Goa Politics: खरी कुजबज; आता तरी युथ काँग्रेसला येणार अच्‍छे दिन?

Goa Latest Political News: हरमल येथील एका हॉटेलवर झालेल्या कारवाईवर बोलताना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपण हॉटेल व्यवसाय चालवत नसून शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहोत.
Goa Latest Political News
Goa Latest Political NewsDainik Gomantak
Published on
Updated on

आता तरी युथ काँग्रेसला येणार अच्‍छे दिन?

मागच्‍या काही वर्षात गोव्‍यात युथ काँग्रेस नावाची संघटना आहे की नाही हा प्रश्‍न पडावा, अशी एकंदर स्‍थिती होती. कारण कुणाच्‍यातरी वशिल्‍याने युवा काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी विराजमान झालेल्‍याने आपल्‍या कार्यकाळात एकही असा कार्यक्रम राबविला नाही, ज्‍यामुळे युवा काँग्रेसचे अस्‍तित्‍व दिसू शकेल. आता युवा काँग्रेसची नव्‍याने निवडणूक झाली आहे. अर्चित नाईक हे युवा काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी निवडून आले आहेत. अर्चितचे वडील शांताराम नाईक हे माजी खासदार होते. त्‍यांची परंपरा पुढे नेणाऱ्या अर्चितमुळे गोव्‍यात युवा काँग्रेसला आता तरी अच्‍छे दिन येणार का? की पुन्‍हा येरे माझ्‍या मागल्‍याच होणार? ∙∙∙

सर, तेव्हाही असेच बोलाल का?

हरमल येथील एका हॉटेलवर झालेल्या कारवाईवर बोलताना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपण हॉटेल व्यवसाय चालवत नसून शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहोत. आपली शैक्षणिक संस्था आहे. शिवाय पाच शाखा असणारी बहुउद्देशीय संस्था चालवतो. आपण नेहमीच शिक्षक आहोत, असेही ते म्हणाले. आपण कोणत्याही स्थितीत गैरकृत्याला थारा देणारे नाही, किंवा बेकायदेशीर व्यवसायाला समर्थन देणारेही नाही, आपण आपली मालमत्ता भाडेपट्टीवर दिली होती. जर काही बेकायदेशीर असेल, तो भाडेपट्टीवर जागा घेणारा भोगेल, असेही ते म्हणाले. पार्सेकर सर जेव्हा जेव्हा काही प्रतिक्रिया व्यक्त करतात, तेव्हा तेव्हा ते चर्चेत येतात, याही वेळी अपवाद झाला नाही. भाडेपट्टीवर जागा दिल्यानंतर तिथे कायदेशीर व्यवसाय होणे अपेक्षित नाही का? पण उद्या एखाद्याने गांजाची लागवड केली, किंवा अन्य कोणतेही गैरकृत्य भाडेपट्टीवर घेतलेल्या जागेत केले, तर तेव्हाही सर असेच बोलतील का?, अशी चर्चा परिसरात होत आहे.

एक माकड अजून ‘ढिम्म’

गोव्यातील जमिनी वाचविण्यासाठी पुढे सरलेले न्या. फर्दिन रिबेलो यांनी दोन दिवसांपूर्वी म्हापसा येथे झालेल्या सभेत गांधीजींच्या तीन माकडांचे उदाहरण देताना न ऐकणारे माकड म्हणजे आमचे सरकार, न पाहणारे माकड म्हणजे न्यायालये आणि न बोलणारे माकड म्हणजे गोव्याची जनता, असे म्हटले होते. पण काल मडगाव येथे झालेल्या सभेत चिंबल संदर्भात झालेले आंदोलन आणि नंतर न्यायालयाने रद्द केलेला परवाना यांचा उल्लेख करताना न पाहणारे आणि न बोलणारे माकड आपली कामे व्यवस्थित करू लागली आहेत. पण तिसरे न ऐकणारे माकड(सरकार) अजून तसेच ढिम्म आहे. आणि त्याला जागे करण्याची जबाबदारी आता जनतेची आहे, असे उद्गार काढले.

जुने सरकार म्हणजे कुठले?

भाजप सरकारला पाठिंबा देत असलेला कुडतरीचा अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विघानसभेत बोलताना म्हटले की पूर्वीच्या सरकारांनी कोमुनिदाद किंवा सरकारी जागांवर अतिक्रमण केलेल्यांवर कुठलीही कारवाई केली नाही. त्यांना तिथून हटवले नाही व त्यांची घरे नियमीतही केली नाही. पूर्वीची सरकारे म्हणजे मगोची किंवा कॉंग्रेसची असे रेजिनाल्डबाबांना म्हणायचे आहे का? रेजिनाल्डबाब हे जरी आता भाजपला पाठिंबा देत असले तरी ते पूर्वी कॉंग्रेसच्याच कळपातले होते ना असे व लोक म्हणताना दिसतात. आता भाजपमध्ये जे काही आमदार किंवा मंत्री आहेत ते सुद्धा कॉंग्रेसच्याच कळपात होते ना? त्यांनीच हा बेकायदेशीर पणा केला आहे ना? हे आलेक्सबाब सोयीस्कररित्या कसे विसरतात? असा उलट प्रश्न आता लोक उपस्थित करू लागले आहेत.

अजूनही त्याच धक्क्यात

जागतिक मराठी संमेलनातील हा किस्सा आता उघड झाला आहे. एका विषयात दोन दशके काम केलेल्या एकाला त्याच क्षेत्रातील महनीय व्यक्तीशी संवाद साधण्याचे काम सोपवण्यात आले. त्या व्यक्तीने तयारी केली. कुतूहल म्हणून त्याने चौकशी केल्यावर त्याच सत्रात अन्य एका महनीय व्यक्तीला पाचारण केल्याची माहिती त्या संवादकाला मिळाली. त्याने त्यांच्‍याशी कोण संवाद साधणार, अशी विचारणा केल्यावर मुंबईतील माणसाने गोव्यातील माणसाचे तर गोव्यातील माणसाने मुंबईतील माणसाचे नाव सांगत तेथे विचारणा करावी, असे सुचवले. त्याने त्यानुसार केल्यावर दुसऱ्या महनीय व्यक्तशीही त्यानेच संवाद साधावा, असे सांगण्यात आले. पहिल्या महनीय व्यक्तीची तर जा ये करण्याची सोयही न केल्याने तीही जबाबदारी संवादकाच्याच खांद्यावर पडली. हे सारे झाल्यावर एका व्यक्तीच्या संवादासाठीच्या मानधनाचा धनादेश दोन व्यक्तींशी संवाद साधल्यानंतर त्या संवादकाच्या हाती सोपवण्यात आला. या गचाळ आयोजनाच्या धक्क्यातून तो संवादक अद्याप सावरला नसल्याची चर्चा आहे.

एल्‍टन भाजपात जाणार?

गत विधानसभा निवडणुकीत केपेत काँग्रेसच्‍या तिकिटावर उभ्‍या राहिलेल्‍या एल्‍टन डिकॉस्‍तांनी तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांचा पराभव केला आणि राज्‍यात खळबळ उडवून दिली. या निवडणुकीच्‍या निकालानंतर अवघ्‍या सहा महिन्‍यांत काँग्रेसचे आठ आमदार भाजपात गेले. परंतु, एल्‍टन यांनी मात्र काँग्रेसची साथ सोडली नाही. पण, गेल्‍या काही महिन्‍यांपासून एल्‍टन भाजपच्‍या संपर्कात असल्‍याचा चर्चा वारंवार घडत आहेत. गुरुवारी सभागृहात एका प्रश्‍‍नावरील चर्चे दरम्‍यान मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनीही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना डिवचत ‘एल्‍टनचे आम्‍ही बघून घेऊ’ असे वक्तव्‍य केले. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा एल्‍टनच्‍या भाजप प्रवेशाच्‍या चर्चांना ऊत आला आहे. विधानसभा निवडणूक अवघ्‍या चौदा महिन्‍यांवर येऊन ठेपल्‍याने एल्‍टनना भाजपात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरू तर केले नाहीत ना? की एल्‍टन स्‍वत:च भाजपात प्रवेश करणार? असे प्रश्‍‍न अनेकांना पडले आहेत.

..मग युरी गायब का होतात?

राज्‍य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्‍याच्‍या दुसऱ्या दिवसापासून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव कमालीचे आक्रमक झाले आहेत. बोलण्‍यासाठी केवळ चारच दिवस मिळणार असल्‍याचे लक्षात घेऊन ते मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासह समोर येणाऱ्या प्रत्‍येक मंत्र्यावर विविध विषयांवरून हल्लाबोल चढवत आहेत. गुरुवारी त्‍यांनी मंत्री विश्‍‍वजीत राणेंना ज्‍या पद्धतीने धारेवर धरले, ते पाहिल्‍यानंतर प्रथमच विधानसभेत पोहोचून थेट विरोधी पक्षनेते बनलेले युरी राजकारणात ‘तरबेज’ झाल्‍याचा भास सर्वांनाच झाला. पण, सभागृहात इतक्‍या कळकळीने बोलणारे युरी अधिवेशन संपताच गायब का होतात? असाही प्रश्‍‍न अनेकांना पडला आहे.

Goa Latest Political News
Goa Casino: आठ कॅसिनोंनी थकवला 315.56 कोटी महसूल; एक प्रकरण कोर्टात; एकाचा परवाना निलंबित

अधीक्षक सायबांना ‘मीडिया अ‍ॅलर्जी’

आतापर्यंत मीडिया फ्रेंडली असलेले दक्षिण गोव्याचे एसपी अचानक आता पत्रकारांना टाळू लागले आहेत. सायबांमध्ये अचानक हा बदल का झाला, हे कळायला काही मार्ग नाही. आपल्या हाताखालील सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी मीडियाला परस्पर बातम्या देऊ नये, अशी तंबीच दिली आहे. बिचारे पोलिस या आदेशाचे पालन करतातही. बातम्यांसाठी एसपींना विचारा, आम्ही काही सांगू शकत नाही, असे सांगून ते आपले हात वर करतात. एसपीना फोन केला वा एसएमएस पाठविला तर पलिकडून प्रतिसाद काही मिळत नाही. वाढत्या गुन्हेगारीवर पांघरूण घालण्यासाठी तर हा सारा खटाटोप नसावा ना?

जॅमर कोणाचा आवाज दाबण्यासाठी

सरकारने ‘जॅमर’ ही सुविधा आणताना अतिमहनीय व्यक्तींच्या दौऱ्यावेळी अशी सुविधा शेजारील राज्यातून आणावी लागत होती, असे कारण पुढे केले होते. गुरुवारी चिंबलवासीयांनी राजधानी पणजीत धडक दिली. त्याचे वार्तांकन थेट प्रक्षेपण स्वरूपात राज्यभरात पोचल्यावर पोलिस मुख्यालयातून जॅमर वापराची शक्कल सुपीक डोक्यातून बाहेर आली. जॅमर तेथे पाठवण्यात आला यामुळे थेट प्रक्षेपण व मोबाईल बंद पडले. अखेर माध्यम प्रतिनिधींच्या रेट्यामुळे पोलिसांना जॅमर बंद करावा लागला. सरकारी यंत्रणा आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्याला सरकार जाब विचारणार का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

लढ्याचे पुढे काय?

युनिटी मॉलच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन आता उग्र झालंय.. असं म्हणायला उशीर झालाय, कारण ते कधीच उग्र झालं होतं. फक्त सरकारच्या लक्षात यायला वेळ लागला. आता मात्र चर्चा अशी आहे की, हे आंदोलन आणखी उग्र होणार म्हणे! कारण काय तर राज्यभरातून ‘समर्थक’ येणार आहेत. समर्थक आले, गर्दी वाढली, आवाज चढला... मग पुढे काय होईल? हा प्रश्‍न सरकारपेक्षा आंदोलकांनाच जास्त पडला असावा. कारण सध्या आंदोलन ज्या पातळीवर पोहोचलं आहे, ते पाहता ते शांत करणं सरकारच्या हातीच आहे. आंदोलनाचे पुढे की होईल? यावर तर चक्क लोकांत पैजा लावणे सुरू झाले आहे.

युरींसाठी धोक्याची घंटा?

गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी ॲड. अर्चित नाईक यांची निवड झाली आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी त्यांचे समाजमाध्यमांवरुन अभिनंदन केले. आपल्या संदेशात युरी यांनी अर्चितना त्यांचे वडील शांताराम नाईक यांचा वारसा पुढे नेण्याचा सल्लाही दिला. आता शांताराम नाईक यांचे घराणे हे मूळ कुंकळ्ळीचे आणि अर्चित नाईक यांचा कुंकळ्ळीत बऱ्यापैकी जनसंपर्क आहे. कॉंग्रेस पक्षात महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस यांच्या प्रतिनिधींना निवडणुकांत तिकीट देण्याची एक प्रथा आहे. आता, अर्चितरावांनी जर आगामी विधानसभा निवडणुकीत युवक कॉंग्रेसच्या वतीने कुंकळ्ळीतून तिकीटाची मागणी केली तर ‘भायलो भितरलो’ हा वाद नक्कीच उफाळून येणार आणि बाणावली मतदारसंघातले वार्कावासीय युरी आलेमाव यांना तो नक्कीच डोईजड होणार, अशी चर्चा आज कुंकळ्ळी बाजारात सुरू होती.

पेडण्यातील मशाल मिरवणुकीची धग

तुये येथे ‘गोमेकॉ’शी सलग्न इस्पितळ सुरू करावे या मागणीसाठी पेडणेवासीय एकटवले आहेत. त्यांनी मशाल मिरवणूक काढून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मशालीची धग पर्वरीतील सरकारपर्यंत पोचेल की, या विषयावरून वणवा पेटवावा लागेल हे पेडणेवासीयांना अद्याप समजलेले नाही. मात्र राजकीय मतभेद विसरून या विषयावरून एकत्र आले आहेत. पेडण्यातील ही एकी टिकली तर पेडण्याच्या हिताचे बरेच काही घडू शकते, असे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com