Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

Khari Kujbuj Political Satire : सरकारच्या गळ्यातील ताईत असणारा एक अधिकारी पेडणे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मिकीचा ‘सोशल ॲक्‍टिविस्‍ट’शी पंगा

रामा काणकाेणकर यांच्‍यावर हल्‍ला झाल्‍यानंतर सर्व स्‍तरातून या घटनेचा निषेध होत असताना आणि मेणबत्ती आणि मशाल मोर्चे निघत असताना माजी मंत्री मिकी पाशेको यांनी मात्र या बाबतीत भलताच सूर लावला आहे. यासंदर्भात पाशेको यांनी काल एक लांबलचक पत्रक जारी करून हे स्‍वघोषित सामाजिक कार्यकर्ते आधी मुद्दामहून लाेकांच्‍या वाटेला जातात आणि त्‍याचे परिणाम त्‍यांना भोगावे लागतात, असे म्‍हटले आहे. असे म्‍हणतात, मिकी पाशेको यांनी यापूर्वी फिदोल या ‘सोशल ॲक्‍टीविस्‍ट’ विरोधात तक्रार केली होती आणि त्‍यात फिदोलला अटकही झाली होती. त्‍यावेळी रामा काणकोणकर तिच्‍या समर्थनात रस्‍त्‍यावर उतरला हाेता. याचा राग काढण्‍यासाठी मिकी सध्‍या सगळ्‍याच ‘साेशल ॲक्‍टीविस्‍ट’शी पंगा घेत आहे, असे म्‍हणायचे का?

पेडणे मतदारसंघात वजनदार अधिकारी

सरकारच्या गळ्यातील ताईत असणारा एक अधिकारी पेडणे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. आपणाला आणखी काही नको पण पेडण्यातून भाजपची २०२७ मधील उमेदवारी देतो म्हणा, असा तगादा या दिवसांत त्याने लावला आहे. मोठी आर्थिक ताकद कमावलेल्या त्या अधिकाऱ्याला सध्या नाही म्‍हणणे कोणाला शक्य होत नाही. त्यामुळे पाहू, करू असे म्हणत त्याची समजूत काढण्यात येत आहे. त्याच्या उमेदवारीमुळे पेडण्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलतील याची सत्ताधाऱ्यांना कल्पना आहे. तो निवडून येण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करू शकतो, याची खात्रीही आहे. त्यामुळे सध्या पेडण्यात इच्छुक असलेल्यांचे काय होणार हा मोठा प्रश्न दबक्या स्वरूपात का होईना, चर्चिला जात आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

अनैतिक धंदे पोलिसांना कसे दिसत नाहीत बुवा?

काही दिवसांपूर्वी कोलवा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत घडलेल्‍या धीरयोत एकाचा जीव गेल्‍यानंतर कोलव्‍यात खुलेआम चालू असलेल्‍या या धीरयो पोलिसांनाच कशा दिसत नाहीत, असा सवाल लोकांनी केला होता. आता पुन्‍हा दोन दिवसांपूर्वी कोलव्‍यातील बेकायदेशीर मसाज पार्लरवर पडलेल्‍या धाडीमुळे हा प्रश्‍न कुणी परत विचारल्‍यास त्‍याला कुणी दोष देऊ नये. ज्‍या दोन पार्लरवर पोलिसांनी धाड घातली, ती पार्लर गेली कित्‍येक वर्षे बिनबोभाटपणे चालू आहेत. तिथे पर्यटक राजराेसपणे जातात आणि स्‍थानिकांनाही त्‍याची माहिती आहे. ही माहिती सर्वांना असताना फक्‍त पोलिसांनाच ती कशी कळत नाहीत, हे कोडे काही केल्‍या सुटत नाही बुवा!

Khari Kujbuj Political Satire
BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

नशीबवान सरकारी अधिकारी!

दक्षिण गोव्यातील गणेशोत्सवातील सोडती विकत घेण्यासाठी तीन-तीन किमी रांगा लागतात, हा एक कौतुकाचा विषय असतो. देवाचा प्रसाद म्हणून सोडत मिळवण्यासाठी लोक काम धंदा सोडून रांगेत उभे राहतात, असेही मानता येईल. परंतु काही ठराविक लोकांना मात्र या सोडतीचे प्रमुख बक्षीस हमखास कसे मिळते, यावर मात्र अनेकजण आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी सासष्टीतील एका सरकारी अधिकाऱ्याला मोटरगाडी बक्षीस लागली होती. आणि यावर्षी त्याच्या बायकोला गाडी लागली आहे! सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांनी या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला ही सोडत फुटली, असे सांगून आपली पत्नी किती नशिबवान आहे, व देव तिला कसा पावला हे सगळ्यांना सांगितले आहे. सासष्टीतील दुसऱ्या अधिकाऱ्यालाही यंदा गाडी प्राप्त झाली. अनेक सरकारी अधिकाऱ्यांना म्हणे या सोडतीतील गाड्या हमखास प्राप्त होतात! प्रत्यक्षात सोडतीचा ‘आशीर्वाद’ कसा प्राप्त करायचा असे, हे गेल्या वर्षापासून ते जाणून आहेत. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

राजीनाम्‍यांची तयारी...

काँग्रेससोबत युती तोडत पुढील जिल्‍हा पंचायत आणि विधानसभा निवडणूक स्‍वबळावर लढवण्‍याचा निर्णय आपने घेतला. या निर्णयानंतर आपचे राष्‍ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवालांपासून ते राज्‍य संयोजक अमित पालेकरांपर्यंतच्‍या नेत्‍यांनी काँग्रेसवर सडकून टीका करण्‍यास सुरुवात केली आहे. परंतु, पक्षाचा हा निर्णय आपच्या राज्‍यातील बहुतांशी नेत्‍यांना पटलेला दिसत नाही. त्‍यातूनच पक्षाचे कार्यकारी अध्‍यक्ष राजेश कळंगुटकर यांनी बुधवारी राजीनामा दिला. ‘आप’ सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षांवरच अधिक घसरतो, हा त्यांचा सवाल आहे. या निर्णयामुळे पुढील काळात पक्षाचा राजीनामा देणाऱ्यांच्‍या यादीत अनेकांची नावे असल्‍याची जोरदार चर्चा पक्षात सुरू आहे.

डिनर डिप्लोमसी

काँग्रेस पक्ष अलिकडे अंतर्गत वादामुळे चर्चेत आला होता. अखेर पक्षश्रेष्ठींनी दखल घेत दिलजमाई झाल्याचे चित्र तयार केले. जेवणाच्या टेबलावर सर्व एकत्र हसऱ्या चेहऱ्याने जमले. दिल्लीत सध्या वातावरण कसेही असो, कॉंग्रेसच्या गोटात मात्र सर्व काही आलबेल असल्याचे ठळकपणे समोर आणले गेले आहे. युती आघाडीवरून कॉंग्रेसला वाकुल्या दाखवण्याचे प्रयत्न मधल्या काळात झाले. काही पक्षांनी एकत्र येण्याचे सुतोवाचही केले. कॉंग्रेसने मात्र या डावपेचांना बळी न पडता, आपणच दादा या नुसार वागत अंतर्गत कुरबुरीवर पक्षश्रेष्ठींचा जालिम उतारा देत कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश पोचवला आहे.

Khari Kujbuj Political Satire
Five Minor Girls Assaulted Goa : डिचोलीत साडेतीन महिन्यांत 5 अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी, तीन प्रकरणांत राज्याबाहेरील युवकांचा हात

फोंड्यात भाजप-काँग्रेस एकत्र?

फोंड्यात काहीही होऊ शकते, अशी सध्या परिस्थिती आहे. आता हेच बघा ना, परवा एका पत्रकार परिषदेला फोंड्यातील भाजप व काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र दिसले. विषय होता खडपाबांध प्रभाग क्रमांक सहा मधल्या शंकर-पार्वती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे अडलेले डांबरीकरण. डांबरीकरण अडल्यामुळे वाहन चालकांना त्रास होतो, ही वस्तुस्थिती. मात्र या पत्रकार परिषदेत फोंडा भाजपचे सचिव तथा या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक शौनक बोरकर आणि फोंडा काँग्रेसचे गटाध्यक्ष तथा या प्रभागाचे माजी नगरसेवक विलियम आगियार हे दोघे हे काम एका ‘विघ्न संतोषी’ माणसामुळे अडले, असे एका सुरात सांगताना दिसत होते. नाहीतर म्हणे हे काम मेमध्येच झाले असते. फोंड्याचे आमदार हेही या डांबरीकरणाचा पाठपुरावा करत असल्याचेही हे दोघे सांगून मोकळे झाले. म्हणजे याला जबाबदार फक्त तो ‘विघ्न संतोषी’असे त्यांचे म्हणणे. त्यामुळे ही पत्रकार परिषद डांबरीकरणाकरता होती का ‘त्या’ व्यक्तीविरुद्ध होती, हे कळू शकले नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस व भाजपचा जमलेला सूर. त्यामुळे येत्या निवडणुकीत फोंड्यात नवे समीकरण तर उदयाला येणार नाही ना, असे अनेकांना वाटू लागले आहे. आणि तशी चर्चाही सुरू झालीय, आता बोला!

जनता दरबारांचे फलित? की...!

विधानसभेच्‍या गत पावसाळी अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारकडे केलेल्‍या मागण्‍यांमधील अनेक मागण्‍या सरकारकडून पूर्ण होत आहेत. आता टपाल कार्यालयांमध्‍ये डाक सेवकांची भरती करताना कोकणी सक्ती करण्‍याची त्‍यांची मागणीही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्राकडून पूर्ण करून घेतल्‍याने विजय खूश आहेत. अधिवेशनाआधी त्‍यांनी प्रत्‍येक तालुक्‍यात जनता दरबार घेत लोकांच्‍या मागण्‍या ऐकल्‍या आणि त्‍या विधानसभेत मांडल्‍या होत्‍या. आता त्‍यांच्‍या मागण्‍यांची सरकारकडून होत असलेली पूर्ती हे जनता दरबारांचे फलित? की आगामी जिल्‍हा पंचायत निवडणूक जिंकण्‍यासाठी भाजपची सुरू असलेली वाटचाल? या प्रश्‍‍नाचे उत्तर अनेकजण शोधत आहेत.

फक्त दोन मिनिटांचा उशीर त्यांना भोवला!

‘समय बडा बलवान रे भैया समय बडा बलवान, समय के आगे हम क्या भैया, झुक जाये भगवान’ या जुन्या गाण्याचे बोल बरेच काही सांगतात. वेळ जीवनात महत्वाची असते. दोन मिनिटे उशीर झाल्यास आयुष्याची रेषा व दिशाच बदलू शकते, याचा अनुभव नोकरीच्या शोधात असलेल्या काही शारीरिक शिक्षकांनी घेतला. सरकारी माध्यमिक शाळेत शारीरिक शिक्षकांसाठी पदे भरण्यासाठी गेल्या आठवड्यात फातोर्डा येथे एका खासगी महाविद्यालयात लेखी परीक्षा होती. परीक्षेसाठी अर्जदारांनी परीक्षेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले होते. शारीरिक शिक्षक पदासाठी अर्ज केलेले काही अर्जदार शिक्षक परीक्षा स्थळी दोन मिनिटे उशिरा पोहचले. यात महिला अर्जदार शिक्षिका होत्या. मात्र, या सर्व क्रीडा शिक्षकांना परीक्षास्थळी दोन मिनिटे उशीर झाला म्हणून परीक्षा प्रमुखाने फाटक बंद केले व उशिरा आलेल्यांना परीक्षला बसू दिले नाही. काही महिला शिक्षकांनी त्या परीक्षा प्रमुखांना व सुरक्षा रक्षकांना याचना केल्या, त्यांचे पाय धरले तरी त्यांनी त्या शिक्षकांना परीक्षेची संधी दिली नाही परिणाम शिक्षक होण्याची तयारी करणाऱ्या त्या प्रशिक्षित क्रीडा शिक्षकांची संधी पाण्यात गेली. ‘शंकराचार्यांपेक्षा जास्त धार्मिक बनू नका’ अशा आशयाची एक म्हण आहे, जी त्या परीक्षा प्रमुखांना अचूक लागते नाही का? ∙

मायकल यांचे लक्ष

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘मोपा’वरील टॅक्सीवाल्यांचा प्रश्न स्वतःहून सोडवला. टॅक्सी व्यावसायिकांना मान्य होईल, असा तोडगा काढला आणि तोडगा मान्य झाल्याचे टॅक्सी व्यावसायिकांनी जाहीरही केले. कळंगुटचे आमदार आजवर टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत असत. या खेपेला पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदारांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी व्यावसायिकांशी बोलणी केली. या साऱ्या घडामोडींवर लोबो यांचे लक्ष आहे. सरकारने एक पाऊल जरी चुकीचे टाकले तर टॅक्सी व्यावसायिक पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात येतील, अशी सारी व्यवस्था आहे. यावर सत्ताधारी गोटातून वेगळी नजर ठेवण्यात आली आहे. त्याची एक वेगळीच चर्चा सध्या सुरू आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com