई गुण टक्केवारी नको, कट ऑफ, पर्संटाईल काही नको, बारावी पास हा एकच निकष पुरे अशी दयनीय स्थिती. जागा जास्त, मुलं कमी. भर म्हणून आता खासगी विद्यापीठे येऊ लागली. त्यांच्या ऐसपैस आवाराला जागा कशी मिळते हा प्रश्न लोकांना भेडसावतोय. दर्जाविषयी बोलायचं नाही. असल्या पदव्या असल्यास काही आस्थापने विद्यापीठाची अधिमान्यता तपासतात आणि या स्नातकांना प्राधान्य देत नाही किंवा नोकरी नाकारतात. शिक्षणाचं बाजारीकरण, अळंब्यासारखी विद्यापीठे ही मूळ अधिकृत विद्यापीठाची रया (कोकणीत फेय) घालवत नाही का? वर्षं झाली, आयआयटीला गोव्यात जागा मिळत नाही, खासगी विद्यापीठांना, मॉल्सना, उद्योगांना मात्र मिळते?
अपहरण नव्हे हो
वेर्ण्यातील तरुणाच्या अपहरण प्रकरणाने पोलिसांनाही क्षणभर धावपळ करायला लावली; मात्र तपास पुढे सरकताच ‘अपहरण’ नव्हे, तर संबंधित व्यक्ती स्वेच्छेने घराबाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तक्रारीतील थरारक कथा अखेर तक्रारदाराच्याच पायावर आली! अपहरणाचा संशय, पोलिसांची शोधमोहीम आणि अखेर स्वेच्छेने गेलेली व्यक्ती... या सगळ्यामुळे अफवांच्या गाडीला अखेर ब्रेक लागला. आता प्रश्न एवढाच, तक्रार करण्याआधी थोडी खात्री केली असती, तर पोलिसांची धावपळ वाचली नसती का?
बाणावलीत शक्तिप्रदर्शन
काँग्रेसच्या ‘गोंय राखण’ यात्रेला बाणावलीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, परंतु ‘यात्रा’ नवीन प्रश्न तयार करत आहे. पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले वॉरेन आलेमाव व बाणावली झेडपी सदस्या लुईझा रॉड्रिगीस या दोघांनीही आपले शक्तिप्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही. वॉरेनचे समर्थक तर त्यांचे नाव असलेले टी-शर्ट घालून यात्रेत सहभागी झाले होते. ते वॉरेनच्या नावाचा जयजयकार करत होते. तर, लुईझा यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. बाणावली मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वरील दोघेही इच्छुक आहेत, हे काही लपून राहिलेले नाही. मात्र आजच्या घडीला ही उमेदवारी कुणाला मिळणार हे निश्चित नाही. भलत्याच कुणाच्या गळ्यातसुद्धा ही उमेदवारी पडू शकते. कारण अनेकजण या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी टपून बसलेले आहेत.
पायाखालची वाळू सरकली
येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘गोवा राखण यात्रा’ सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सरकारने घेतलेले लोकविरोधी निर्णय, गोव्यातील जमिनींचा प्रश्न आदींसह विविध मुद्द्यांवरून काँग्रेस नेते भाजप सरकारविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप नेते आत्तापर्यंत काँग्रेसच्या या यात्रेबाबत गप्प होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभर सेवा ज्योती यात्रेचे आयोजन करत, भाजपने काँग्रेसचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्याची रणनीती आखली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच इतर नेते विविध मतदारसंघांत जाऊन काँग्रेसवर हल्लाबोल करणार असल्याचे लक्षात येताच अनेक मतदारसंघांतील काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलले जात आहे.
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास
यंदा पावसाची तूट आहे. पाण्याची उणीव भासू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर काल कांपाल मुख्य रस्त्यानजीकच्या फूटपाथावर एका छोट्याशा चेंबरातून पाण्याचे लोट, पूर आल्यासारखे वाहत होते. गोमन्तक टीव्हीने हा वृत्तांत प्रसारीत केला. तिकडे घोगळमध्ये मोठ्ठी पाईपलाईन फुटली. दुष्काळात आमंत्रित केलेला तेरावा महिना. किती लिटर पाणी वाहून गेले याची गणती कोण करणार? पावसाची तूट सरकारच्या हाती नाही. परंतु साठवलेल्या पाण्याची तूट करण्यासाठी हा खटाटोप आहे का? पाण्याची बचत, काटकसर करण्याचे संस्कार मुलांवर करायला पाहिजेत. वडिलांनीच जर आपलं वाहन धू-धू धुतलं तर संस्कार कसे होणार? पाण्याच्या वापरावर ब्रेक हवा. पाण्याचा संचय करायला नियोजन हवं. वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी समजदार अधिकारी हवेत. इथं घडतं, त्यापेक्षा बिघडतं जास्त!
कुंकळ्ळीत काँग्रेसचे ‘यूआर’
‘घर में घुसकर मारना’ असा हिंदीत एक मुहावरा आहे. विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार यांचे समर्थक विद्यार्थी म्हणे कुंकळ्ळी महाविद्यालयातून गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. युरी आलेमाव यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला आहे. युरींसाठी हे यश मोठे व खास आहे. कारण, या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणे कुंकळ्ळी भाजप मंडळाचे सरचिटणीस आहेत. भाजप समर्थक महाविद्यालयावर काँग्रेसचा झेंडा लागणे म्हणजे आपल्या पुढच्या लढाईचा विजयी संकेत, असे युरींना वाटत असावे, परंतु देशभर जेंझी मात्र काँग्रेसला मतदान करत नाही. ते नवे उमेदवार शोधतात. या पार्श्वभूमीवर आता पाहुया, विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले शर्मा युतीसाठी ‘लकी’ ठरतात ते!
सरकारी बाबूंची चर्चा
न्यायालयाला माहिती देण्यात दिरंगाई करणाऱ्या सरकारी यंत्रणांची आता म्हणे ‘परीक्षा’ सुरू झाली आहे. वेळेत कागदपत्रे न देणाऱ्यांचे न्यायालयाने कान पिळायला सुरुवात केली आहे. एका पंचायत सचिवाला न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल तब्बल दहा हजारांचा दंड ठोठावला. त्यामुळे सरकारी बाबूंच्या मनात थोडी धडक भरली आहे. ‘न्यायालयाचा आदेश म्हणजे सरकारी फाईल नव्हे की, हवी तेव्हा काढायची आणि हवी तेव्हा कपाटात ठेवायची!’ अशी चर्चा त्यांच्यात सुरू आहे. मात्र काही बाबूंचा आत्मविश्वास अजूनही कायम आहे. ‘दंड झाला तरी काय, पुढची तारीख आहेच!’ पण आता न्यायालयानेच ‘तारीख पे तारीख’च्या सरकारी सवयीला दंडाचा ब्रेक लावला आहे.
राजकारण्यांना ‘देवाचा प्रसाद’
गोव्यात कोणत्याही शुभकार्यापूर्वी देवाला प्रसाद लावण्याची प्रथा आहे. आता निवडणुका जवळ आल्याने राजकारण्यांनाही देवाचा प्रसाद आठवू लागला आहे. विशेषतः जांबावलीच्या श्री दामोदर मंदिरात ‘निवडणूक लढवू की नको?’, ‘यश मिळेल की नाही?’ असे प्रश्न घेऊन राजकारणी हजेरी लावत आहेत. काहींना कौल मिळतो, काहींना मिळत नाही. मात्र कौल मिळाला नाही म्हणून निवडणुकीपासून माघार घेणारे किती? विशेषतः तीन-चार वेळा जिंकलेले प्रस्थापित तर देवाचा कौल काहीही असो, निवडणूक लढवण्यावर ठामच! आणि पराभव झाला तर मात्र, ‘देवाचा कौल नव्हताच,’ असे सांगण्याची सोय तयार. सध्या कोणाला कौल मिळाला, कोणाला नाही, याच्या चर्चा रंगत आहेत. म्हणजेच निवडणुकीआधी देवाचा प्रसाद आणि निकालानंतर देवाचा कौल. राजकारण्यांसाठी देवही आता ‘सेफ्टी नेट’च!
उड्डाणपूल खुला, पण रस्ता बंद
पर्वरीचा उड्डाणपूल नेमका बंद की खुला, असा प्रश्न सध्या वाहनचालकांपेक्षा उड्डाणपूलच जास्त विचारत असेल! काही दिवसांपूर्वी एका बाजूचा मार्ग बंद केल्याची घोषणा झाली होती, आता मात्र एकाच बाजूने वाहने जात असल्याचे फोटो समोर आले आहेत. बुधवारी काही दुचाकी गिरी ते पर्वरी प्रवास करत असल्याचे दिसून आल्याने ‘पूल खुला झाला की वाहनांनीच रस्ता शोधला?’ अशी चर्चा रंगली. प्रशासनाने खरोखरच एका बाजूचा मार्ग खुला केला असेल, तर त्याची अधिकृत घोषणा करावी. त्यामुळे वाहनचालकांचा संभ्रम दूर होईल. कारण पूल बंद करताना जर ‘ब्रेकिंग’ने सांगितले होते, तर उघडतानाही ‘ओपनिंग सेरेमनी’ची माहिती मिळायला हरकत काय? शेवटी वाहनचालकांना रस्ता हवा, कोडे नाही! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.