खरी कुजबुज: काँग्रेस व भाजप अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात!

Khari Kujbuj Political Satire: कोणत्याही संघटनेत मतभेद असण्यात गैर नाही. मात्र, मनभेद घातक ठरू शकतात. विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस व भाजप अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात!

कोणत्याही संघटनेत मतभेद असण्यात गैर नाही. मात्र, मनभेद घातक ठरू शकतात. विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपात मतभेद व अंतर्गत वादामुळे मनभेद झाल्याचे खुद्द भाजपाचे आमदारच सांगतात. भाजपचे आमदार असताना काही मोठे नेतेच मतदारसंघात आमदारांऐवजी इतरांना पुढे करत असल्याचा जाहीर आरोप काब्राल करतात. हीच काँग्रेसचीही समस्या आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनेत बदल केल्याने ते अनेक नेत्यांच्या पचनी पडलेले नाहीत. काँग्रेस पक्षाचे खासदार व काही बडे नेते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात आहेत. काही काँग्रेस नेत्यांनी तर स्वतंत्रपणे काम सुरू केले आहे. गोमंतकाच्या मातीतून गोमंतकीयांचे हित सांभाळण्यासाठी जन्माला आलेल्या ‘आरजी’ची काय दुरवस्था झाली आहे, ते आपल्या समोर आहे. आता या सगळ्याचा फायदा कोणाला होणार? याचा फायदा घेण्यासाठी मनभेद झालेले राजकारणी तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची खबर आहे. आता पाहूया, जनता काय निर्णय देते ते.

सशांचं राज्य

बुद्धिबळासारखाच बुद्धीचा पत्त्यांचा खेळ असतो तो ब्रिज. त्याच्याही विश्वस्पर्धा होतात. त्यात पत्ते खूप पिसावे लागतात. कोंकणीवादी बुद्धिमान असल्याने ब्रिज खेळण्यात पटाईत. मंडळाच्या नव्या समितीसाठी कदीम काळातील पानं पिसली, मांडली. पानं तीच, हुद्दे वेगळे. समस्या खूप आहेत. कोंकणी विद्यार्थ्यांची संख्या उतरत आहे. पाठ्यपुस्तकांचा घोळ म्हणजे एक इतिहास ठरणार. खरे तज्ज्ञ सिंह त्या चुकांवर टिपणं काढत आहेत. झेन कथेची आठवण या ब्रिजने करून दिली. धूर्त कोल्हा डोंगरावर गेला. चहाड्या सांगायला. फार दुरून सिंहाला सांगता झाला, ‘वनराजे, ते ससे तुम्हाला नावे ठेवत आहेत. राजा बनू पाहत आहेत.’ क्षणात वनराजाने अशी डरकाळी फोडली की धरणीकंपाने कोल्हा थरथरायला लागला. ‘असल्या क्षुद्रांचा विषय माझ्या खिजगणतीतसुद्धा नाही. मी स्वयंघोषित नव्हे, अनभिषिक्त सम्राट आहे. चालता हो.’

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

लिंडनची तयारी खरी मात्र...

लिंडन मोंतेरो हे आता आपल्या राजकीय इनिंगच्या तयारीला लागले आहेत. रविवारी त्यांचा वाढदिवस होता. कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. यावेळी त्यांचे अनेक हितचिंतक उपस्थित होते. नुवे मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांची मनिषा आहे. भाजपाचा पाडाव करण्यासाठी भाजपविरोधी पक्षातर्फे आपण निवडणूक लढविणार, असे ते म्हणतात. अजूनही ते कुठल्याही राजकीय पक्षात नाहीत. मात्र, त्यांचा कल काँग्रेसकडे आहे. लिंडनबाब हे पूर्वी मिकी पाशेको यांचे ‘ओएसडी’ होते. त्यामुळे राजकारण हा त्यांच्यासाठी नवीन प्रांत नाही. मात्र, नुवे मतदारसंघ ‘एसटी’साठी आरक्षित झाला, तर त्यांचे आमदारकीचे स्वप्न धुळीस मिळेल, हेही तेवढेच खरे. बघूया, पुढे राजकारण कसे वळण घेते ते.

कवळेकर उत्तर देतील का?

राजकारणात प्रवेश करताना अटी-शर्ती असतातच! कुणी मंत्रीपद मागतो, कुणी महामंडळ, तर कुणी ‘योग्य वेळी योग्य निर्णय’ एवढेच म्हणत गप्प बसतो. पण, बाबू कवळेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना नेमकी कोणती अट ठेवली होती, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार एल्टन डी''कोस्टा यांनी हा मुद्दा उचलल्याने गावागावांत वेगळीच चर्चा सुरू झाली. लोक म्हणतात, ‘एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी एवढा आग्रह होता, तर पक्षप्रवेशाच्या वेळी ती अट चर्चेत होती का? की तेव्हा सर्व काही ‘नंतर पाहू’ या गोड शब्दांत गुंडाळले गेले?’ आता उत्तर देण्याची वेळ आली असून, बाबू कवळेकर हे स्पष्टीकरण देतील का, की हा प्रश्नही राजकारणातील इतर अनेक प्रश्नांसारखा हवेतच तरंगत राहील? याकडे लक्ष लागले आहे.

छत्री तारेल का?

सांताक्रुझ मतदारसंघात शिवसेनेतर्फे छत्र्यांचे वाटप होताच तालुकाध्यक्ष आणि भंडारी समाजाचे नेते सुनील सांतिनेजकर यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पावसाळ्यात छत्री वाटप हा समाजसेवेपेक्षा निवडणुकीच्या ‘वॉर्म-अप’चा भाग आहे. त्यामुळे या छत्र्या मतदारांना पावसापासून वाचवण्यासाठी आहेत की स्वतःच्या राजकीय भवितव्यावर सावली धरून ठेवण्यासाठी, असा खोचक सवाल उपस्थित झाला आहे. आता या छत्रीची सावली केवळ पावसाळाभर टिकते की थेट विधानसभा उमेदवारीपर्यंत पोहोचते, हेच पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

फोंडा काँग्रेसमध्ये दुफळी?

सध्या काँग्रेस नेते राजेश वेरेकर हे फोंड्यात जोमाने कार्य करताना दिसतात. उपजिल्हा इस्पितळातील कमतरतांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे ते चांगलेच ‘फोकस’मध्ये आले आहेत. पण, त्याचबरोबर खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच जॉन परेरा, नारायण नाईक, शेख शब्बीर यांसारखे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या या उपक्रमात दिसत नसल्यामुळे तोही एक चर्चेचा विषय बनला आहे. दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांना काँग्रेसमध्ये आणण्यात परेरांचा सिंहाचा वाटा होता. भाटीकरही तसे बोलून दाखवत असत. आता भाटीकरांच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यातून ते अजूनही सावरले नसल्यामुळे ते काँग्रेसच्या कार्यापासून दूर आहेत की मतभेदामुळे, हे कळायला मार्ग नसला तरी याबाबत उलटसुलट तर्कवितर्क सुरू झाले आहेत. याला ‘दुफळी’ म्हणावे की काय, हेही कळेनासे झाले आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Congress: फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, चिट्टी बाबू घंटावर कारवाई कधी? काँग्रेसचा सरकारला सवाल

म्हापशात पालिका निवडणुकीची रंगत...

पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या तरी म्हापशात राजकीय ईर्ष्या तापली आहे. एका प्रभागात स्थानिक लोकप्रतिनिधींचे तीन अत्यंत खास व्यावसायिक समर्थक निवडणूक लढवण्यास उत्सुक असून, आपापल्या समर्थकांमध्ये तसे दावेही करत आहेत. मात्र, तिकीट एकालाच मिळणार असल्याने साहेब कोणाची निवड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिघेही जवळचे असल्याने भविष्यातील राजकीय बंडखोरी किंवा अंतर्गत वाद टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी साहेब आपल्याच एका नातेवाईकाला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या साहेब प्रत्येक जाहीर कार्यक्रमात आणि सामाजिक उपक्रमांत या नातेवाईकाला सोबत ठेवून हजेरी लावत आहेत. राजकीय वर्तुळात ही या नातेवाईकाच्या ‘लॉन्चिंग’चीच पूर्वतयारी मानली जात आहे. आता ही चर्चा केवळ राजकीय कुजबूज ठरते की प्रत्यक्षात उतरते, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

दहा लाख वडाचा संकल्प...

वटपौर्णिमेच्‍या निमित्ताने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्‍यात दहा लाख वड लावण्‍याचा संकल्‍प सोमवारी केला. निश्चितच हा संकल्प स्वागतार्ह आहे. या संकल्पचेही कौतुक केले जात आहे. जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर मोफत वडाच्‍या रोपट्यांचे वितरण करण्‍यात येणार आहे. पावसाळ्यात नागरिकांनी अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन करण्यात आले असले तरी प्रत्‍यक्षात किती वृक्ष लावले? त्‍यातील किती जगले? आणि त्‍यांच्‍या रक्षणासाठी काय करण्‍याची गरज आहे? यावर मात्र कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. मुळात संबंधित खात्‍यांच्‍या सरकारी अधिकाऱ्यांनाच वृक्ष लागवडीचे घेणे देणे नाही. मग, केवळ नागरिकांनाच असे आवाहन का केले जाते? असा प्रश्‍‍न आता जनतेकडून विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com