खरी कुजबुज: पोटनिवडणुकीचे टेन्शन!

Khari Kujbuj Political Satire: भाजप प्रदेशाध्‍यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्‍यापासून दामू नाईक कमालीचे आक्रमक झालेले आहेत.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

पोटनिवडणुकीचे टेन्शन!

फोंडा पोटनिवडणुकीचा निर्णय सध्या उच्च न्यायालयात ‘राखीव’ आहे. पण नेत्यांना निकाल काय येणार यापेक्षा ‘रद्द झाली तर काय होणार?’ या विचारानेच कांहीच्या कपाळावर आठ्या पडायला सुरुवात झाली म्हणे. गावागावात सध्या दोनच चर्चा, एक निवडणूक होणार का? आणि दुसरी रद्द झाली तर कोणाचे नुकसान? काही जण तर आधीच अंदाज बांधत आहेत, की निर्णय जर धक्का देणारा आला तर काही नेते थेट कपाळावर हात ठेवून बसलेले दिसतील. तर काही जण म्हणे आधीच मानसिक तयारी करत आहेत. “जे होईल ते पाहू!” विशेष म्हणजे अजून निकाल लागलेलाच नाही, पण टेन्शनचा माहोल मात्र तयार झाला आहे. काहींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, तर काहींच्या चेहऱ्यावर ‘काहीतरी गडबड आहे’ अशी भावना दिसू लागली आहे म्हणे. एकंदरीत काय, न्यायालयाचा निर्णय अजून कागदावर यायचा आहे. पण राजकीय रंगमंचावर आधीच सस्पेन्स, टेन्शन आणि कुजबूज यांचा फुल्ल शो सुरू झाला आहे. आता पाहायचं एवढंच, कोणाचा टेन्शन वाढणार आणि कोणाचा एकदम गायब होणार!

Khari Kujbuj Political Satire
Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

दामू यांचा अंकुश!

भाजप प्रदेशाध्‍यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्‍यापासून दामू नाईक कमालीचे आक्रमक झालेले आहेत. दामू हे भाजपचे केडर नेते असल्‍याने पक्षाची शिस्‍त, भूमिका त्‍यांच्‍या नसानसांत भिनलेली आहे. त्‍यामुळे आपल्‍याच पक्षाच्‍या कोणत्‍याही नेत्‍याकडून पक्षाला बाधक ठरतील, अशी कृत्‍ये होऊ नये, याकडे त्‍यांचे बारकाईने लक्ष आहे. काहीच दिवसांपूर्वी मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी आमदार जीत आरोलकर यांच्‍यासंदर्भात काही वक्तव्‍ये केली. त्‍यामुळे भाजपसोबत युती असलेल्‍या मगो पक्षाचे नेते दुखावले होते. त्‍याचा राग दामूंनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना काढला. मंत्री आमदारांनी पक्षाच्‍या रिती आणि नीतीनुसार वागावे, पक्षाची शिस्‍त, भूमिका समजून घेऊनच बोलावे. बेजबाबदार वक्तव्‍ये करू नयेत असा सज्जड दमही त्‍यांनी भरला. विधानसभा निवडणूक अवघ्‍या अकरा महिन्‍यांवर येऊन ठेपल्‍याने असे प्रकार पुन्‍हा घडू नयेत, यासाठी दामूंनी आतापासूनच ‘बेताल’ वक्तव्‍ये करण्‍यात माहीर असलेल्‍यांवर अंकुश लावण्‍यास सुरुवात केली आहे. पण, त्‍याचा त्‍यांच्‍यावर किती परिणाम होणार, हे पुढील काहीच महिन्‍यांत दिसून येईल.

खेळपट्टीच्या नावानं चांगभलं

गोवा क्रिकेट संघटना सोमवारी पुन्हा एकदा चर्चेत राहिली. यावेळी कारण मैदानावरील ठरले. चिखली-वास्को येथील मैदानावर तीन दिवसीय प्रीमियर लीग क्रिकेट सामना दीड दिवसांच्या आतच संपला आणि खेळपट्टीच्या नावाने ओरड सुरू झाली. काहींच्या मते ही खेळपट्टी राज्यस्तरीय प्रमुख क्रिकेट सामन्यासाठी अजिबात लायक नव्हती, तर पूर्णतः फिरकी गोलंदाजांच्या अधीन असलेली खेळपट्टी पूर्णतः तयार नव्हती असेही काहींना वाटले. काहींच्या मते खेळपट्टीत काहीच दोष नव्हता, तर फलंदाजांनी खराब फटके मारून पायावर धोंडा मारून घेतला. या गडबडीत पराभूत संघाचा दुसरा डाव अवघ्या पन्नाशीत गारद झाला आणि संघटनेने प्रमुख सामन्यांसाठी दर्जेदार खेळपट्ट्या वापरायला हव्यात असे सल्लेही ऐकायला मिळाले. कारणे काहीही असो, सामना दीड दिवसांच्या आत संपतोय ही बाब सलणारी आहे आणि त्यामुळे गोवा क्रिकेट संघटनेतील संबंधितांना खडबडून जागे होणे आवश्यक आहे. प्रत्येकजण आपलीच बाजू योग्य असल्याचे कारण देत ‘कातडी बचाव’ भूमिका घेत असताना संघटनेने ठोस भूमिका घेऊन खराब खेळाची कारणे शोधायला हवीत. खेळपट्टी खरोखरच योग्य नव्हती, तर त्यामुळे नुकसान राज्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे होईल हे ध्यानात घ्यायला हवे.

महापौर रोहित मोन्सेरात सक्रिय!

पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात हे सध्या चांगलेच सक्रिय झालेले दिसत आहेत. सध्या त्यांनी बैठका आणि पणजीतील कामकाजांची पाहणी करण्यावर भर दिला आहे. रोहित यांनी पुढील वर्षी होणारी विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला मिळालेल्या अल्पकाळात पणजीतील जेवढी कामे मंजूर करावी लागतील, तेवढी मंजूर करून घेण्यावर भर दिल्याचा दिसतो. याशिवाय यापूर्वी रोहित समाजमाध्यमांत सक्रिय दिसले नाहीत, तेवढे ते आता समाजमाध्यमांत सक्रिय झालेले दिसतात. दिवसभरातील कामकाजांचे त्यांची छायाचित्रे, व्हिडिओ सध्या त्यांच्या समाजमाध्यमांतील अकाऊंटवर तात्काळ अपलोड होत आहेत. त्यामुळे त्यांनाही आता समाजमाध्यमांचे महत्त्व पटलेले दिसते.

अन् ‘बाबा’ने  फटकारले!

दिगंबर कामत हे नेहमीच शांत व संयमी स्वभावाचे. मात्र हल्ली त्यांना काही पत्रकार मूळ विषय सोडून काहीही प्रश्न विचारू लागल्याने ते चिडतात. शनिवारी त्याचा प्रत्यय मडगावच्या न्यू मार्केटमध्ये आला. या मार्केटमधील  दोन दुकानांबाबत काही पत्रकारांनी खोचक प्रश्न विचारला अन् बाबाचा पारा चढला. तू कुठल्या पेपरचा वार्ताहर आहेस, असे त्यांनी विचारले. तो पत्रकारही खजील झाला व बाबालाही हसू आवरता आले नाही.

एका म्यानात तीन तलवारी!

उत्तर गोव्याच्या काँग्रेस अध्यक्षपदाची माळ म्हापशाचे नगरसेवक ॲड. शशांक नार्वेकर यांच्या गळ्यात काय पडली, म्हापसा काँग्रेसमध्ये जणू ‘अच्छे दिन अवतरले!’ कालपर्यंत म्हापशात उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसला दुर्बीण लावून फिरावे लागत होते, पण आता स्थिती अशी आहे, की उमेदवारीसाठी ‘रस्सीखेच’ सुरू आहे. पक्षाकडे सध्या एका जागेसाठी तीन-तीन नेते रांगेत आहेत. तसे चार होते, पण नगरसेवक सुधीर कांदोळकर हे घरवापसी करतील, अशी चर्चा आहे! त्यामुळे पहिले दावेदार ॲड. शशांक नार्वेकर. दुसरे दावेदार महिला अध्यक्ष प्रतीक्षा खलप. तिसरे उमेदवार पक्षाचे सचिव विजय भिके. बिचारे भिके वर्षानुवर्षे ‘उमेदवारीच्या प्रतीक्षेत’ राहण्याचा विक्रम प्रस्थापित करत आहेत. सध्या भिके यांनी ''टुगेदर फॉर म्हापसा'' या नवीन बॅनरखाली आपला मांडव टाकला आहे. म्हापसा पालिका कुठे कमी पडतेय, याचे पाढे वाचण्यात ही संघटना सध्या व्यस्त आहे. पण प्रश्न असा आहे की, निवडणुकीच्या वेळी हे सगळे एकत्र ''टुगेदर'' राहणार की एकमेकांचे पाय खेचणार? काँग्रेस समोर आता प्रश्न आहे की, या तिघांपैकी कोणाच्या पदरी ‘प्रसादाचा नारळ’ टाकायचा, उमेदवारी कोणालाही मिळो, पण विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासमोर शड्डू ठोकण्याची ''खरी'' क्षमता कोणात आहे, याची चाचणी पक्षाला करावीच लागेल. निवडणुकीच्या मैदानात जाण्यापूर्वीच या तिघांच्या शर्यतीत काँग्रेसची ''म्हापसा एक्सप्रेस'' रुळावरून घसरायची!

त्याचा माज जिरला!

बड्या बापाचा लेक असला, तर सर्व काही खपवून घेता येते, असा काहींचा गैरसमज असतो. अशाच  एका कार्ट्याचा  माज दक्षिण गोव्यातील एका पोलिस ठाण्यात पोलिसांनी उतरविला, झाले असे. बड्या बापाचा हा चिरंजीव आपल्या हातात महागड्या मोबाईलवरून बोलत दुचाकीवरून जात होता. त्याने हेल्मेटही  घातले नव्हते. वाहतूक पोलिसांनी त्याला अडवून, जाब विचारला असता, त्याने आपल्या ओळखी सांगायला सुरुवात केली. पोलिसही बधले नाहीत. सरळ पोलिस ठाण्यात आणले व त्याला गोड शब्दात चार शब्द सुनावले. तालांव  किती पडणार याची कल्पनाही दिली अन् काय चमत्कार म्हणा. तो युवक सुतासारखा सरळ होऊन चूक झाली म्हणून गयावयाही करू लागला.  त्याला पोलिसांनी सोडले खरे, मात्र आत लवकरच त्याच्या घरी तालांव पाठवून देण्याची तयारीही पोलिसांनी सुरु केली आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

सरकारचे कार्यालय मिसिंग

जुन्ता हाऊस मधून एक महत्त्वाचे कार्यालय गायब झाले म्हणे! “इन्स्पेक्टर जनरल ऑफ सोसायटीज” यांचे कार्यालय आधी कुठे होते हे सगळ्यांना ठाऊक. पण आता ते कुठे गेले हे मात्र देव जाणे आणि अधिकारी जाणे अशी अवस्था झाली आहे. स्थलांतर झाले हे नक्की, पण “कोठे?” हा प्रश्न मात्र अजूनही ‘नोंदणी’मध्येच अडकला आहे. संकेतस्थळावर अजूनही जुनाच पत्ता झळकत असल्याने अनेक जण आजही तिथेच फेऱ्या मारताना दिसतात. या कार्यालयात ट्रस्ट, सोसायटी आणि विविध संस्थांची नोंदणी होत असल्याने त्याचे महत्त्व काही कमी नाही. पण सध्या परिस्थिती अशी आहे की नोंदणीपेक्षा ‘शोधमोहीम’च जास्त सुरू आहे. कुणी म्हणतं पणजीत आहे, कुणी म्हणतं दुसऱ्या इमारतीत. तर काही जण तर थेट “हे कार्यालय हरवलंय” अशीच घोषणा करत आहेत. एकंदरीत काय, सोसायटी रजिस्टरचे कार्यालय सध्या ‘अज्ञात स्थळी’ नोंदवले गेले आहे आणि नागरिक मात्र त्याचा ‘पत्ता शोधा’ मोहिमेत गुंतले आहेत. आता संबंधितांनी तरी लवकरच आपला पत्ता अपडेट करावा, नाहीतर लोकांना वाटेल की हे कार्यालयही आता ‘मिसिंग’ मध्ये नोंदवावे लागेल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com