

ही तर केवळ सुरुवात!
सांताक्रुझमध्ये कचेरीच्या मुद्द्यावरून विद्यमान आमदार रुडॉल्फ फर्नांडिस आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यात सुरू झालेला वाद आता चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी निवडणुकीत पणजी, ताळगाव आणि सांताक्रुझ या मतदारसंघांवर दावा करण्यासाठी बाबूश प्रयत्नशील आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपमधीलच दोन नेत्यांमध्ये सुरू झालेली ही चढाओढ पक्षासाठी अडचणीची ठरणार नाही ना, अशी कुजबुज आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. सध्या त्यांच्यातील मतभेद उघड झाले नसले तरी रुडॉल्फ-बाबूश वाद ही केवळ सुरुवात असल्याची चर्चा पक्षात रंगू लागली आहे.
काळे केस, मोठे संकेत?
फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी नुकताच आपला ५६वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. मात्र, त्यांच्या काळ्या केसांची चर्चा राजकीय वर्तुळात फारच रंगली आहे बुवा. पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रथमच आपण केस काळे करत असल्याचे सांगितले. ‘विधानसभेतील विरोधी पक्षातील मी सर्वांत ज्येष्ठ आमदार आहे; मात्र मला ज्येष्ठ किंवा सीनियर म्हणणे आवडत नाही. त्यामुळेच केस काळे ठेवतो’ असे त्यांनी सांगितले. मात्र, या वक्तव्यामागे केवळ विनोद आहे की आगामी राजकीय समीकरणांचा काही संकेत, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. विरोधक सत्तेत आल्यास ज्येष्ठतेच्या आधारावर नेतृत्वाचा दावा तर यातून सूचित होत नाही ना, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
कुंकळ्ळीचे माजी नगरसेवक कुणीकडे?
‘काम सरो आणि वैद्य मरो’ ही म्हण आपण ऐकलीच असेल. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी नगरपालिकेवर पाच वर्षे निर्विवाद वर्चस्व राखले. आमदार नसतानाही त्यांनी पाच वर्षांपूर्वी कुंकळ्ळी पालिकेवर चौदापैकी नऊ नगरसेवक निवडून आणले. पाच वर्षे समर्थक नगरसेवकांना आपल्या कळपात एकसंध ठेवण्यात ते यशस्वी ठरले. मात्र, पालिकेची मुदत संपल्यावर सर्व नगरसेवक माजी बनले आणि त्यांनी हळूहळू युरी आलेमाव यांची साथ सोडली की काय, असा प्रश्न आम जनतेला पडला आहे. युरीसमर्थक नगरसेवक आता युतीच्या कळपात दिसत नाहीत. युरीच्या कार्यक्रमात नऊपैकी एकही नगरसेवक दिसत नाही. त्या माजी नगरसेवकांना बाजूला करून युरी आलेमाव यांनी पुढच्या पालिका निवडणुकीसाठी नवीन चेहरे पुढे केल्याने माजी नगरसेवक नाराज आहेत. आता पाहूया, युरी त्यांची नाराजी दूर करू शकतात की एल्विस बाब या नाराजीचा फायदा उठवतात.
दळवींची ‘लगीनघाई’?
फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. त्यानंतर त्यांचा उत्साह अधिकच वाढला असून सध्या ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहेत. फोंड्यात सध्या पाणीटंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. या प्रश्नावर नागरिक पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत आहेत. नागरिकांचे गट वेगवेगळे असले तरी या सर्वांमध्ये एक समान दुवा दिसतो तो म्हणजे विश्वनाथ दळवी. प्रत्येक गटासोबत उपस्थित राहून ते नागरिकांच्या समस्या आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही ‘कानमंत्र’ दिला नसावा ना, अशीही चर्चा रंगू लागली आहे. काहीही असो, वाढदिवसाच्या उत्साहाप्रमाणेच सध्या त्यांची ही ‘लगीनघाई’ चर्चेचा विषय ठरत आहे.
‘चल या फुडें’ची दौड!
राजकारणात यशस्वी व्हायचे असल्यास प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवावी लागते. गोव्यात सध्या भाजपविरोधात विरोधी पक्ष जरी युतीची भाषा करत असले तरी युतीचे घोडे पुढे जात नसल्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्षाने आपल्या घोषवाक्याप्रमाणे ‘चल या फुडें’ म्हणत पाऊल पुढे टाकायला सुरवात केली आहे. ‘आरजी’ सध्या कोमात गेल्यामुळे ‘आरजी’च्या मतांवर गोवा फॉरवर्डचा डोळा असणे स्वाभाविक. गोवा फॉरवर्ड आता फातोर्ड्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. जिथे काँग्रेस पक्ष कमजोर आहे, त्या काणकोण, सांगे, कुडचडे या मतदारसंघांत गोवा फॉरवर्ड पक्षाने नेटाने काम सुरू केले आहे. याचा अर्थ जर उद्या युती झाली तरी गोवा फॉरवर्ड काणकोण, सांगे, कुडचडे या दक्षिणेतील मतदारसंघांवर निश्चितपणे दावा सांगणार. उत्तरेत कुंभारजुवे, मांद्रे व पूर्वी निवडणूक जिंकलेल्या आणखी दोन मतदारसंघांत गोवा फॉरवर्ड सध्या ‘फॉरवर्ड’ आहे. याचा अर्थ युती झाल्यास पंचवीस टक्के शेअर फॉरवर्ड मागणार, हे निश्चित.
नशामुक्त भारतासाठी हे कराच
आपल्या डोक्यावरचे ओझे दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवल्याने समस्यांचे निवारण होत नाही. कोणत्याही समस्येच्या कायम निवारणासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज असते. केंद्र व राज्य सरकारने सर्व शिक्षण संस्थांमध्ये ‘नशामुक्त भारत’ अभियान सुरू केले आहे. चांगली गोष्ट आहे ही. मात्र केवळ युवक व विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून भारत नशामुक्त होणार नाही. त्यासाठी जे नशा आणणाऱ्या पदार्थांचा व्यापार करतात, त्यांना ठेचण्याची गरज आहे. अमलीपदार्थांचे जाळे गावागावांत व शहराशहरांत पसरले आहे. शाळेच्या बाहेर ड्रग्सची विक्री होते. विशेष म्हणजे बाहेरून हे पदार्थ येतात कसे?. याबाबत शाळेतील मुलांमध्ये जागृती करायलाच हवी, मात्र अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांना व या कारभारात गुंतलेल्यांना शोधून काढून त्यांचे कंबरडे मोडायला हवे. असे झाले तरच आपला भारत नशामुक्त होईल.
प्रकाश सर, सुरवात आपण करा
‘चॅरिटी बिगिन्स ॲट होम’ असे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे. आपण ज्याला दान-धर्म म्हणतात, ते आपणापासून सुरू करायला नको का? ‘उटा’ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी ‘एसटी’ सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनातील दहा टक्के वेतन ‘एसटी मिशन’साठी देण्याचे आवाहन केले आहे. त्यावर एसटी समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत. ‘प्रकाश वेळीप, गोविंद गावडे, गणेश गावकर, रमेश तवडकर, आंतोन वाझ, गोविंद शिरोडकर, जुआंव फर्नांडिस यांनी आपल्या मिळकतीपैकी वीस टक्के रक्कम या मिशनसाठी दान करून शुभारंभ करावा’ अशी प्रतिक्रिया एसटी युवक व्यक्त करू लागले आहेत. एसटी हा कष्टकरी समाज आजही मागासलेला आहे. या समाजातील आम आदमीला मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलांमधील मऊ-मऊ सोफ्यांवर बसण्याची सवय नाही. त्याच अतिमागास एसटी समाजाच्या नेत्यांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये बैठका व कॉन्व्हेनसन घेण्यासाठी निधी हवा म्हणून हे दान मागितले जाते आहे का?, असा प्रश्न या समाजाचे सरकारी कर्मचारी विचारत आहेत. प्रकाश सर, हे पैसे कशासाठी ते तर सांगा ना!
अज्ञानी अध्यापक
‘फागूरफाट’ नावाचं एक कोकणी पुस्तक आहे. त्याचा अर्थ कोकणी प्राध्यापकांना विचारा. माहीत नाही. तथापि एक कथित दोतोर विद्वान अध्यापक ‘फां’टभुंयेर असे लिहितात. फाट (पाठ) हा शब्द फांट कसा, कधी, कुठे झाला? जय कोकणी, लिहिताना हेच विध्या(द्या)वंत जंय कोंकणी, लिहितात. जय म्हणजे विजय. जंय म्हणजे जेथे. हे जनांनी शिकवावे काय? अनुस्वार विषयावर हे लोक यशस्वीपणे स्वार होऊ शकलेच नाहीत. एक शिक्षक हल्लीच निवेदन करताना ‘टंटंमारीबाबाने लाक्षणिक कामगिरी केली’ असे म्हणाला. लक्षणीय कामगिरी आणि लाक्षणिक संप यातील फरक माहीत नाही. एक निवेदिका शब्दबंबाळ, फेसाळ बुडबुड्यांसह बोलताना तारतम्य भाव म्हणाली. तरतमभाव हे अचूक रूप. कसलाही भाव असो, आम्ही चिमूटभर भाव...बुड्डून (ओरबाडून) सगळं खावं.
कोंबड्यांच्या झुंजीत पोलिसांना धोपटले!
कोलवा पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला हफ्ता मागणे चांगलेच महागात पडले आहे. मागील आठवड्यात बाणावली येथे आयोजित कोंबड्यांच्या झुंजीच्या ठिकाणी हा प्रकार घडला. संबंधित पोलिस कर्मचारी दोन सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला व झुंज लावण्यास हरकत नाही, मात्र त्याचा ‘हफ्ता’ त्वरित द्यावा, असा आग्रह त्याने धरला. आयोजकांनी थोडा वेळ द्यावा, अशी विनंती केल्यानंतर वातावरण तापले. त्यानंतर झुंज पाहण्यासाठी आलेल्या काही लोकांनीच त्या पोलिसाला चोप दिला. त्याच्यासोबत आलेले दोघेही या प्रकारातून सुटले नाहीत. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. मात्र, ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ असल्याने प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याची कुजबुज आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.