Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांच्‍या मनात काय?

Khari Kujbuj: चिंबलमधील प्रस्‍तावित युनिटी मॉल प्रकल्‍पाला विरोध करीत स्‍थानिकांनी काही दिवसांपासून जुने गोवेत साखळी उपोषण सुरू केले आहे.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्‍यमंत्र्यांच्‍या मनात काय?

चिंबलमधील प्रस्‍तावित युनिटी मॉल प्रकल्‍पाला विरोध करीत स्‍थानिकांनी काही दिवसांपासून जुने गोवेत साखळी उपोषण सुरू केले आहे. हा प्रकल्‍प कोणत्‍याही परिस्‍थितीत चिंबलमध्‍ये होऊ द्यायचा नाही, यावर आंदोलक ठाम आहेत. तर, याबाबत स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या समितीच्‍या अहवालाचा अभ्‍यास करूनच निर्णय घेण्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी ठरवले आहे. एका बाजूला आंदोलन सुरूच आहे आणि मुख्‍यमंत्र्यांनी या विषयावर बोलणे पूर्णपणे टाळल्‍याने त्‍यांच्‍या मनात नेमके काय आहे? त्‍यांना हा प्रकल्‍प रेटायचाच आहे? की तो दुसरीकडे हलवायचा आहे? असे प्रश्‍‍न जनतेला पडले आहेत.

भाटीकर काँग्रेसच्या वाटेवर?

नुकतेच ‘मगो’शी फारकत घेतलेले डॉ. केतन भाटीकर हे आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कुर्टी झेडपी निवडणुकीत आपल्या अपक्ष उमेदवाराकरवी पावणेसहा हजार मते प्राप्त केल्यामुळे भाटीकरांच्या नावाला सध्या ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले आहे. यामुळे त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास ते फोंडा पोटनिवडणुकीत भाजप समोर कडवे आव्हान उभे करू शकतात, असे फोंड्याचे काँग्रेस कार्यकर्ते बोलताना आढळताहेत. आता भाटीकर काँग्रेसमध्ये जाणार का, त्यांना उमेदवारी मिळणार का, हा पुढचा प्रश्न असला तरी सध्या तशी फोंड्यात जोरदार चर्चा सुरू आहे एवढे मात्र नक्की.

Khari Kujbuj
Goa Tiger Reserve: 'सीईसी'च्या अहवाल विरोधी प्रतिज्ञापत्राला देणार आव्‍हान! गोवा फाऊंडेशनचे अध्‍यक्ष क्‍लॉड अल्‍वारीस यांची माहिती

रितेशना कला मंदिर; षडयंत्राचा वास?

प्रशासनात कुशल असलेल्या दिवंगत रवी नाईक तथा सर्वांचे पात्रांव यांचे पुत्र रितेश यांना भाजपाने राजीव गांधी कला मंदिरचे अध्यक्षपद बहाल करून वर वर काहीतरी मोठे केल्याचे दाखवले जात असले तरी त्यात षडयंत्राचा वास येत असल्याची चर्चा फोंड्यात सुरू आहे. एकीकडे कला मंदिराचे अध्यक्षपद द्यायचे आणि दुसरीकडे पोटनिवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर फोंडा मतदारसंघाच्या आमदारकीची उमेदवारी काढून घ्यायची आणि भलत्यालाच द्यायची, असा तर बेत नाही ना हीच चर्चा सध्या फोंडा मतदारसंघामध्ये आणि एकूणच राजकीय वर्तुळात रंगत आहे. आता असा प्रकार मात्र होऊ देऊ नको रे बाबा, असे साकडे झरेश्वराकडे घालण्याशिवाय रितेश नाईक यांच्या समर्थकांकडे सद्या तरी पर्याय नाही, हेही तेवढेच खरे. देवा झरेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी देरे बाबा..

कुंकळ्ळीत इच्छुक पालिका निवडणूक तयारीत!

‘वेल बिगन इज हाफ डन’ अर्थात ‘सुरुवात व्यवस्थित झाली तर अर्धे काम फत्ते’ अशा आशयाचे हे बोधवाक्य आहे. पालिका निवडणुकीला आता मोजकेच महिने राहिले आहेत.पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर होणार की, पूर्वीप्रमाणे व्यक्तिगत स्तरावर हे अद्याप ठरलेले नाही. असे असले तरी काँग्रेस समर्थक युरी आलेमाव यांचे कार्यकर्ते आतापासूनच आपापल्या प्रभागात निवडणूक प्रचारास लागले आहेत. युरी यांनी अजूनपर्यंत कोणालाच आपले समर्थन जाहीर केले नसले तरी त्यांचा आशीर्वाद मिळणार या विश्वासाने काही युवा कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू केला आहे. युरीबरोबर प्रत्येक कार्यात हिरारीने भाग घेणाऱ्या चार महिला कार्यकर्त्यांनी कोंबा पारिकोटो, माड्डीकटा, गुळ्याकटो, वेरोडा या प्रभागातून प्रचारास सुरवात केल्याचे चित्र दिसत आहे. युवा काँग्रेस गटाध्यक्ष ही पालिका निवडणुकीत उतरणार असल्याचे कळते. युरीबरोबर फिरणारे काही युवा कार्यकर्त्यांनाही नगरसेवक बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.युरी आलेमाव यांच्या गोटात निवडणुकीची चुळबूळ चालली असली तरी भाजप गोटात मात्र सामसूम आहे.

पणजी पोलिस चर्चेत

राजकारणात, प्रशासनात आणि पोलिस खात्यात सध्या एक नवीनच ‘तुलना स्पर्धा’ सुरू असल्याची चर्चा कानावर येतेय. म्हणे एका प्रकरणात न्यायालयाने काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याची चर्चा रंगली अन् त्यानंतर चहाच्या टपऱ्यांपासून ऑफिसच्या कॉरिडॉरपर्यंत एकच सवाल फिरतोय, मडगावात तक्रार घेतली तर पणजीत का नाही? लोकांच्या गप्पांचा सूर तर भारीच मिश्किल झालाय. कोणी म्हणतं, मडगावला ‘एफआयआर रजिस्टर’ पटकन सापडतं, पण पणजीत बहुतेक कपाटाची किल्ली सुट्टीवर गेली असावी! तर कोणी हसत म्हणतं, कायद्याचं ‘जीपीएस’ सगळीकडे सारखं काम करतं का, की काही ठिकाणी नेटवर्क कमी पडतं? खरं काय, कागदावर काय, आणि प्रक्रियेत काय हे सगळं अधिकृत कागदोपत्री स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत लोकांच्या चर्चांना उधाण आलंय. एकूणच, सध्या पोलिस खात्यात फायलींपेक्षा चर्चा जास्त चालतेय म्हणे… आणि प्रत्येक जण दुसऱ्याकडे पाहून हसतोय!

Khari Kujbuj
Goa Education: 9वीच्‍या परीक्षेबाबत नवी अपडेट! शाळांनी प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय स्थगित; गोवा बोर्डाकडून नवे परिपत्रक जारी

काब्राल समर्थक म्हणतात, ‘भिवपाची गरज ना’

एकाने दुसऱ्यास गिळावे, दुसऱ्याने तिसऱ्यास! हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा, असे म्हटले जाते ते खरे. राजकारणात जिंकायचे झाल्यास आपल्या राजकीय शत्रूंना बाजूला करावे लागते. सध्या कुडचडे मतदारसंघात विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांना मात देण्यासाठी भाजपातूनच नवीन नेतृत्व उदयास आले आहे. कुडचडे मतदारसंघाचा इतिहास सांगतो की, आमदारकीची शर्यत जिंकण्यासाठी प्रत्येकाने आपल्या नेत्याला बाजूला सारूनच यश संपादन केले आहे. रामराव देसाई यांचे बोट धरून श्याम सातार्डेकर आमदार बनले. श्याम सातार्डेकर यांच्या हाताला धरून नीलेश काब्राल आमदार बनले आणि आता भाजपच्या काही नेत्यांचे बोट धरून रोहन गावस देसाई आमदारकीची शिडी चढण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी परवा रोहनच्या वाढदिवसाच्या दिवशी खास उपस्थिती लावून रोहनला केक भरवला.एवढेच नव्हे तर रोहनच्या मनातील इच्छा पूर्ण होवो, असा आशीर्वादही दिला. आता पाहूया इतिहासाची पुनरावृत्ती होते, की काब्राल नवा इतिहास लिहितात.

महिलांना संधी का नाही?

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरच्या अध्यक्षपदी रितेश रवी नाईक यांची नियुक्ती झाली, आदेशही निघाला, सगळं ठीक. पण अंत्रुज महालात सध्या एक वेगळीच चर्चा रंगतेय. कलामंदिरच्या मंडळात एकाही महिलेला जागा नाही, हे कुणाच्या लक्षातच आलं नाही का? माशेल, सावईवेरे, वळवई, बोरी, शिरोडा, मंगेशी, म्हार्दोळ अशा गावांमध्ये वर्षानुवर्षं कला जपणाऱ्या, रंगमंच गाजवणाऱ्या महिला कलाकारांची यादी मोठी आहे. मग निर्णयप्रक्रियेत त्या अदृश्य कशा झाल्या? कला-संस्कृती खात्यात ‘कला’ आहे, ‘संस्कृती’ आहे. पण महिलांसाठी जागा उरली नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. एकंदर, कलामंदिरात कार्यक्रम रंगतील, पण त्यासाठी महिलांना संधी हवीच. यावर सध्या फोंड्यात चहा टपरीपासून सांस्कृतिक वर्तुळापर्यंत खमंग चर्चा सुरू आहे.

महापौरांचे बोल!

पणजी महानगरपालिकेत ३० च्या ३० जागा जिंकून येतील, असे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नुकतेच भाकीत केले. ते भाकीत खरे ठरण्यात काहीच गैर नाही, असे महापौर रोहित मोन्सेरात यांना वाटते. त्यांनी एका यूट्यूब चॅनलवर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली मते मांडली आहेत. त्यात महानगरपालिकेचे काम चांगल्या पद्धतीने चालले आहे. आमदार मोन्सेरात यांची अनेक वर्षे सत्ता राहिलेली आहे. पाच वर्षांत शहरात अधिक विकास कामे झालेली आहेत, राष्ट्रीय स्तरावर महानगरपालिकेला बक्षीसही मिळाले आहे. पणजीला चैतन्यशील बनवण्यासाठी आपणास आणखी एक टर्म हवी, असे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय ‘कौन्सिल इन नो मेजर स्कॅम’ असाही उल्लेख केला आहे. त्यामुळे महापौरांना नक्की काय म्हणायचे होते? त्याच्या आड काय गुपित आहे? असे प्रश्न सध्या नेटकरी उपस्थित करीत आहेत.

गुन्‍हेगारांना पोलिसांचेच अभय?

सध्‍या काणकोणात असे नवीन बदल काय झालेत ते माहित नाहीत. मात्र काणकोणात काही पोलीसच गुन्‍हेगारांना संरक्षण आणि अभय देत असल्‍याचे उघडकीस आले आहे. दाेन दिवसांपूर्वी काणकोण पाेलिसांनी एक रेड करुन एका ड्रग पॅडलरला अटक केली होती. यासंबंधीची माहिती पोलिसांनी अजून उघड केलेली नाही. पण म्‍हणतात ना, पाण्‍यात घाण केली तर ती वर येतेच त्‍याच न्‍यायाने काणकोणातील या ‘ड्रग पेडलर’च्या अटकेचीही चर्चा चालू आहे. ज्‍याला पेडलर म्‍हणून अटक केली ताे म्‍हणे, काणकोण पोलिस स्‍थानकात काम करणाऱ्या एका पोलिसाच्‍याच घरात भाड्याने रहात होता. सदर संशयित हा मागचा कित्‍येक काळ या व्‍यवसायात असल्‍याचे सांगितले जाते. याचाच अर्थ त्‍याबद्दल पोलिसांना माहिती असायलाच हवी. असे असतानाही अशा गुन्‍हेगाराला पोलिसच आपले घर भाड्याने देत असतील, तर त्‍याला काय बरे म्‍हणावे? अशा पोलिसांवर कुणी कारवाई करेल का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com